प्रत्येक राजकीय पक्षाला आपला, जवळचा वाटणारा आणि तरीही प्रत्येक राजकीय पक्षापासून सुरक्षित अंतरावर आपले अस्तित्व जपणारा नेता ही राजकारणातील दुर्मीळ व्यक्तिसंपदा असते. महाराष्ट्रामुळे देशाला अशी व्यक्तिसंपदा लाभली आहे. आपल्या राजकीय इतिहासात एकाही निवडणुकीत पराभव न पाहिलेला, हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढेच खासदारबळ असूनही देशाच्या सर्वोच्च पदावरील नेतृत्व करण्याची क्षमता असलेला आणि चर्चेत असलेला नेता म्हणून शरद पवारांना पर्याय नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला पवार हे कधी कधी संकटमोचक वाटतात. इकडे महाराष्ट्रात त्यांचे राष्ट्रवादी अनुयायी राफेल घोटाळ्याच्या नावाने भाजप सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसच्या हातात हात घालून आंदोलनाची तयारी करत असतानाच शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची पाठराखण करून विरोधी आघाडीतील संभाव्य राजकीय पक्षांना संभ्रमात टाकले. भाजपविरोधी महाआघाडीच्या गोटात राहूनही भाजपला ते अधूनमधून आपले वाटावेत आणि ते नेमके कोणाचे हा प्रश्न महाआघाडीतील प्रत्येक राजकीय पक्षास पडावा यातच पवार यांचा राजकीय धूर्तपणा सामावलेला आहे. पवार यांनी भाजपविरोधी महाआघाडीच्या बांधणीत पुढाकार घेतला, पण नेतृत्वाच्या प्रश्नावर आपले मत राखून ठेवले तेव्हा भाजपच्या दिग्गजांनी सुटकेचा निश्वास सोडला. महाआघाडीतील जो पक्ष जास्तीत जास्त जागा मिळवेल, त्या पक्षास पंतप्रधानपद मिळेल असे सांगून महाआघाडीतील काही पक्षांच्या आकांक्षा उंचावण्याचा आणि काही पक्षांच्या आकांक्षांवर पाणी फेरण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी एकाच वेळी करून दाखविला, तेव्हा सर्वाधिक गुदगुल्यादेखील भाजपलाच झाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यांचे बोट धरून राजकारणाच्या वाटेवरची सुरुवातीची पावले टाकली, तीच बोटे आता राहुल गांधींच्या बोटात गुंफून पवार महाआघाडीच्या महाप्रयोगासाठी सरसावले आहेत.  महाआघाडीचा प्रयोग सुफळ झालाच, तर राफेलच्या मुद्दय़ावरून राहुल गांधींनी उठविलेले काहूर काँग्रेसला लाभ मिळवून देईल आणि ‘ज्यांचा पक्ष मोठा त्यांचा पंतप्रधान’ असे पवार यांनी अगोदरच जाहीर करून टाकले असल्याने काँग्रेस हा विरोधी आघाडीतील पंतप्रधानपदाचा पहिला दावेदार ठरेल. या साऱ्या शक्यता डोळ्यासमोर तरळू लागल्याने काँग्रेसचा पिसारा फुलू लागला, हेदेखील पवार यांनाच सर्वात अगोदर ध्यानी आले असावे.  नरेंद्र मोदी हेच राफेल घोटाळ्याच्या आरोपाच्या गर्तेत सापडल्याने भाजपची अवस्था कुरुक्षेत्रावर थरथरणाऱ्या अर्जुनासारखी होऊ लागलेली असतानाच, नेमकी वेळ साधून पवार पुढे सरसावले आणि मोदी यांचा या घोटाळ्याशी संबंध नाही, त्यांची नियत साफ आहे हे त्यांनी जाहीर करून टाकले.  पवार असे बोलले आणि महाआघाडीच्या मंचावरूनच जणू मोदी यांना क्लीन चिट मिळाली. भाजपच्या छातीत दडपून राहिलेल्या सुटकेच्या निश्वासास बाहेर पडण्याची वाट आता मोकळी झाली आहे. भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व करण्यास सरसावलेले पवार नेमके आहेत तरी कोणाचे, या प्रश्नाने एव्हाना या महाआघाडीच्या परिघाला पुरते घेरले असेल.