19 January 2019

News Flash

नाथाभौंची चूक

एक म्हणजे - पक्षाने तुमच्यासाठी काय केले हे विचारू नका, पक्षासाठी तुम्ही काय केले ते सांगा.

हे म्हणजे भौ, जरा जादाच झाले.. आमच्या नाथाभौंनी (अराजकीय वाचकांसाठी खुलासा – नाथाभौ म्हणजे आपल्या लाडक्या पक्षाचे लाडके नेते मा. श्री. एकनाथराव खडसे. आमच्यासारखी जवळची माणसे त्यांना प्रेमाने, मायेने, झालेच तर त्यांना मंत्रिमंडळातून नारळ दिलेला असल्याने सहानुभूतीनेही नाथाभौ असे म्हणतात. असो.).. तर आमच्या नाथाभौंनी राष्ट्रवादीचे जाणते राजे मा. श्री. शरश्चंद्ररावजी पवार यांना वाकून नमस्कार काय केला आणि अवघ्या कमळाच्या रानात वणवाच पेटला. त्या समस्त कमलाकरांचे म्हणणे असे, की याला काय भौ अर्थ आहे का? ज्यांनी यापूर्वी आपल्या मस्तकावर गोवऱ्या उधळल्या, त्यांच्या पायी आपण फुले वाहावी काय? ज्यांनी आपणावर तोडपाणी करणारे असा आरोप केला, त्यांच्या पायाशीच अशी तोडपाणी करण्याकरिता जावे काय? अनेकांच्या मनात तर नाथाभौंच्या स्वाभिमानाचे (कृपया नोंद घ्यावी, नाथाभौंच्या स्वाभिमानाचे असे आम्ही म्हटले आहे. राणेंच्या नाही. तो स्वाभिमान फक्त नावापुरताच असतो! तर तेही असो.).. तर अनेकांच्या मनात नाथाभौंच्या स्वाभिमानाचे असे कसे काळ्या वांग्याचे भरीत झाले, नाथाभौंच्या अस्मितेची अशी कशी शेवेची भाजी झाली असा सवाल उभा राहिला. बरोबरच आहे ते. नाथाभौंनी इतके वाकावे आणि तेही पवारांसारख्या नेत्यासमोर हे काही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून नाही झाले. गेली ४० वर्षे भाजपमध्ये असूनही नाथाभौंना ही राजकीय संस्कृती समजली नसेल, तर आम्ही तर म्हणतो त्यांनी किमान महिनाभर तरी उत्तनच्या प्रबोधिनीत जाऊन राहिले पाहिजे. म्हणजे कसे, बौद्धिकचे बौद्धिकही होईल आणि विपश्यनेची विपश्यनाही होईल. कशी आहे ही राजकीय संस्कृती? थेट गीतेतून आलेली, ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ची ती संस्कृती आहे. आता वाचकभौ म्हणतील की हे काय नवे? तर याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे – पक्षाने तुमच्यासाठी काय केले हे विचारू नका, पक्षासाठी तुम्ही काय केले ते सांगा. आणि दुसरा महत्त्वाचा अर्थ असा आहे, की ४० वर्षे सतरंज्या उचलल्या असल्या, तरी खुर्चीची अपेक्षा धरू नका. आमच्या नाथाभौंची नेमकी ही समजूत कमी पडली. वर पुन्हा, एका खुर्चीवर बसून दुसरीकडे टक लावून पाहायचे, या काँग्रेसी संस्कृतीचा वाण नाही पण गुण नाथाभौंना लागला. परिणामी तेलही गेले आणि तूपही. हाती विधानसभेत फक्त धुपाटणे घुमवत राहणे आले. म्हणजे हल्ली तर दिल्लीत नाथाभौंना महाराष्ट्राचे यशवंत सिन्हा म्हणू लागलेत लोक. आता असे असताना, नाथाभौंनी जरा गप्प राहावे तर नाही. ते थेट उंबऱ्यावरच जाऊन बसू लागले पक्षाच्या. एरवी शरदरावांना एवढा वाकून जाहीर नमस्कार करायची काही आवश्यकता होती का? नाथाभौंना समजायला हवे होते, की मोदीजींनी पवारसाहेबांना गुरुदक्षिणा देणे वेगळे आणि नाथाभौंनी पाद्यपूजन करणे वेगळे. खरे तर शरदरावांना वाकून नमस्कार सगळेच करतात. पण ते कसे, तर आतून. आणि असे असताना नाथाभौंनी त्यांना जाहीर वंदन करावे? यावर नाथाभौंचा खुलासा काय, तर ज्येष्ठांचा संस्कार करायचा असे आपल्यावर संस्कार आहेत. हेच, हेच चुकलं नाथाभौंचे. सध्याची राजकीय संस्कृतीच त्यांना समजली नाही. भौ, ज्येष्ठांना मान द्यायचे दिवस गेले आता.. हल्ली ज्येष्ठांना मान नव्हे, तर मार्गदर्शक मंडळाचे सदस्यत्व द्यायचे असते. नाथाभौ, तेव्हा तुम्ही म्हणजे जरा जादाच केले. वणवा नाही पेटणार अशाने तर काय होणार?

First Published on April 4, 2018 2:28 am

Web Title: sharad pawar eknath khadse