News Flash

कौतुकफुलांचा देठ खुडावया..

पंचशतकी आणि दसशतकी चलनाची जुनी गाडी थांबवली.

आपला देश शेतकऱ्यांचा, शेतीचा. शेतकरी, शेती आली म्हणजे हवापाणी आलं. हवापाणी आलं म्हणजे त्याचा अंदाज आला. यात आपल्या जाणत्या साहेबांचा हात कोण धरणार. साहेबांनी त्यांच्या आयुष्याच्या मशागतीचं रहस्य एका ग्रंथातून उलगडलं. त्या ग्रंथाच्या प्रकाशनात त्यांच्या गुजरातमधील (सध्या दिल्लीवासी- अधूनमधून परदेशवासी) परमप्रिय मित्रांनी त्यांचं कोण कौतुक केलं. ‘हवेची दिशा कुठली, हे जाणत्या साहेबांना बरोब्बर कळतं’, हे त्यांच्या मित्रांनी केलेलं कौतुक. अशीच कौतुकफुले मध्यंतरी उभयतांनी परस्परांवर उधळली. ‘काय वर्णावी त्यांच्या कामाची पद्धत..’ हे साहेबांचं सांगणं, तर ‘साहेबांनी आपल्याला बोट धरून शेतीतलं बरंच काही शिकवलं’, ही मित्रांची कृतज्ञता. त्या कौतुकफुलांचा परिमळ ताजा असताना असं काय आक्रित घडलं की, साहेबांनी या कौतुकफुलांचा देठच खुडावा? तर, त्यांच्या मित्रांनी मध्यंतरी एक निर्णय धाडकन घेतला. पंचशतकी आणि दसशतकी चलनाची जुनी गाडी थांबवली. मोठा कल्पक आणि देश आबादीआबाद करणारा क्रांतिकारी निर्णय तो. असा निर्णय आपल्या मित्रांनी घ्यावा, याचं साहेबांना कोण कौतुक. त्यांनी लगेच सांगितलं.. ‘या निर्णयास आमचा पाठिंबा’. पण नंतर जरा वेगळंच घडलं. आपल्याच निढळाचा घाम गाळून मिळवलेलं चलन मिळवण्यासाठी लोकांना आधी नैमित्तिक रजा काढून रांगांमध्ये उभं राहावं लागलं आणि नंतर पायदुखीसाठी आजाररजा घ्यावी लागली. खेडोपाडीच्या शेतकऱ्यांचे तर फारच हाल झाले. जाणत्या साहेबांना रयतेच्या या नष्टचर्याची जाणीव झाली. मग ते जे काही टीकाबोल बोलते झाले त्याचा मथितार्थ असा की.. ‘आमच्या मित्रांनी चलनगाडी थांबवण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता, पण गाडीचा ब्रेक दाबताना काही तरी गल्लत झाली आणि त्याचे परिणाम विपरीत झाले.’ आता जाणते साहेब बोलले ते रयतेच्या काळजीपोटीच. कुणी म्हणतं, हवेतील लोकभावनेचं तप्त तापमान बघून ते असं बोलले. तर असं काही करणं हा साहेबांचा स्वभावच नाही. आपण बरं, रयतेसाठीचं आपलं काम बरं, ते करीत राहायचं, खरं तेच बोलत राहायचं आणि कुणी टीकेचे बाण सोडले तर ते फुलांसमान मानून घ्यायचे अशी त्यांची साधूवृत्ती. त्यामुळे साहेबांच्या टीकेत अर्थ असला तरी त्यांच्यावरील टीकेत तो नाही. आणि साहेब रविवारी जे बोलले त्याचा परिणाम लगेचच सोमवारी दिसलाच की. बंद केलेल्या जुन्या चलनाची गाडी शेतकऱ्यांना चालवण्याची मुभा त्यांच्या मित्रांनी देऊन टाकली. साहेब रविवारी बोलले नसते तर सोमवारी असा निर्णय होता ना. ‘५० दिवस सबुरी राखा’, असा मंत्र साहेबांच्या मित्रांनी दिलेला आहेच. आता या सबुरीच्या दिवसांत बघाच काय काय होतं ते. ५० दिवसांनंतर साहेब पुन्हा म्हणतील.. ‘मित्रांच्या कार्यपद्धतीचं मला कौतुक वाटतं’, आणि मित्र म्हणतील, ‘साहेबांचं बोट धरून मी शेतीतलं खूप काही शिकलो’. हे असंच होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 3:01 am

Web Title: sharad pawar narendra modi meet
Next Stories
1 देवाची तिजोरी..
2 अर्थकारणाचे सीमोल्लंघन..
3 आपले मोक्षदाते
Just Now!
X