सध्याच्या घडीला खेळापेक्षाही खेळाच्या ‘व्यवस्थापना’च्या नावाखाली राजकारणाचा खेळ करताना अधिक काळजी घ्यावी लागते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ऊर्फ बीसीसीआय हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. या खेळ-व्यावस्थापनात चाणाक्षपणा आला, शह-काटशह आले, आरोप-प्रत्यारोप आले, सारे काही खुर्चीच्या लालसेपोटीच. पण ही खुर्ची सोडताना त्या खुर्चीत आपला विरोधक बसू नये, याचीही पूर्णपणे काळजी घ्यावी लागते. शशांक मनोहर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे- आयसीसीचे- कार्याध्यक्ष होणारच होते. त्यामुळे त्यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडणे अपरिहार्य होतेच. पण ते सोडतानाही त्यांनी जे काही चौकार-षट्कार ठोकले, त्यांची दखल घ्यायलाच हवी. काही वर्षांपूर्वी जगमोहन दालमिया बीसीसीआयचे अध्यक्ष झाले, पण कालांतराने त्यांना बीसीसीआयचे कामकाज करणे जमत नव्हते. दालमिया यांच्या निधनानंतर अनुराग ठाकूर हे अध्यक्ष होतील, असे वाटत होते. पण आपत्ती-व्यवस्थापन, शेती अशा विषयांप्रमाणेच क्रिकेटचेही जाणते राजे असलेल्या नेत्यांनी कौल दिला आणि मनोहर बीसीसीआय-अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसले. त्यानंतर बीसीसीआयमध्ये राग-अनुराग नव्याने सुरू झाले. ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान यांच्यातील अतिमहत्त्वाचा सामना ठाकूर यांच्या धरमशालातून काढून घेण्याचा यशस्वी डाव खेळला गेला. ठाकूर यांच्या सामर्थ्यांला धक्का पोहोचवल्याचे समाधान सामन्यापेक्षाही मोठे होते. त्यानंतर मनोहर हे आयसीसीमध्ये जाताना पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची संधी ठाकूर यांच्याकडे चालून आली आहे. त्यासाठी त्यांनी कोलकाताच्या संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुलीला आपल्या ताफ्यात घेतले. पण राजकारणात काही बोलून दाखवायचे नसते, तर न बोलता तुम्हाला ईप्सित साध्य करता यायला हवे. ठाकूर यांना भाजपच्या ‘युवा’ राजकारणाचा अनुभव भरपूर, पण दिल्ली क्रिकेट संघटनेत वजन असलेले भाजपनेते ठाकुरांना मोजतच नसल्याने क्रिकेट-व्यवस्थापनात त्यांना ‘गॉडफादर’ नाही. शशांक मनोहर कांगावा न करता जर सरळ बीसीसीआयमधून बाहेर पडले असते, तर ठाकूर यांच्या नावाला अधिक पसंती मिळाली असती. मनोहर यांनी बीसीसीआयमधील ‘काही व्यक्ती’ मनाप्रमाणे काम करायला देत नसून आपली मते लादत आहेत म्हटले, पण रोख ठाकूर यांच्यावर होता. ठाकूर यांच्याबरोबर राजीव शुक्ला हे गुडघ्याला बाशिंग बांधून अध्यक्षपद भूषवण्यासाठी सज्ज आहेत किंवा तिसरीच व्यक्तीही आपण बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आलेली पाहू शकतो. आपला कोणता माणूस बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर बसवायचा, यासाठी एन. श्रीनिवासन यांच्याशीही चर्चा केली जाऊ शकते.. त्यामुळे क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीचा रिमोट शेती आणि आपत्तीव्यवस्थापन तज्ज्ञांकडेच राहू शकतो. तसे नाहीच झाले, तरी ‘लोढा समिती’च्या शिफारशींचे तसेच सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचे लोढणे नव्या पदाधिकाऱ्यांच्या गळय़ात पडणार आहेच.