29 September 2020

News Flash

कमलनाथ बनाम वसंतसेना!

प्रश्न वसंतसेना यांच्याकडून होणाऱ्या छळाचा आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र )

 

– युवर ऑनर, माझे अशील कमलनाथ यांच्याइतका पारदर्शक चारित्र्याचा पुरुष कुणाला शोधूनही सापडणार नाही. असं असताना आरोपी क्रमांक एक सौ. वसंतसेना या सातत्याने त्यांचा छळ करताहेत. त्याबाबतचे सर्व पुरावे युवर ऑनर, आपल्यासमोर सादर केले आहेत..

– युवर ऑनर, हे चोराच्या उलटय़ा बोंबा झालं.

– ऑब्जेक्शन, युवर ऑनर.

– ऑब्जेक्शन काय? मी इथं कुठं कुत्रा, गांडूळ, साप, मुंगूस असे शब्द वापरलेत का? मला एवढंच म्हणायचंय की, वसंतसेना यांच्यामुळंच कमलनाथ यांची एवढी प्रगती झालीय. हा त्यांचा दहा वर्षांपूर्वीचा फोटो पाहा युवर ऑनर. कसा खंगलेला चेहरा होता. आज छाती काढून दाखवताहेत, पण तेव्हाची छाती पाहा. कॅरमबोर्ड वाटतोय!

– ऑब्जेक्शन युवर ऑनर. माझ्या अशिलाच्या छातीचा आणि या खटल्याचा काहीही संबंध नाही. हल्ली त्यांच्या पोटाचाही आकार वाढलाय, पण ती त्यांची स्वकमाई आहे..

– मलाही तेच म्हणायचंय. कालचे रोडावलेले कमलनाथ, दात कोरून पोट भरत. वसंतसेना यांनी त्यांना जवळ केलं.. आज पाहा त्यांची प्रकृती.

– युवर ऑनर, आरोपीचे वकील विषय भरकटवत आहेत. प्रश्न वसंतसेना यांच्याकडून होणाऱ्या छळाचा आहे. सतत टोचून बोलतात त्या. काही बोलायला जावं तर सोडून जायची धमकी देतात. त्यामुळे कमलनाथ यांचं मानसिक संतुलन ढासळू लागलंय. त्याबाबत मानसोपचारतज्ज्ञाचा अहवाल यापूर्वीच सादर केलाय.

– काय म्हणतो तो अहवाल?

– हल्ली माझ्या अशिलांना भलतीसलती स्वप्नं पडताहेत. झोपेत स्वबळ, शतप्रतिशत असं काही बरळत असतात. पूर्वी सतत कुजबुजायची सवय होती त्यांना, पण आता ते ‘चहा देशील का’ असं साधं वाक्यही किंचाळून बोलतात. याच्या टेपरेकॉर्डेड नोंदी आहेत, युवर ऑनर. गेल्या काही दिवसांपासून तर त्यांना भलतीसलती स्वप्नं पडू लागलीत. पूर्वी त्यांना आपण सिंहाचे डेंटिस्ट आहोत असं स्वप्न पडायचं. आता त्यांना आपणच सिंह आहोत असं वाटू लागलंय.

– युवर ऑनर, वसंतसेना यांचंही तसंच झालेलं आहे. त्याही स्वबळ-स्वबळ असा जप करतात सतत आणि त्यांचा तर कधीपासून आपण मिसेस वाघ आहेत असाच समज आहे..

– त्या मिसेस वाघ आहेत, म्हणून त्यांनी आमच्या अशिलाचे चावे घ्यायचे?

– नाही युवर ऑनर. छळ कमलनाथांकडूनच होतोय. माझ्या अशिलाला ते जवळही घेत नाहीत आणि दूर जायला लागलं, तर जाऊ  नका म्हणतात. संसार करायची इच्छा आहे म्हणतात.. माझे अशील त्यामुळं कन्फ्यूज आहेत. आतून पाठिंबा की बाहेरून.. कळतच नाही त्यांना.

– युवर ऑनर, कमलनाथांना वसंतसेना यांना नांदवायची इच्छा आहेच. पूर्वी त्राणच नसल्यामुळं ते वसंतसेनांची बोलणी खात; आता वसंतसेना यांनी त्यांचं ऐकावं आणि गप्प बसून घरकाम करावं एवढंच त्यांचं म्हणणं आहे..

– हे पाहा, तुमच्या अशिलांना सांगा, की पत्नी ही काही वस्तू नाही. तुम्ही तिच्यावर बळजबरी करू शकत नाही. तुमच्या अशिलांनी हा निकाल वाचला नाही का?

– वाचलाय, युवर ऑनर. म्हणूनच कमलनाथ बळजबरी करू इच्छित नाहीत. वाटत असेल, तर वसंतसेना यांनी खुशाल काडीमोड घ्यावा..

– मग प्रॉब्लेम काय आहे?

– प्रॉब्लेम हाच युवर ऑनर, की वसंतसेना यांना घटस्फोट घेऊन नांदायचंय!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 2:19 am

Web Title: shiv sena bjp amit shah
Next Stories
1 वाघ, सिंह आणि उंदरांचा उच्छाद..
2 ‘दीडवाहने’ शहर..
3 नर्मदामैया आणि सत्तामैया..
Just Now!
X