मेळावा संपला. सैनिक आपापल्या घरी पोहोचले. दुसरा दिवस उजाडला, आणि सकाळीच सारे जण शाखेवर जमा झाले. एक नवी मोहीम हाती घेण्याचा आदेश साहेबांनी काल दिला होता. त्यावर सखोल चर्चा करणे गरजेचे होते. काही वेळातच फूटपाथवरच्या शाखेच्या किल्लेवजा खोलीत सारे बिनीचे सैनिक जमा झाले, आणि शाखाप्रमुखाने हातातील कागदांचे भेंडोळे उलगडले. एकवार त्यावरून नजर फिरविली. घसा खाकरला. ‘जमलेल्या माझ्या तमाम सैनिकांनो..’ असे बोलून त्याने खोलीतील मावळ्यांवर नजर फिरविली. प्रथेप्रमाणे कोपऱ्यातून महाराजांचा जोरदार जयजयकार घुमला, आणि शाखाप्रमुखाने हात उंचावला. ‘आता घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे. सत्यशोधन सुरू करा, असा आदेश कालच साहेबांनी दिला आहे’.. त्याचे पहिलेच वाक्य संपले आणि सैनिकांनी एकमेकांकडे पाहिले. खोलीतील प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर गोंधळ दिसत होता. एका सैनिकाने धीर करून हात वर केला. शाखाप्रमुखाने खुणेनेच त्याला बोलण्याचा इशारा केला, आणि सैनिक उभा राहिला. ‘सत्यशोधन करायचं ते ठीक आहे, पण कसलं सत्यशोधन करायचं?’ त्याने धीर करून विचारले, आणि ‘मन की बात’ पुढे आल्याच्या समाधानाने साऱ्या सैनिकांनी सुस्काराही सोडला. मिनिटभर शाखेत शांतता पसरली. शाखाप्रमुखाने पुन्हा हातातील भेंडोळे उलगडले. शाखाप्रमुख हातातील कागदावरच्या एक एक मुद्दय़ावर नजर फिरवत होता. ‘तुम्ही त्यांना विचारा, योजनांचा फायदा कुणाला झाला!’ सैनिकांनी मान डोलवली. पुन्हा शाखाप्रमुखाने कागदावरून नजर फिरविली. ‘मुंबई तोडण्याचा तुमचा डाव नाही ना, याचेही सत्यशोधन करा’.. पुन्हा सैनिकांनी मान डोलावली. शाखाप्रमुखाच्या चेहऱ्यावर समाधान उमटू लागले होते. ‘बुलेट ट्रेनने कोण प्रवास करणार याचेही सत्यशोधन करा, आणि मुंबईला गुजरातचे उपनगर बनविण्याचे कारस्थान कुठे सुरू आहे याचेही सत्यशोधन करा’.. शाखाप्रमुख आवेशात बोलला, आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.. ‘सारे काही मुंबईतून हलवून मुंबईला मारून टाकण्याचे कारस्थान तर नाही ना, याचाही शोध घ्या’.. शाखाप्रमुखाने आणखी एक  आदेश दिला, आणि पुन्हा कोपऱ्यातून ‘आवाज’ घुमला. शाखेच्या खोलीत चैतन्य सळसळू लागले. ‘लक्षात ठेवा, आपल्यासाठी नाही, तर जनतेसाठी आपल्याला झेंडा फडकवायचा आहे.. आता निर्धार करून घराबाहेर पडा, जनतेच्या मनामनात आपला झेंडा रुजवा, मग आपोआप राज्यावर आपला झेंडा फडकेल’.. आवेशात हात उंचावून शाखाप्रमुखाने भाषण आवरते घेतले, आणि आता आपण जिद्दीला पेटलो आहोत, याची सैनिकांना जाणीव झाली. आता काहीही झाले तरी सत्यशोधन करायचेच असा निर्धार करून सारे बाहेर पडले. तोवर गल्लीत सर्वत्र सत्यशोधन मोहिमेची बातमी पसरली होती. ‘हा सत्यशोधन अहवाल कधी येणार याची आपण वाट पाहू या’.. शेजारच्या सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयात पेपरात डोके खुपसून हळूच बाहेर बघत म्हाताऱ्या बापूंनी रिटायर्ड अण्णांना कोपराने ढोसले, आणि अण्णांनी बापूंसमोर टाळीसाठी हात पुढे केला.. ‘आता टाळी नाही’.. बापू म्हणाले, तरी अण्णांचा हात टाळीसाठी पुढेच होता!..