अचानक असे काय बरे झाले असावे, की ज्यामुळे शिवसेनेला ‘साप वाचवा’ मोहीम हाती घेण्याची सुबुद्धी झाली? मुंबईच्या उपनगरांतील जंगले कमी होऊ  लागल्यामुळे माणसांच्या  वस्तीत सापांचा सुळसुळाट होत असला तरी सापांना ठेचून ठार मारण्याऐवजी त्यांना पकडून प्राणिसंग्रहालयात किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडून द्यावे, अशी मागणी करणारा ठराव शिवसेनेने महापालिकेच्या सभागृहात मांडला आणि तो एकमताने मंजूरही केला गेला. सापांना ठेचून ठार मारण्याची कल्पना कोणत्याही राजकीय पक्षास मान्य नाही हाच याचा अर्थ. शिवसेनेच्या ‘साप वाचवा’ मोहिमेस त्यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपनेही मनापासून साथ दिली. अलीकडे या दोन पक्षांचे संबंध काहीसे नाजूकच झाले होते, असे म्हणतात. राज्यात सत्ता आल्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली असली, तरी महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्नांवर आम्ही सतत सरकारच्या विरोधातच उभे  ठाकणार, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावल्यानंतर भाजपने सेनेशी सूत जमविण्यासाठी हरतऱ्हेचे उपाय सुरू केले. ‘वाघ वाचवा’ मोहीमही हाती घेतली आणि शिवसेना पक्षप्रमुखांना वाघाची फायबर प्रतिमा सप्रेम भेट देण्यासाठी खुद्द वनमंत्री जातीने मातोश्रीवर गेले. भाजपने भेटीदाखल दिलेला तो वाघ मातोश्रीच्या दिवाणखान्यात दर्शनी भागात दिमाखात उभा आहे, असे म्हणतात. हे भाजपच्या ‘वाघ वाचवा’ मोहिमेचे राजकीय फलितच म्हटले पाहिजे. अर्थात, ‘वाघ वाचवा’ मोहीम हाती घेतली म्हणून सरसकट सर्वच वाघांना त्यांच्या कोणत्याही गैरकृत्यांवर पांघरुणे घालून वाचविले जाणार नाही, ही भाजपची भूमिका लपून राहिलेली नाही. म्हणजे, ‘वाघ वाचवा’ मोहिमेतून काही वाघांना वेळप्रसंगी वगळण्याचेही भाजपचे धोरण असल्याचे अवनी प्रकरणातूनच स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे, राज्यातील सगळेच वाघ सदैव सुरक्षित राहतील आणि ‘वाघ वाचवा’ योजनेचे सर्वकाळ लाभार्थी असतील असे नाही, हा संदेशही भाजपने अवनीवरील कारवाईतून दिलेला आहे; पण मुद्दा तो नाही. भाजपने ज्याप्रमाणे ‘वाघ वाचवा’ मोहीम हाती घेतली, तर आपण ‘साप वाचवा’ मोहीम हाती घ्यावी, असे शिवसेनेच्या महापालिकेतील गटास वाटले असेल, तर त्याचे कौतुकच केले पाहिजे. मुंबईसारख्या, माणसांची दाटी असलेल्या महानगरात ‘साप वाचवा’ मोहीम राबवावी असे कोणासही सुचलेदेखील नसते, ते शिवसेनेने प्रत्यक्ष मोहीम हाती घेऊन ‘करून दाखविले’ आहे. माणसांच्या रेटारेटीत घुसमटलेल्या या महानगरात ‘साप वाचवा’ मोहीम हाती घेण्याच्या या कल्पनेमुळे सरसकट सर्व सापांचे ‘अच्छे दिन’ सुरू झाले आहेत. मुंबईच्या नागरी वस्तीत सापडणारे सगळेच साप विषारी नसतात, पण केवळ साप सापडल्याच्या भयानेच त्यांना ठार मारले जाते. असे केले तर सापांची एखादी जमात नष्ट होईल, अशी भीती शिवसेनेला वाटते, हेही चांगलेच आहे. भाजपच्या ‘वाघ वाचवा’ मोहिमेचा फायदा सरसकट सगळ्याच वाघांना मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या ‘साप वाचवा’ मोहिमेचे धोरणही असेच असणार का, हे मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. बिनविषारी सापांबरोबरच विषारी किंवा अतिविषारी सापांनाही या मोहिमेचे लाभार्थी ठरविणार का, हे मोहीम प्रत्यक्ष सुरू झाल्याखेरीज स्पष्ट होणार नाही. परिस्थितीचा नेमका अंदाज येईपर्यंत विषारी सापांनी बिळाबाहेर येऊ नये, हेच बरे!