19 February 2019

News Flash

वाघ, सिंह आणि उंदरांचा उच्छाद..

शिवसेनेने भाजपची जिरवायला सुरुवात केली ही राज्याच्या राजकारणास मिळणारी कलाटणी होय.

महाराष्ट्राचे (मिस्टर क्लीन चिट) मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी विधिमंडळाच्या मंचावरून सिंहगर्जना करीत शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरील गैरव्यवहाराच्या आरोपांचे बालंट पुसून टाकल्याने आता भ्रष्टाचाराच्या आरोपाचा एकही डाग अंगावर नसलेल्या शिवसेनेने भाजपची जिरवायला सुरुवात केली ही राज्याच्या राजकारणास मिळणारी कलाटणी होय. नाराज नाथाभाऊंनी विधिमंडळाच्या अधिवेशनात मंत्रालयातील उंदरांच्या उच्छादाचा मुद्दा मांडत आपल्याच पक्षाच्या सिंहांना डिवचण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच, या ठिकाणी आम्ही एकटे नाही, आम्हाला आडवे येणाऱ्या साऱ्या उंदरांचा आम्ही वाघ-सिंह मिळून नायनाट करणार आहोत, अशी आवेशपूर्ण गर्जना मुख्यमंत्र्यांनी केली होती.  ‘या ठिकाणी’ आम्ही ‘खऱ्या अर्थाने’ एकत्र आहोत, असे देवेंद्रभाऊंनी तब्बल बेचाळीस वेळा घसा खरवडून सांगूनही, वाघाचे सिंहाशी पूर्वीच बिनसलेले असल्याने आपणास घाबरण्याचे कारण नाही असे काही जाणत्या उंदरांनी कळपातील अनेकांना समजावलेही होते. कारण ‘आम्ही एकत्र राहणार नाही, वाघ-सिंह कधीच एका कळपात राहात नाहीत,’ असे देवेंद्रभाऊंच्याच पक्षाचे नाथाभाऊ  खडसे यांनी बजावले तेव्हाच भाजपच्या सिंहाशी शिवसेनेच्या वाघाचे बिनसले होते. म्हणूनच, गोरेगावातील भरगच्च सभामंडपातून उद्धव ठाकरेंनी उद्विग्नपणे भिरकावून दिलेला युतीचा कटोरा थेट मलबार हिलवर वर्षांच्या अंगणात जाऊन पडला तेव्हा अनेक जण तो उचलण्याच्या इच्छेने त्याकडे आशाळभूतपणे पाहात असल्याचा भास होऊन (त्या ठिकाणी) देवेंद्रभाऊ  डोळे मिचकावत खुशीने स्वत:शीच खुदुखुदु हसलेदेखील होते. आता सिंहांच्या कळपातून सेनेचे वाघ बाहेर पडणार यावर उद्धवजींनीच शिक्कामोर्तब केले असले तरी भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या दगडाखाली सापडलेले देसाईंचे हात सुरक्षितपणे सुटेपर्यंत सिंहासोबत राहण्याचे नाटक करणे गरजेचे तर होतेच.  आता सेनेच्या वाघाला युतीच्या कळपातून लांब जाऊ  द्यायचे नाही यासाठी भाजपचे सिंह गयावया करू लागले आहेत. आसपास उच्छाद मांडणाऱ्या उंदरांचा नायनाट करण्यासाठी (या ठिकाणी) ‘खऱ्या अर्थाने’ वाघाला सोबत घेणे गरजेचे आहे, हे ओळखून ‘आम्ही एकत्र आहोत’ असे देवेंद्रभाऊंनी ओरडून सांगितले तरी वाघाला पाझर फुटतच नाही हे पाहून, सध्या कळपातून लांब असलेले नाथाभाऊदेखील वाघाला गोंजारण्यासाठी सरसावले आहेत. एकंदरीत, उच्छाद मांडणारे उंदीर आपली आयाळ कुरतडणार या भयाने ग्रासलेल्या सिंहांना, उंदरांचा नायनाट करणे आपल्या एकटय़ाच्या आवाक्यातले नाही याची जाणीव झाल्याचे पाहून वाघाला भलताच आवेश आला आहे. ‘जबडय़ात घालूनि हात, मोजतो दात, जात ही अमुची’ अशा आवेशपूर्ण वल्गना करणाऱ्या सिंहांच्या कळपाचा ओसरता आवेश न्याहाळण्यासाठी आता सत्तेच्या जंगलातील सर्वच प्राण्यांनी गर्दी गेली आहे. यामध्ये लांडगे आहेत, कोल्हे आहेत, साप आहेत, गांडुळे आहेत आणि उंदीर तर भलत्याच जोषात आहेत. कळपातून वाघ बाहेर पडला, की सिंहांची आयाळ कुरतडणे सोपे होईल, असा सल्ला जाणत्या उंदराने दिल्याची चर्चा असून, सिंहांचा कळप आता अस्वस्थ झाला आहे, असे कळते.

First Published on April 9, 2018 3:40 am

Web Title: shiv sena vs bjp in maharashtra 3