मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याबद्दल अनेकदा वाद-वदंतांचे मोहोळ उठले, पण त्या राज्यातील अवतारी पुरुष त्या-त्या वेळी अगदी शांत होते. वर्दीधारी शिपायांनी आपल्या हाताचे आसन करून, त्यावर मुख्यमंत्र्यांना बसवून त्यांची पांढरी विजार, पांढरे बूटमोजे यांना चिखलाचा कणही लागू न देता पूरग्रस्त भागातील स्थितीचा पाहणी दौरा करविला, तेव्हाही या अवतारांनी योग्य वेळेची वाट पाहण्याचा संयम सोडला नव्हता. पण नर्मदेच्या तीरावरील पट्टय़ात, राज्याच्या ४५ जिल्ह्य़ांत सहा कोटी झाडांची लागवड करण्याची घोषणा शिवराजसिंहांनी केली अन् आपल्या अवतारकार्यास सुरुवात करण्याची वेळ आली, असे या अवतारांनी ओळखले असावे. मध्य प्रदेशातील या अवतारी पुरुषांना नर्मदामैयाचा आशीर्वाद असेल, तर शिवराजसिंह चौहान यांना सत्तामैयाचा आशीर्वाद आहे.

याच राज्यातील ‘व्यापमं’ घोटाळ्याशी संबंधित पन्नासेक जणांचा मृत्यू गूढरीत्या झाल्यानंतर परीक्षा मंडळांतील घोटाळे आदी प्रकारांसही जनता सरावत असल्याने ते फारसे महत्त्वाचे ठरत नाही. पवित्र नर्मदामयाच्या नावानेच जनतेस गंडविले जाण्याचा संशय आला, तेव्हा मात्र या अवतारांनी नर्मदा घोटाळाविरोधी रथयात्रेची तयारी सुरू केली. अवतारांवर मात करणे सोपे नसते. अशा वेळी एक तर अशा अवतारांसमोर शरणागती पत्करावी लागते किंवा संघर्ष करून त्यांवर मात करावी लागते. पुराणकाळापासूनचा अनुभव असा की, शरण जाणे हाच सोयीचा मार्ग उरतो. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अशा पाच जणांची समिती स्थापन केली. ज्यांच्या अतींद्रिय संवेदनांना नर्मदा घोटाळ्याचा वास जाणवत होता, त्यांच्यावरच नर्मदा जतन आणि संवर्धनाचे पुण्यकर्म सोपवून टाकले. या समितीतील नर्मदानंद महाराज, संगणक प्रत्यक्ष वापरणारे सकलकार्यक्षम मेंदूधारी संत नामदेव त्यागी ऊर्फ कॉम्प्युटरबाबा, भय्यूजी महाराज, हरिहरानंदजी बाबा आणि महंत योगेंद्र यांना शिवराजसिंहांनी राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला.. आणि काय चमत्कार! नर्मदा घोटाळाविरोधी रथयात्रा गुंडाळून आपल्या अवतारकार्यासाठी सज्ज होण्याचे या संतांनी ठरविले.  नर्मदामैयापेक्षा सत्तामैयाचा प्रभाव मोठा विलक्षण. अलीकडे कोणतेही विधायक कार्य करावयाचे असेल, तर त्यासाठी आवश्यक असलेल्या साधनसंपत्तीची पूर्तता सरकारी साह्य़ाखेरीज होत नसते. प्रत्यक्ष भगवंतांनी जरी अवतार घेतला तरी आपल्या विहित कार्याची पूर्तता सरकारी साह्य़ाखेरीज शक्य नसल्याने, मध्य प्रदेशात सरकारने स्वत:हून दाखविलेल्या या सुज्ञपणाचा गौरवच करावयास हवा. राज्यमंत्र्यांचा दर्जा ही सत्तामैयाचीच माया. या मायेची पाखर सत्तामैयाचे लाडके शिवराजसिंह चौहान यांनी संत, महंत, बाबांवर घातली. तिला कुणी मायावी म्हणेल; पण अधिकार नाहीत, जबाबदारीही नाही, तरीही मान आणि लाभ देण्याची किमया हीच खरी निरपेक्ष माया नव्हे काय? राज्यमंत्र्यांचा दर्जा केवळ झाडे लावण्याच्या उपक्रमासाठी बहाल करणे हे केवढे पर्यावरणनिष्ठ पाऊल!

सरकार आणि संत यांचा हा आगळा संगमसोहळा पाहून भोळ्याभाबडय़ा नर्मदामय्याचा ऊर भरून आला असेल. नर्मदेच्या तीरावर सहा कोटी झाडे खरोखरीच आहेत, याचा निर्वाळा जेव्हा हे संत राज्यमंत्री देतील, तेव्हा तिचे डोळेही आनंदाश्रूंनी डबडबून जातील!