News Flash

नवा ‘शिवराजानुभव’!

शिवराजसिंह चौहान यांना मात्र अलीकडे नकारात्मक बातम्यांचा तिटकारा सुरू झालेला दिसतो.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (संग्रहित छायाचित्र)

मध्य प्रदेश ही राजकारणातील वाचाळवीरांची भूमी आहे, हे याआधी अनेक प्रसंगांतून सिद्ध झाले आहे. याच भूमीचे विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अनेकदा तोच वारसा कृती वा उक्तीतूनही सिद्ध करून दाखविल्याने ते सतत ‘बातमीतील व्यक्तिमत्त्व’ राहिले आहे, याबद्दल यच्चयावत राजकारण्यांत कोणाचेच दुमत असणार नाही. आपली पादत्राणे भिजू नयेत म्हणून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केलेल्या हाताच्या पाळण्यात बसून केलेली पूरग्रस्त भागाची पाहणी सफर असो, डिंडोरीच्या जनआशीर्वाद यात्रेत लोकांसमवेत ढोल बडविणे किंवा काळे झेंडे दाखविले जातील या भयाने काळ्या ओढण्या ताब्यात घेणे असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘भगवंताचे वरदान’ म्हणून प्रमाणपत्र देणे असो, राज्यातील संतमहंतांच्या शिरावर राज्यमंत्रिपदाचे मुकुट चढविणे असो किंवा गोरक्षा मंत्रालय स्थापनेचा निर्णय असो.. चौहान यांच्या प्रत्येक उक्ती किंवा कृतीमध्ये काही ना काही बातमी लपलेली असते. बातमी टीकात्मक किंवा नकारात्मक असली तरी त्यातूनही प्रसिद्धीच मिळते हा साधा हिशेब ठेवून तशा बातमीसाठी जिभा सैल सोडून माध्यमांना खाद्य पुरविणाऱ्या नेते आणि राजकारण्यांचे अमाप पीक आजही आसपास फोफावलेले असताना, शिवराजसिंह चौहान यांना मात्र अलीकडे नकारात्मक बातम्यांचा तिटकारा सुरू झालेला दिसतो. त्यांच्या स्वतच्या राज्यातील आणि त्यांच्या पक्षातील अनेक नेते उलटय़ासुलटय़ा जिभा चालवून स्वतहूनच दिलेल्या बातम्यांपोटी विनोदाचे आणि निंदेचे धनी होऊन त्याद्वारे मिळणाऱ्या नकारात्मक प्रसिद्धीचीदेखील मजा चाखत असताना, चौहान यांना मात्र, नकारात्मक किंवा निंदात्मक बातम्यांमध्ये काही तरी काळेबेरे दिसू लागले आहे, हे बदलत्या जमान्याचेच लक्षण म्हणावे लागेल. आपल्या विरोधात माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणारी प्रत्येक बातमी ही ‘पेड न्यूज’ समजावी असे शिवराजसिंहांनी थेट निवडणूक आयोगास बजाविले आहे. हा माध्यमांना इशारा आहे, की राजकीय प्रतिस्पध्र्याना आहे हे स्पष्ट झाले नसले तरी आपल्या विरोधातील बातमी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असेच चौहान यांना सूचित करावयाचे आहे, हे स्पष्ट आहे. म्हणूनच, त्यांनी निवडणूक आयोगाला केलेल्या या सूचनेकडे सकारात्मकतेने पाहण्याची व ही बातमीदेखील विरोधात न देता विधायकपणे देण्याची कसरत आता माध्यमांना करावी लागणार असे दिसू लागले आहे. सरकारच्या बाजूने प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमध्ये विरोधकांना पेड न्यूड जिसते, म्हणून सरकारच्या वा आपल्या विरोधात येणारी बातमी ही विरोधकांकडून पेरलेली पेड न्यूज मानली पाहिजे हा चौहान यांचा युक्तिवाद राजकीयदृष्टय़ा बिनतोड असला, तरी माध्यमांना कोडय़ात टाकणारा आहे. शिवराजसिंह हे ‘घोषणायंत्र’ आहेत, अशी टीका एकदा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेचा त्यांनी स्वीकार केला, तेव्हाही, ‘आपण घोषणायंत्र आहोत, याची कबुली देणारा दिलदार मुख्यमंत्री’ अशी बातमी वाचावयास मिळाली असती. पण काही बातम्या नशीब घेऊनच आकाराला येत असतात. यापुढे बातम्यांचे नशीब बदलण्याची व चौहान यांच्या बातमीत वाचाळवीरांच्या वारशाचा अंश असणार नाही, याची खबरदारी माध्यमांनाच घ्यावी लागणार आहे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2018 3:17 am

Web Title: shivraj singh chouhan election commission congress false complaints
Next Stories
1 अस्मितेचे पाप..
2 तोचि खरा त्यागी..
3 स्वच्छता हेच स्वातंत्र्य..
Just Now!
X