आकाशास भिडू पाहणारी शिखरे, खोल दऱ्या, बेलाग कडे, घनगर्द जंगले आणि अंगठीतील माणकाप्रमाणे झळाळणारे गडकोट यांना कवेत घेणाऱ्या सह्य़ाद्रीपुढे नित नतमस्तक होणारा अरबी समुद्र परवापासून थोडी छाती काढूनच चालल्याचे दिसत आहे. सागरीतज्ज्ञांच्या मते त्याची भरतीरेषा चांगली ५६ इंचांनी वाढली आहे. एरवीच्या शांतगंभीर लाटा आता खळखळून हसताना दिसत आहेत. हे कशाने झाले असावे? हा एल् निनोचा परिणाम म्हणावा की ओझोन पटलाला छिद्र पडल्याचा? तज्ज्ञांना काही कळेनासे झाले आहे. त्यामुळे हा तात्कालिक परिणाम असून पुढे सगळे ठीक होईल असा दिलासा देण्यात येत आहे. तज्ज्ञही असे सरकारी दिलासाखोर झाले की समजावे चालले आहे ते त्यांच्याही अकलेबाहेरचे आहे आणि ते खरेच आहे. अरबी समुद्र छाती काढून का चालला आहे याचे उत्तर तज्ज्ञांना माहीत असणे शक्यच नाही. कारण परवाच्या दिवशी त्यांना काही कोणी जलपूजनाला बोलावले नव्हते. अर्थात आमंत्रण असते तरी आपण तेथे अवांच्छित आहोत हे न समजण्याएवढा राजकीय स्वार्थ काही त्यांच्यात भिनलेला नसतो. तेव्हा ते तेथे नव्हते. त्यामुळे साक्षात् भारतभाग्यविधाते नमोशहांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेला अरबी समुद्र त्यांना दिसला नाही. नमोशहाजींच्या शुभहस्ते झालेल्या ऐतिहासिक जलपूजनाने शहारलेल्या दर्याच्या लाटा काही त्यांना दिसल्या नाहीत. गेल्या ६७च नव्हे, तर पाच हजार वर्षांत असा सोहळा त्या सागराने कधी पाहिला नव्हता. कसा पाहणार? मागे कधी तरी शिवछत्रपतींनी म्हणे असेच सागरात जलपूजन केले होते, पण ते साध्या सिंधुदुर्गासाठी. त्याची तुलना या सोहळ्याशी कशी होणार? कारण हे जलपूजन होते ते एका जागतिक भावी आश्चर्याचे, शिवस्मारकाचे. तब्बल ३६०० कोटी रुपयांच्या अतिदिव्य प्रकल्पाचे. खुद्द शिवरायांनाही जमले नव्हते अशा स्मारकाचे बांधकाम. त्यांनी आपला उभारला तो महाराष्ट्र. आग्य््रााला तेव्हाही होता ताजमहाल, पण राजांनी उभारले गडकोट, स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी. आता लोक त्यांना म्हणतात राजांची स्मारके. म्हणतात त्यांची निगा राखा, पण ती जुनी झाली. महाराष्ट्रधर्मीय अस्मितेसारखीच. नवधार्मिक अस्मितेसाठी नवीच प्रतीके हवीत. ते उभे राहतेय अरबी सागरात. रायगडाहून उंच. म्हणून तर त्या दर्याची मान अभिमानाने ताठ झालीय. ज्यांची झाली नाही, ते शिवरायांचे मावळे नव्हेतच. खुद्द नवे जिवाजी अर्थात देवेंद्रजी यांनीच तसे म्हटल्यावर तर तो दर्या हसूच लागलाय. अभिमानाने. सह्य़ाद्रीकडे पाहून..