दुपार झाली. उन्हाची ऊब जाणवू लागली अन् मतदार राजा केंद्रावर गर्दी करू लागला. केंद्राबाहेर सर्वपक्षीय मतदारांची तोबा गर्दी झाली होती आणि केंद्राच्या आत मतांची मोजणी सुरू होती. लाऊडस्पीकरवरून ऐकू येणाऱ्या आतल्या कुजबुजीकडे मतदार राजाचे कान लागले होते. एव्हाना कल स्पष्ट झाला होता आणि निवडणुकीचं राजकारण कोळून प्यालेला मतदार, जाहीर होणाऱ्या प्रत्येक निकालासोबत अचंबित होत होता. इतक्या निवडणुका बघितल्या, पण असं कधी झालं नव्हतं. मतमाऊलीचा आशीर्वाद कुणाला मिळणार हेही ठरल्यासारखं असायचं, त्यामुळे निकाल जाहीर व्हायच्या आधीच मतमाऊलीच्या जत्रेची तयारी पूर्ण झालेली असायची. झेंडेही तयार असायचे. फक्त, ‘उचल झेंडा, कर जल्लोष’ एवढंच बाकी असायचं. आज मात्र, गर्दी झाली, सगळे झेंडेही सज्ज झाले, पण मतदार मख्खच होता. कोणता झेंडा घेऊ  आणि कुणाचा जल्लोष करू तेच त्याला समजत नव्हतं.

‘याला त्रिशंकू म्हंत्यात राजकारनात!’ एक जाणकार मतदार म्हणाला. ‘अशी येळ पहिल्यांदाच आली म्हनं..’ कुणी तरी कुजबुजलं आणि अशी वेळ का आली याचं विश्लेषण गर्दीत सुरू झालं. ‘मतदार शहाणा असला की अशी वेळ येते!’ जाणकार मतदार गंभीर चेहऱ्याने म्हणाला आणि तमाम गर्दीतल्या प्रत्येकालाच अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे वाटू लागले. लांबवरून कुणी तरी उत्साही मतदारराजाने आरोळी ठोकली, ‘जगात भारी..’ ताबडतोब गर्दीचा प्रतिसाद उमटला, ‘आम्ही नगरी!’.. विजयी झालेल्या उमेदवाराच्या नावानं घोषणा देण्याऐवजी मतदारराजा स्वत:च्याच विजयाचा जल्लोष साजरा करत होता. हे पाहून त्या जाणकार मतदाराने हताशपणे मान हलविली.

‘मतमाऊलीचा कोप झालाय..’ तो मनातल्या मनात बोलला आणि ‘युती नाही’ म्हणणारे आता कोणता झेंडा हाती घेणार याचा विचार तो करू लागला. तेवढय़ात घोषणा झाली. कानठळ्या बसविणारा एक आवाज कानावर आदळला. तडीपार असलेला एक अपक्ष छिंदम विजयी झाला होता. अचानक गर्दीमध्ये चैतन्य सळसळले. ‘मतमाऊली प्रसन्न झाली म्हणायचं!’ जाणकार मतदार पुन्हा मनातल्या मनात बोलला. एव्हाना जल्लोष सुरू झाला होता. झेंडे नाचवत गर्दीतले उत्साही कार्यकर्ते घोषणा देऊ  लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार दुमदुमला आणि दोन बोटे उंचावत छिंदम बाहेर आला. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार झाला. जाणकार मतदाराचे डोळे नकळत भिंतीवरच्या महाराजांच्या तसबिरीवर खिळले.

डोळ्यांत दाटलेले अश्रू आनंदाचे की वेदनेचे हेच त्याला कळत नव्हते. डबडबलेल्या डोळ्यांनी पाहताना महाराजांची तसबीर थोडाशी अंधूकच झाली होती. तरीही त्याने मनात महाराजांचा जयजयकार केला. मतदानाआधी छिंदमच्या भावाने मतदान यंत्राची पूजा केली होती, म्हणूनच मतमाऊली प्रसन्न झाली असावी असा विचार त्याच्या मनात आला, पण ही अंधश्रद्धा आहे असे स्वत:स बजावत त्याने तो झटकून टाकला. डोळे पुसून त्याने गर्दीकडे पाहिले. महाराजांच्या जयजयकारात गर्दीचा जल्लोष सुरूच होता! जाणकार मतदाराने मनोमन मतमाऊलीला नमस्कार केला. एके काळी भाजपचा नेता असलेला अपक्ष छिंदम बोटे उंचावून आनंदाने हसत होता आणि त्रिशंकू पालिकेत तो कुणासोबत बसणार याचा विचार जाणकार मतदार करीत होता..