तत्त्वत: हे एक बरे झाले. नव्हे, उत्तमच झाले. माननीय नरेंद्र मोदी यांच्या सामथ्र्यशाली नेतृत्वाखाली काम करणारे मंत्री श्रीपाद नाईक यांच्या ‘आयुष’ खात्याने गर्भवती महिलांनी काय करावे, काय करू नये, हे सांगणारी एक पुस्तिकाच प्रसिद्ध करून टाकली. इतर कुणी असली पुस्तिका छापली असती तर आपल्याकडच्या लोकांनी तिकडे ढुंकून पाहिले नसते. मात्र मोदी सरकारमधील एका खात्याने अशी पुस्तिका छापली असल्याने ती मोलाची आहे. त्या पुस्तिकेतील शब्द न् शब्द लाख गुणाचा आहे. खरे तर आपली भारतीय संस्कृती, परंपरा याविषयी इतकी आस्था असलेले सरकार याआधी जनतेने कधी पाहिलेले नाही. आपली आधीची सरकारे गर्भवती महिलांना काही तरीच सल्ले द्यायची. अमक्या महिन्यात अमके इंजेक्शन घ्या, अमका त्रास असेल तर अमक्या गोळ्या घ्या.. वगैरे. सगळे आपले पाश्चात्त्यांचे उचलेकरी. मात्र मोदी सरकार अस्सल भारतीय आहे. आधीची सगळी सरकारे बाह्य़ गोष्टींना फाजील महत्त्व देणारी होती. हे सरकार अंतरात्म्याला, मनाला, आंतरिक सुखशांतीला अधिक महत्त्व देणारे, शाश्वत सुखाचा मार्ग दाखवणारे आहे. खरे म्हणजे सरकारने संस्कारांचा हा मार्ग केवळ विशिष्ट घटकाकरिता मर्यादित न ठेवता समस्त भारतीयांसाठी खुला करायला हवा. त्यासाठी स्वतंत्र खाते निर्माण करायला हवे. त्यासाठी पूर्णवेळ कॅबिनेट मंत्री द्यायला हवा. या संस्कार खात्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करायला हवी. ‘केंद्रीय संस्कार खाते’ असे त्याचे नामकरण करता येऊ शकेल हवे तर. खूप काही करता येईल या खात्यामार्फत. एखादी पंचवार्षिक वा दशवार्षिक योजनाही आखता येईल या खात्याला. भारतीय नागरिकांनी पाळावयासाठी (अर्थात त्यांच्या हितासाठीच) नियमावली आखता येईल या खात्याला. उदाहरणार्थ भारतीय नागरिकांनी सकाळी किती वाजता उठावे, जागे झाल्याझाल्या आधी कुठल्या दिशेस बघावे, प्रथम कुणाचे दर्शन घ्यावे, आन्हिके उरकताना तोंड कुठल्या दिशेस ठेवावे, कुठली योगासने करावीत, नोकरीधंद्यासाठी घरातून बाहेर पडताना आधी कुठले पाऊल पुढे करावे, नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणची आसनव्यवस्था कशी असावी, तेथील भरभराटीसाठी कुणाकुणाची व कसली कसली छायाचित्रे लावावीत, नोकरीव्यवसाय आटोपून किती वाजता घरी यावे, रात्रीच्या जेवणात काय पदार्थ असावेत, रात्री झोपताना कुठल्या दिशेला पाय करावेत आदी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबाबत सरकार मोलाच्या सूचना करेल. या सूचनांसाठी बाबा रामदेव यांच्या अध्यक्षतेखाली तत्सम योगी व दिव्य पुरुषांची एक समिती नेमता येईल. त्यांनी केलेल्या सूचना भारतीय नागरिकांनी पाळल्या तर त्यांचे कल्याण झाल्याखेरीज राहणार नाही; पण त्यासाठी आधी तातडीने केंद्रात संस्कार खाते निर्माण करणे गरजेचे आहे. ती काळाची गरज आहे आणि काळाची गरज ओळखण्यात माननीय नरेंद्र मोदी निष्णात आहेत. त्यामुळे ते ही गरजही ओळखतील, ही खात्री आहे.. अगदी शतप्रतिशत खात्री आहे.