हिप हिप हुर्रे… ढिंगचॅक ढिंगांग… शेवटी झाली रद्द, नेता असावा तर असा! आम्हा यंगस्टर्सचा विचार करणारा. त्यांना काय हवे, काय नको ते बघणारा. वेळोवेळी थेट मार्गदर्शन करणारा. नाही तर बाकीचे. बसले नुसते घोळ घालत. नेत्याने एकच मीटिंग घेतली- अर्ध्या तासात निर्णयसुद्धा! याला म्हणतात ‘रापचीक डिसीजन’. एकच खरे ‘नेता है तो मुमकीन है’. आता ठरले, पुढचे मत  यांनाच.  मनावर परीक्षेचे- तेही बारावीच्या- ओझे घेऊन जगणे किती कठीण असते, हे मोठ्यांना थोडीच समजणार? जून लागला तरी बाहेर पडायला बंदी. प्लेस्टोअरवर सर्च करायला मनाई. काही केले की मम्मा-पप्पांचे डोळे वटारणे सुरू. करून करून अभ्यास तरी किती करायचा? शेवटी  मेंदू आहे, मशीन नाही… पण कुणी ऐकायलाच तयार नाही. चोरून लपून जीएफला फोन केला तर तिचेही ठरलेले वाक्य ‘तुझी परीक्षा होऊ दे आधी’. ‘प्रँक’ करणे तर विसरून गेलो होतो या काळात. झाली एकदाची सुटका यातून. तेही सर्वोच्च नेत्याच्या पुढाकारामुळे. लब्यू नेताजी! आता काय? असा प्रश्न सारेच विचारताहेत. अरे यार, आहेत आमचे विश्वगुरू, काढतील ते मार्ग. तोवर तरी ‘झिंगाट’ करू द्या ना! तो आमचा बॅकबेंचर मंग्या. काल थेट मंत्रालयात फोन करून विचारू लागला. हेच धोरण कायम राहणार असेल तर सायन्सला अ‍ॅडमिशन घेतो म्हणून! तसेही मागच्या बाकावरच्यांचे डोके जरा जास्तच चालते. अबे, कशाला असा ‘शानपणा’ केला म्हणून विचारले तर डॉक्टर झाल्यावर मी अजिबात करोनावर औषध शोधणार नाही म्हणून खी खी हसला. झोमॅटोला फोन करून मिठाईसुद्धा मागवली शाण्याने. तिथल्या ऑनलाइन गर्दीचे किस्सेही सांगत होता चवीने. नाहीतर आमचे पिताश्री बघा. जसे कुणी मेले असे सुतक घेऊन बसलेले. आपण तर ठरवले. ड्रॉप घ्यायचा नाय. त्याच वर्गात बसायचे नाय. कुणी ढकलगाडी म्हणो की आणखी काही. आता अ‍ॅसेसमेंट कसे होणार? फॅकल्टीचा कल कसा कळणार? असल्या प्रश्नांवर विचारच करायचा नाही. आता काही दिवस तरी डोक्याला ‘शॉट’ नको. सगळे सामोरे जातील तसे जाऊ आपण. त्यात काय एवढे? सरकार पाठीशी असल्यावर टेंशन घ्यायचे नाय! काहीही झाले तरी टेंशन फ्री करणाऱ्या नेत्याला फॉलो करायचे. काल न्यूज ऐकल्याबरोबर पप्पा कुणाशी तरी तावातावाने बोलत होते. आता या मुलांचे कसे होणार, परीक्षा तर व्हायलाच हवी वगैरे वगैरे. ये पुराने लोग, नही सुधरेंगे… आणि परीक्षाकाळात करोना झाला असता तर? गेले असते ना… दोन, तीन लाख. यांना मुलाची काळजी सोडून परीक्षेचीच चिंता. अरे, वेळेत झाली असती तर दिलीच असती ना! नाही झाली त्याला कोण काय करणार? ‘परीक्षा पे चर्चा’ ऐकूनच तर तयारी केली होती, पण नेत्याचाही नाइलाज झाला. शेवटी ते जे काही करतात ते योग्यच. आताही ते एखादी चर्चा आयोजित करतीलच, पण पप्पांचे एकच टुमणे. करोनाचे कारण देत मुलांना शिकू न देण्याचा डाव आहे, यांना अर्धशिक्षितच लोक हवे आहेत, वगैरे वगैरे. अरे, किती राग कराल त्या फकिराचा. आजवर विद्यार्थ्यांचा विचार करणारा नेता कधी बघितला आहे का? नाही ना! मग ते आमच्या भल्यासाठी रद्दचा निर्णय घेत असतील तर उगाच बीपी कशाला वाढवून घेता? टीचरकी कशाला अंगात आणता? नेता आहे आमच्या पाठीशी, बघून घेईल की तो! चला थॉट खूप झाला. आता मंग्याला गाठायला पाहिजे. परीक्षा रद्द झाली म्हणून मुळुमुळू रडणारे आपले दोस्त नाहीत.