21 January 2019

News Flash

महामित्रांचा महानिर्धार..

देवेंद्रांनी देवसमितीची तातडीची बैठक बोलाविली.

सध्या कलियुगात समाजास सन्मार्गास प्रवृत्त करण्याची गरज असल्याने त्यासाठी काय करावे यावर चर्चा करण्यासाठी देवेंद्रांनी देवसमितीची तातडीची बैठक बोलाविली. सांप्रतकाळी समाजमाध्यम नावाच्या सरसकटपणे सर्वाहाती असलेल्या एका दुधारी हत्याराच्या वापराविषयी अनेक जण अनभिज्ञ असल्याने आणि ठरावीक कंपूच्याच हाती हे असलेल्या या हत्याराचा स्वैर वापर सुरू असल्याने सर्वत्र घोर असहिष्णुता माजली असून सहिष्णुतेच्या संस्थापनार्थ अवतार घ्यावा का, या विचाराने देवेंद्र चिंताग्रस्त होते. असहिष्णुतेपायी नकारात्मक बनत चाललेल्या समाजास या हत्याराचा विधायक वापर करण्याची सवय लावून विधायक सामाजिकता रुजविण्यासाठी काय करावे यावर विचारविनिमय करण्यासाठी जमलेल्या देवसभेत खलबते सुरू असताना अचानक नारदमुनी तेथे अवतरले आणि भूलोकी असे प्रयत्न अगोदरच सुरू झाले असल्याची माहिती देऊन त्यांनी सर्वाना अचंबितही केले. यासंबंधीचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी एकसदस्य समिती स्थापन करण्यात येऊन नारदांनाच त्याचे अध्यक्षपद देण्याचे ठरले तेव्हा काहींनी नेहमीप्रमाणे नाके मुरडली, पण नारद हे देवेंद्राच्या मर्जीतील असल्याचे जाणून सर्वानीच मौन पाळून या नियुक्तीचे स्वागत केले. अहवाल तयार करण्याचे सारे अधिकार प्राप्त होताच, देवेंद्रास प्रणाम करून भूलोकी महाराष्ट्र देशीच्या राजधानीत अवतीर्ण झालेल्या नारदांनी थेट मंत्रालय गाठले असता, समोरच सोशल मीडिया महामित्र नावाच्या महामोहिमेचा महाप्रारंभ होणार असल्याची सुवार्ता त्यांच्या कानी पडली. बाजूलाच महाभाजपच्या महामेळाव्याच्या पूर्वतयारीकरिता दानवेंची महाबैठक सुरू होती. त्याकडे दुर्लक्ष करून नारदांनी आपला मोर्चा महामित्र मेळाव्याकडे वळविला, आणि आता समाजात सहिष्णुतेचे पीक येणार या विचाराने नारदांना भरून आले. अदृश्यपणे त्या महामेळाव्यात प्रवेश करून नारद समाजमाध्यमांतील नकारात्मकता पुसून टाकण्यासाठी कटिबद्ध झालेल्या महामित्रांचे विचार मन लावून ऐकू लागले. ओळखपत्र मिळताच आपण आपल्या कामास सुरुवात करून समाजमाध्यमांत सकारात्मक विचार रुजविण्याची मोहीम सुरू करू असा काही महामित्रांचा निर्धार ऐकून नारदांना कृतकृत्य वाटले व ते भूलोकीच्या आपल्या मुक्कामी परतले. दुसऱ्या दिवशी सर्व स्थानिक वर्तमानपत्रांतील महामित्र मेळाव्याच्या बातम्यांवरून त्यांनी आपला अहवाल तयार केला. ‘समाजमाध्यम नावाच्या हत्यारास दुसऱ्या बाजूनेही तितकीच प्रखर धार असते. पण हे आधी त्यांच्या लक्षातच आले नव्हते. ते हत्यार सपासप चालवीत सर्वत्र आपलीच हुकूमत चालविणाऱ्यांना दुसऱ्या बोचऱ्या धारेचे सपकारे बसू लागले, तेव्हा हे एक दुधारी हत्यार आहे, याची पहिली जाणीव झाली. हेच हत्यार प्रतिस्पध्र्याच्याही हातात जाऊ शकते आणि त्याचा वापरही होऊ शकतो हे जाणवू लागल्यावर, ते जपून वापरा असा सल्ला महाअध्यक्ष अमितभाई यांनी दिल्याने, अगोदर समाजमाध्यमांवर कब्जा करणाऱ्या त्यांच्या फौजांचा आवेश आता ओसरला आहे. एका परीने ते बरेच झाले. पण या हत्याराच्या दुधारी गुणाची जाणीव झाली, तेव्हा तर खरी लढाई सुरू झालेली असल्याने हत्यार उपसताही येत नाही आणि म्यान करून मुकाटही बसता येत नाही अशी अवस्था झालेल्या या फौजा कुरुक्षेत्रावर संभ्रमात सापडलेल्या अर्जुनावस्थेत वावरू लागल्याने, एवढय़ा कष्टाने उभारलेल्या या आभासी सैन्यास आराम करू देणे परवडणारे नाही, हेही त्यांनीच अगोदर ओळखले. महाराष्ट्रातील महासरकारचा महामित्र परिवार ही त्या जाणिवेचीच निर्मिती आहे. ‘आता सर्वत्र सहिष्णुतेचे साम्राज्य स्थापित होईलच, त्यामुळे नव्याने अवतार घेण्याची गरज नाही,’ असा अहवाल तयार करून नारदांनी तो स्वर्गलोकी पाठवून दिला, आणि त्यांनी मुक्कामी परतण्याची तयारी सुरू केली.

First Published on March 27, 2018 3:00 am

Web Title: social media 6