19 October 2019

News Flash

बालिश बहु बडबडणे..

स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी गमावू असा भयगंड अलीकडे अनेकांच्या मनात बळावू लागला असावा.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

माध्यमांचा पसारा येनकेनप्रकारेण प्रसिद्धी देण्यासाठी तत्पर असताना या संधीचा लाभ न घेतल्यास आपण मागासांच्या गटात गणले जाऊ आणि स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी गमावू असा भयगंड अलीकडे अनेकांच्या मनात बळावू लागला असावा. ही अवस्था मोठी बिकट असते. त्यातून बाहेर पडायचे असेल तर आपल्या जिभादेखील सैल आहेत आणि काही मोजक्यांच्या जिभांप्रमाणेच आपल्या जिभेसही हाड नाही हे सिद्ध करावे लागते.  अशा प्रसिद्धीलोलुपांमध्ये भाजपच्या वाचावीरांची गणना केली नाही तर तो त्यांचा अपमान ठरावा अशी परिस्थिती त्यांनी स्वकर्तृत्वावर निर्माण करून ठेवली आहे. भाजपचा टिळा कपाळी लावलेल्या असंख्यांनी समाजमाध्यमांवर बरळण्याचा विक्रम प्रस्थापित करून आपल्या आगळ्या विचारशक्तीचे वेगळेपण वेळोवेळी सिद्धच केले आहे. ते वेगळेपण एवढे फोफावले, की काही तरी वेगळे चघळण्यासाठीच भुकेलेल्या या माध्यमांना त्याची चटक लागली आणि नेमक्या त्याच वेळी बरळण्याचा साठा शिळा होऊ  लागल्याच्या भावनेने सारे वाचावीर हतबल होऊन गेले. हीच संधी साधून समोरूनच हल्ले सुरू झाले. आता प्रतिहल्ला करावा की जिभा म्यान करून स्वस्थ बसावे अशा पेचात सरावलेल्यांची फळी सापडलेली असतानाच, नवी फळी पुढे सरसावू पाहात आहे. यामुळे या कंपूत आता आशेची नवी पालवी फुटू लागली आहे. माध्यमांचा एकतर्फी पुरेपूर वापर करून झाल्यानंतर प्रतिस्पध्र्याकडून जोमदार हल्ले सुरू झाले तेव्हा समाजमाध्यमांचा जबाबदारीने वापर करा, असा सल्ला देऊन संघटनेत वैचारिक सुसंस्कार घडविण्याचा एक औपचारिक प्रयत्न अमितभाई शहा यांनी करून पाहिला होता; पण त्याचा फारसा फायदा झाला नाहीच, उलट बेताल बडबडण्याची जणू स्पर्धा लागली. अशा परिस्थितीत, अशा स्पर्धेत उतरल्यास आपले नाव होते, हे नव्याने उमगलेल्या नव्या दमाच्या नेत्यांनी आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार उधळत आपले स्वत:चे विचारधन व्यक्त करण्यास सुरुवात केली तर तो त्यांचा दोष नाही. काही मोजकी मंडळी मनास येईल तसे बरळून देशविदेशात आपल्या नावाची चर्चा घडवून आणतात आणि आपण मात्र काहीच न बोलण्यात शहाणपण असल्याचे समजून स्वस्थ बसतो हे जाणवल्यानंतर आपली चूक सुधारण्याच्या योग्य संधीची वाट पाहावी आणि ती सापडताच त्याचा लाभ उठवावा, असा विचार ते करत असतील, तर त्यांचे काय चुकले? प्रसारमाध्यमे किंवा समाजमाध्यमांवर वैचारिक कचरा करू नका, असे बजावणाऱ्या पंतप्रधानांना आभाळाएवढे मोठे ठरवून राहुल गांधींना गटारातील किडा ठरविले तर एका दगडात दोन पक्षी मारल्यासारखे होईल हे वैचारिक शहाणपण अश्विनी चौबे नावाच्या केंद्रीय मंत्र्यास सुचले नसते, तर त्यांचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले तरी असते का? तसेही, बेताल बरळणे हा प्रसिद्धीचाच एक मार्ग असल्याचे आता जगभर सिद्धच झाले आहे. जोवर सौंदर्यवती स्त्रियांची संख्या वाढत जाईल, तोवर बलात्कारासारखे प्रकारही वाढतच राहतील, हा एक विचार रॉड्रिगो द्युएर्ते या फिलिपिनी राष्ट्रप्रमुखाने काल मांडला आणि आज त्याचे नाव जगभर पोहोचले. अन्यथा, तुमच्याआमच्या जगाचे या राष्ट्रप्रमुखाशी काही देणेघेणे तरी होते काय?

First Published on September 3, 2018 2:16 am

Web Title: social media in india