‘नमस्कार, मी ‘मुख्यकर्मी’ पूर्वा व माझ्या सहकारी पश्चिमा व उत्तरा, स्कायजेटच्या ‘एसजी ४१४२’ विमानात सर्व वऱ्हाड्यांचे (लगेच जीभ चावत) सॉरी प्रवाशांचे स्वागत करते. दोन तासाच्या या ‘जॉयराइड’ मध्ये काय घडणार आहे याची सर्वांना कल्पना आहेच. त्याविषयी बाहेर कुठेही वाच्यता करायची नाही याच अटीवर आम्ही हे ‘बुकिंग’ स्वीकारले आहे. त्यामुळे या काळात सर्व १६१ प्रवाशांनी मोबाइलचा वापर टाळावा अशी आग्रहाची विनंती. विमानतळावर ‘सिक्युरिटी चेक’च्या लक्षात येऊ नये म्हणून बुरखा घालून आलेल्या दक्षिणा व राकेश या वधूवरांना तो काढण्याची अनुमती आम्ही देत आहोत. सर्व प्रवाशांना पुन्हा एकवार सूचित करते की त्यांनी ‘सीटबेल्ट’ काढून जागेवरून उठू नये.

(पंधरा मिनिटांनंतर)

नमस्कार, आता आपण मदुराईच्या वर दहा हजार फूट उंचीवर आहोत. बरोबर दहा मिनिटांनी हे विमान पाच हजार फुटापर्यंत खाली येईल व मीनाक्षी मंदिराच्या वर केवळ पाच मिनिटे घिरट्या घालेल. आपले पायलट ईशान्य कुमार यांनी मुहूर्ताचा वेळ साधण्याची किमया बरोबर जुळवून आणली आहे. मी वधूवर, त्यांचे मातापिता व मंगलाष्टके ज्यांच्या मोबाइलमधून वाजणार आहेत, अशा वधूच्या मामाला ‘केबिन क्रू’ जवळ असलेल्या मोकळ्या जागेत येण्याचे निमंत्रण देते. कृपया इतरांनी जागेवरूनच हा सोहोळा बघावा. लहान मुलांनी ‘पॅसेज’मध्ये फिरू नये. नंतर त्यांना चॉकलेट दिले जाईल. माझ्या सहकाऱ्यांनी अक्षता प्रत्येकाच्या हातात दिलेल्याच आहेत. त्या तिथूनच फेकून सर्वांनी वधूवराला शुभाशीर्वाद देऊन ‘कोविड प्रोटोकॉल’चे पालन करावे.

(लग्न लागल्यावर)

स्कायजेटच्या वतीने मी वधूवरांचे अभिनंदन करते. देवाच्या सन्मुख लग्न व्हावे ही प्रत्येकाची इच्छा असते. आज वधूपित्याच्या कल्पकतेमुळे देवळाच्या वर आकाशात उंच ठिकाणी हे लग्न लागले आहे. समस्त भारतीयांच्या श्रद्धेचा आदर करणे हेच आमच्या कंपनीचे ध्येय असल्याने अतिशय प्रतिकूल स्थितीत आम्ही या उपक्रमात सहभागी झालो, याचा अभिमान आम्हाला आहे. विमान दोन मिनिटे मंदिराच्या भोवताली घिरट्या घालणार असल्याने सर्वांनी देवीचे आशिर्वाद घ्यावेत. यानंतर सर्वांना जागेवरच लग्नाचे जेवण ‘सव्र्ह’ करण्यात येईल. यात इडली, मेदूवडा, रस्सम्,भात व मदुराईचा फेमस मालपुवा असेल. कृपया खाली सांडणार नाही याची दक्षता घ्यावी. करोना झाल्यामुळे आमचा ‘ग्राउंडस्टाफ’ अतिशय कमी संख्येत कामावर आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी. खाण्यापूर्वी वधूवरांजवळ जाऊन अभिनंदन करण्याची प्रथा कृपया इथे पाळू नका.  ज्यांना भेटवस्तू द्यायची आहे त्यांनी ती विमानतळाच्या बाहेर द्यावी. लग्न झाल्याच्या आनंदात जागेवरच उभे राहून नाचण्याचा प्रयत्न कुणी करू नये.   तसे केल्यास संबंधिताला ‘नो फ्लाय लिस्ट’ मध्ये टाकण्यात येईल.

(अर्ध्या तासानंतर)

नमस्कार, आपण लवकरच आता मदुराईला उतरणार आहोत. आपण सर्वांनी या प्रवासात सहकार्य केले, तसेच या शुभकार्यासाठी ‘स्कायजेट’ची निवड केली त्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत. कृपया वधूवरांनी पुन्हा बुरखा घालून घ्यावा. ‘सुरक्षाजांच’ मधून बाहेर पडेपर्यंत लग्नाचा आनंद व्यक्त करणारे कोणतेही वर्तन करू नये. ज्यांच्याजवळ आरटीपीसीआरचा रिपोर्ट नसेल, त्यांनी ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का सहन करावा. आम्ही आशा करतो की आम्हाला आपल्या सेवेची पुन्हा संधी द्याल, धन्यवाद!