News Flash

पत काही वाढंना..

दसरा गेला.. दिवाळीपण गेली.. आता पुढच्या महिन्यात हे साल संपेल.

दसरा गेला.. दिवाळीपण गेली.. आता पुढच्या महिन्यात हे साल संपेल. दसऱ्याला अशी झेंडूच्या पिवळ्याधम्मक फुलांनी सजलेली नवीकोरी बुलेट दारापुढं उभी राहील, तिची पूजा करायला मिळेल असं वाटलेलं. पण नाही झालं. दसऱ्याला नुस्तंच सोनं लुटलं. दिवाळीला पयल्या आंघोळीनंतर सकाळच्या गार वाऱ्यात, कवळ्या उन्हात, काळ्या मातीवर चाकोऱ्यांची नक्षी उमटवत दिमाखात नव्या बुलेटवरून गावातून फिरता येईल, असं वाटलेलं. पण नाही झालं. दिवाळीला नुस्ताच फराळ केला. आता थट्टीफस्टला तरी दारासमोर बुलेट झुलताना दिसू दे. नाय तर थट्टीफस्टपण कोरडाच जायचा. कोरडा म्हंजे नव्या बुलेटविना. तर आता ही बुलेटची कहाणी काय सांगायची. तसं आमच्या घरचं चांगलंच आहे. बागायती आहे बरी. घरी गाडी आहे एक. जुनी. आजकाल लई कुरकुर करते. म्हाताऱ्याला म्हंजे परमपूज्य पिताश्रींना म्हटलं, नवी बुलेट आणू. तर एकदा पाह्य़लं माझ्याकडं न् म्हणाले, ‘पत वाढवा आधी स्वतची. नवी बुलेट आणायची म्हणं. गावात फिरून तपासा पत किती आहे स्वतची ते.’ हे संभाषण दसऱ्याच्याही आधीचं. तर तेव्हापासून पत वाढवायचा प्रयत्न करतोय. काय काय नाही केलं त्यासाठी. सायकलवरनं तालुक्याला गेलो. नवी पायताणं विकत घेतली. अस्सल कोल्हापुरी. डिझाइन पण एकदम भारी. कसली कर्रकर्र वाजते चालताना. पिताश्रींपुढनं मोठय़ा टेचात चाललो. पण त्यांनी बघितलंपण नाही. पत काही वाढंना. पुन्हा तालुक्याला गेलो. एक झक्क विजार आणि पांढराफेक झब्बा घेतला विकत. वर एकदम मॅचिंग कोट. ते कपडे घालून गेलो म्हाताऱ्यापुढं. लक्ष जावं त्यांचं माझ्याकडे म्हणून घुटमळलो. तर माझ्याकडे ढुंकूनसुदिक न बघता म्हणाले, ‘ते अंगनात कव्हाधरून आंबिलीचं घमेलं पडलंय. धुऊन ठेवा.. माश्या झोंबल्यात त्याला.’ पत काही वाढंना. पुन्हा गेलो तालुक्याला. डोईवर बांधायला असला भारी फेटा घेतला. कसला जबरी कलर. एके दिवशी सकाळी पायांत कोल्हापुरी चपला, अंगात विजार-झब्बा-कोट, डोस्क्याला रंगीत झोकदार फेटा असं घालून गेलो पिताश्रींपुढं. मनात म्हटलं आज नव्या बुलेटचा विषय काढूच. बघितलं तर पेप्रात डोकं खुपसलेलं त्यांनी. आणि स्वतशीच मोठमोठय़ानं बोलत होते.. ‘काय बेणं हाय. पत काही वाढत नाही अजून. त्या एस्सपीनं पत टांगलीये. दोन वर्षे पत वाढवणार नाही म्हणतायत. अरे नुसते दंड, बेटकुळ्या काय दाखवता, कामं करा की काहीतरी. कामं केली की पत वाढते आपसूक. नुस्त गावभर बोंबा मारत फिरलं, मिरवलं की पत वाढत नसते..’ बोलता बोलता त्यांनी माझ्याकडे पाहिलं. ‘काय युवराज, घमेलं उचललं का परवा सांगितलेलं. माश्या झाल्यात. म्हणलं ना तुम्हाला. एक काम धड करशाल तर शप्पथ’. ‘उचलतो.. उचलतो..’ म्हणून आम्ही निमूट मनानं अंगणात गेलो. तिथली जुनी गाडी आमच्याकडं बघून, दात विचकत हासत होती..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2016 2:52 am

Web Title: standard poors financial services company
Next Stories
1 पिंजऱ्यातले वाघ, बाहेरचे सिंह..
2 या डीएनएवरी उतारा..
3 उद्याचा अभिमन्यू
Just Now!
X