‘मिळाली तर खिडकी, नाही तर दरवाजा’ हे ज्या मुंबईकरांच्या प्रवासाचे धोरण असते, त्यांना अशा बातम्यांचे काही अप्रूप वाटणार नाही. दरवाजाच्या दांडीला लोंबकळून प्रवास करणाऱ्याला, पॅसेजमध्ये उभे राहायला मिळाले तरी ते मोठे प्रवाससुख वाटते. असे सुखही अभावानेच अनुभवायला मिळणाऱ्या मुंबईकरांची संख्या घटत चालली, तेव्हापासून अनेक प्रवाशांनी स्वखुशीनेच दरवाजाची दांडी हाच आपल्या सुखी प्रवासाचा उपाय मानला. जमिनीवरून प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला ‘बस’ असे म्हटले जात असले, तरी बसलेल्या प्रवाशांपेक्षा उभे राहणाऱ्या प्रवाशांची संख्या दुप्पट होत नाही तोवर ही बस सुरूच होत नसते. त्यामुळे ‘स्टॅण्डिंग सिटा’ या प्रकारास कुणाचाच आक्षेप असणार नाही. उलट, बसायला मिळाल्यानंतरच्या अनेक कटकटखोर नियमांची बंधने नसल्याने उभ्याचा प्रवास सोयीचा असेच हे धोरण असते. ‘शरीराचा कोणताही भाग खिडकीबाहेर काढू नका,’ अशा सूचना वाचण्याचे कारण राहत नाही, शिवाय खूप वेळ उभे राहण्याचे काही आरोग्यविषयक फायदेही आपोआपच पदरात पडतात, तोल सांभाळण्याची कसरत साधता येते आणि ‘मार्गिकेतून पुढे सरकत राहा’ या संदेशाचे पालन केल्यास आरामात बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशांआधी उतरून आपला रस्ता धरता येतो. उभ्याने करावयाच्या प्रवासाचे हे असे असंख्य फायदे ‘बस’ नावाच्या वाहनातून मिळत असल्याने, ‘एअरबस’मध्येही उभ्याने प्रवास करण्यात अशा प्रवाशांना तरी अडचण येण्याचे कारण नाही. तशी वेळ अलीकडच्या काळात आपल्या देशात आलेली नसली, तरी अनेक वर्षांपूर्वीच्या वायुदूतचे अजूनही रंगवून सांगता येतील एवढे किस्से अनेकांच्या आठवणीच्या कप्प्यात ताजे असतीलच! पाकिस्तानच्या इंटरनॅशनल हवाई बसचा ताजा किस्सा ऐकल्यावर, त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या असतील आणि रुमाल टाकून खिडकीची जागा पकडल्याचा पराक्रमही एखाद्या कुणी अभिमानाने दुसऱ्या कुणाला सांगितलाही असेल. पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ताफ्यातील बोइंग ७७७ या महाकाय विमानात ४०९ प्रवाशांची बसण्याची सोय असताना, ४१६ प्रवाशांना या विमानाने कराची ते मदिना हा आंतरराष्ट्रीय प्रवास घडविला, त्यामुळे साहजिकच सात प्रवाशांनी विमानातून उभ्याने प्रवास केल्याच्या बातम्या बाहेर फुटल्याच. पाकिस्तानच्या या विमानसेवेच्या प्रवक्त्याने त्याचा इन्कार केला, पण विमानातून उभ्याने प्रवास करण्याच्या या कल्पनेमुळे, उपनगरी रेल्वेत लोंबकळत किंवा एसटीच्या बसमध्ये ताटकळत लांबचा पल्ला गाठणाऱ्या प्रवाशांना जागतिक स्पर्धक तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानातील ही विमानसेवा अगोदरच तोटय़ात चालत असल्याने, ‘एक एक प्रवासी मोलाचा’ हा उदात्त विचार अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील रस्ते ‘बहुजन हिताय’ पालथे घालणाऱ्या एसटीच्या धोरणाशी एवढा मिळताजुळता असल्याने, जनहिताच्या मुद्दय़ावर जगात कुठेही एकमतच असते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. रेल्वे असो, बस असो किंवा एअरबस असो.. उभ्याने प्रवासाचा अनुभव आनंदाने उपभोगणारे ‘सारे प्रवासी घडीचे’ सर्वत्र सारखेच!