राजकारण तसे कशाचेही करता येते. ते जित्यांचे करता येते, तसेच मेलेल्यांचेही करता येते. अगदी हार्दिक श्रद्धांजली वाहून, पुतळे वगैरे उभारून करता येते. पुतळ्यांचे एक बरे असते, ते कुणाच्याही राजकारणाला विरोध करीत नाहीत. उलट राजकारणासाठी पुतळे हे सर्वोत्तम अस्त्र उभारणे, उभारण्याची केवळ घोषणा करणे, पुजणे, पाडणे, विटंबना करणे या काही ते अस्त्र चालविण्याच्या पद्धती. माणसे किमान डोक्याने तरी जायबंदीच होतात त्याने. त्यासाठी तो पुतळा माणसाचाच असावा लागतो असेही काही नाही. तो श्वानाचा चालतो, अश्वाचाही चालतो. उत्तराखंडमध्ये सध्या अश्वाच्या पुतळ्याचे राजकारण अगदी घोडय़ासारखे उधळलेले दिसते ते त्यामुळेच. या अश्वाचे नाव शक्तिमान. साध्या पोलिसांचे ते घोडे. गेल्या मार्चमध्ये पोलिसी कामावर गेले. तेथे आंदोलकांच्या नेत्याने त्याचे पाय सडकून काढले काठीने. यास कोणी गाढवपणा म्हणेल, पण हा नेता माणूसच होता हे आणखी एक विशेष. तशात तो आमदार. गाईसारख्या प्राण्याला माता मानणाऱ्या भाजपचा. एवढय़ाशा फटक्यांनी तो शक्तिमान जायबंदी झाला. अशा वेळी त्याला रस्त्यावर सोडून द्यायचे ही झाली रीत. पण त्याच्यावर उपचार केले. अमेरिकेतून कृत्रिम पाय आणून बसविला त्याला. तरीही ते मेले. झाले गेले मातीला मिळाले. पण सरकारला प्राणिप्रेमाचा पुळका आला आणि त्या बिचाऱ्या अश्वनिर्दालक आमदार गणेश जोशींना अटक झाली. आणि आता काय, तर त्या अश्वाचे चक्क पुतळे बांधत आहेत. पोलिसांनी प्रेमाने पुतळा बांधला हे समजण्यासारखे आहे. पण सरकारनेही भरचौकात पुतळा उभारावा? ते अश्व म्हणजे काय चेतक घोडा की कृष्णा घोडी आहे? त्यापासून लोकांनी काय शिकायचे? उगाच त्यातून गणेश जोशींचेच नाव अमर होणार! तेव्हा मग आमच्या गोमातापूजकांनी जोरदार अभियान उभारले त्या विरोधात. ‘शहीद पोलिसांचे पुतळे उभारत नाहीत आणि घोडय़ाला महत्त्व देता?’, ‘असे पुतळे उभारण्यापेक्षा गरिबांच्या योजनांवर ते पैसे खर्च करा’, ‘पुतळे उभारून का देश पुढे जाणार आहे?’ या प्रतिक्रियांची नोंद झाली. काहींना कदाचित या पुतळ्याची उंची तीनशे वगैरे फूट नसल्यानेही हा संताप आला असणार. त्या संतापापुढे हरीश रावतांचे सरकार मात्र नरमले. निवडणूक जवळ आल्यावर सरकार असे नरमतेच. त्यांनी तो पुतळाच हटवला. त्याचीही एक गंमतच. रावतांनी म्हणे भाजपच्या जल्पकसेनेस घाबरून नव्हे, तर कोणा ज्योतिषाच्या सल्ल्यामुळे तो हटवला. एकंदर काय, तर या शक्तिमानास दोनदा दफनाचे भाग्य लाभले! त्याच्या पुतळ्याचे हे राजकारण कोणाच्या फायद्याचे ठरते हे एवढय़ात काही समजणार नाही. पण एक मात्र खरे, की त्याने जिवंतपणी आपले काम चोख बजावलेच, पण मेल्यानंतरही तो राजकारणाच्या कामास आला. पुतळ्यांचे कामच तर हे असते. उगाच का लोक पुतळ्यांची माळ उभारतात? पुतळ्यांवरून प्रचार करतात?