News Flash

पुतळ्यांची माळ..

पश्चिम बंगालातील ममतादीदींचा नवा अस्मितादर्श त्याचा पुरावा ठरला, की त्यावर शिक्कामोर्तब होईल!

(संग्रहित छायाचित्र)

कुणी त्याला अस्मितेचा मुलामा चढवितो, तर कुणी देवत्व बहाल करतो. पण काहीही असले तरी, जागोजागी उभारले जाणारे पुतळे हा बहुतांश वेळा निव्वळ राजकारणाचाच भाग असतो, हे आता पुरते स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांत अनिर्बंध बांधकामे व जागेच्या व्यापारीकरणामुळे प्रत्येक माणसाला सहज वावरणेही मुश्कील होत असताना, या देशात पुतळ्यांची मात्र कमतरता नाही. उत्तर प्रदेशात एकेकाळी हत्ती, कांशीराम आणि स्वत:च्या पुतळ्यांची माळ गुंफणाऱ्या सुश्री बहन मायावती यांनी तर- ‘‘अस्मिता आणि जनतेच्या भावना जपण्यासाठी पुतळे हवेतच,’’ असा युक्तिवाद साक्षात न्यायालयासमोरच केला आहे. उत्तर प्रदेश हे राज्य वेगवेगळ्या काळांत वेगवेगळ्या कारणांमुळे गाजते. मायावतींच्या कारकीर्दीत ते पुतळ्यांचा प्रदेश म्हणून गाजले होते, हे आपणास आठवत असेलच. लखनऊ आणि नोएडामध्ये जनतेच्या पैशांतून पुतळ्यांच्या माळा उभारण्याकरिता खर्च केलेल्या कोटय़वधींच्या निधीचा वापर शिक्षणादी सुविधांसाठी वापरता आला असता का, हा न्यायालयाच्या चर्चेचा विषयच नाही, असेही मायावती यांच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यामुळे पुतळे उभारणे आणि त्यासाठी कोटय़वधींचा खर्च करणे हा निर्विवादपणे राजकीय नेत्यांच्या मर्जीचा मुद्दा ठरतो. आपले पुतळे उभारावेत ही जनतेचीच भावना होती, असेही मायावतींना वाटले होते. जनभावनांचा असा प्रेमळ कल्लोळ कोणत्या रूपात साकार होईल, ते सांगता येत नाही, हेच खरे.. तो ज्यांना ओळखता येतो, ते नेते प्रसंगी स्वत:चेही पुतळे उभारण्याचा सोपा मार्ग निवडतात. आपल्या महाराष्ट्रात अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचे पुतळारूपी स्मारक उभारण्याची चर्चा सुरू होऊन जेवढा काळ झाला, त्या काळात पश्चिम बंगालमध्ये असंख्य पुतळ्यांच्या रूपाने स्थानिक अस्मिता साकारदेखील झाल्या आहेत. येत्या काही महिन्यांत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे तर जनतेच्या भावना आणि अस्मिता जपण्याचे हक्काचे निमित्त असल्याचे ओळखून ममतादीदींनी मायावतींच्या पावलावर पाऊल टाकले, यात आश्चर्य काहीच नाही. गेल्या काही महिन्यांत महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, भगिनी निवेदिता यांच्यापासून अनेक लहानसहान नेते, क्रांतिकारकांचे पुतळे अचानक शहराशहरांत उभे राहिले. निवडणुकीच्या तोंडावर बंगाली अस्मितेचे दर्शन देशाला घडले. पश्चिम बंगालमधील पुतळ्यांची चर्चा होत असताना, महाराष्ट्रातील शिवछत्रपतींच्या आणि उत्तर प्रदेशातील रामाच्या पुतळ्याच्या केवळ घोषणांनीच स्थानिक जनतेच्या अस्मितांना नवे धुमारे फुटण्याची वेळ आता येणार आहे. गुजरातेतील लोहपुरुषाच्या पुतळ्याचे अनावरण झाले तेव्हा उत्तर प्रदेशात रामाच्या पुतळ्याची घोषणा करून आदित्यनाथांनी स्थानिक अस्मितेवर फुंकर मारलीच होती. पाठोपाठ तिकडे तमिळनाडूमध्ये जयललितांचा भव्य पुतळा पक्षाच्या मुख्यालयात दाखलही झाला. पुतळ्यांच्या या माळा म्हणजे राजकारणातील यशाचा उत्तम मार्ग ठरू शकतो. फक्त, कोणत्या वेळी, कोणाचा पुतळा कोठे उभारल्यास जनतेच्या अस्मितांचा आदर होईल, याचा नेमका अंदाज आला पाहिजे. तो ज्याला येतो, त्याला यशाचे गमक समजले असे म्हणतात. पश्चिम बंगालातील ममतादीदींचा नवा अस्मितादर्श त्याचा पुरावा ठरला, की त्यावर शिक्कामोर्तब होईल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 1:53 am

Web Title: statue of statues ulta chasma article akp 94
Next Stories
1 ‘देवाचे दुसरे नाव’..
2 कांद्याकडून वांध्याकडे..
3 सांगू वडिलांचीच कीर्ती..
Just Now!
X