सांप्रती कॉर्पोरेट भारत देशामध्ये भारताच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय झालेच तर ऐतिहासिक, भौगोलिक, जीव-रसायन-भौतिकादी वैज्ञानिक आणि अर्थातच धार्मिक प्रगतीसाठी अहोरात्र झटत असलेल्या दोन-तीन महापुरुषांमध्ये डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. ते खरे तर देशाचे पंतप्रधानच व्हायचे. त्यांच्या पत्नी रोक्झाना यांनाही तसेच वाटते. पण त्यांच्या पक्षाला बहुमत मिळू शकले नाही. कारण त्यांच्या त्या जनता पक्षात तेच अध्यक्ष व तेच सभासद होते. या देशातील मतदार बंधू-भगिनींना अक्कल नाही हेच खरे. तरीही स्वामीजी हाती पीआयएलचे शस्त्र घेऊन लोकांसाठी झटत आहेत. पूर्वी ते महर्षी चंद्रास्वामी यांच्या आशीर्वादाने झटत असत. सध्या प. पू. आसाराम यांचा ऋषी प्रसाद सेवन करून झटत आहेत. आसारामबापूंसारख्या गरीब-बापडय़ा बलात्कार-आरोपीस त्यांनी क्लीन चिट देऊन न्यायालयाचे मोठेच काम कमी केले. त्यामुळे भाविकगण त्यांना क्लिन चिटर असेही म्हणतात. सध्या ते कॉर्पोरेट भारताला महासत्ता बनविण्यासाठी मोदी यांचे हात बळकट करीत आहेत व अर्थमंत्री अरुण जेटली यांचे पाय ओढत आहेत. कॉर्पोरेट भारतास अमेरिकेहून खूप मोठे म्हणजे इस्रायलएवढे बलशाली करायचे असेल तर मोदी यांना नको असलेल्या सगळ्यांचेच पाय ओढणे त्यांना भागच आहे. अखेर मोदी एकटे कुठे-कुठे पुरे पडणार हा प्रश्न आहेच. अलीकडेच स्वामीजींनी रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचेही पाय ओढले. तेव्हा राजन हे घाबरूनच गेले. वस्तुत: कर नसते त्यास डर नसतो. परंतु राजन हे काही कर-तच नव्हते. ते काँग्रेसचे व अमेरिकेचे एजंट होते. म्हणून ते येथील अर्थव्यवस्था सुधारूच देत नव्हते. बँकांची मुस्कटदाबी करीत होते. कॉर्पोरेट भारतास कर्जच मिळू देत नव्हते. कर्ज घेणे, त्याचे हप्ते थकविणे, त्याची पुनर्बाधणी करणे यातूनच तर देशाची प्रगती होत असते. राजन त्याच्या आड आले. तेव्हा स्वामीजींनी असे काही मंत्र म्हटले की राजन यांचे संकट आपसूकच हटले. यास खरे राष्ट्रकार्य म्हणतात. यामुळे आता येथील उद्य्ोगपतींना, बुडत्या बँकांना इस्रोच्या उपग्रहाप्रमाणे उडता येईल. परंतु स्वामींचे कार्य संपलेले नाही. आता त्यांना आणखी एक संकट स्वाहा करायचे आहे. त्याचे नाव अरविंद सुब्रह्मण्यम. ते आडनाव बंधू असले, तरी स्वामी गांडीव टाकणारे नाहीत. केजरीवालांचे नाव धारण करणारे हे संकट सध्या सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार आहे. परंतु स्वामींसारखे थोर अर्थपंडित सेवेस तत्पर असताना अशा देशविरोधी सल्लागारांची गरज ती काय? त्यांना नेमणे ही मोदींची चूकच. स्वामीजी ती दुरुस्त करणार आहेत. त्यांचे काम अशा प्रकारे अविरत सुरू राहणार आहे. त्यांच्या हितचिंतकांना भय एकाच गोष्टीचे वाटते, की असे सर्वावर आरोप करता करता कदाचित स्वामीजी स्वत:च्याच हकालपट्टीची मागणी तर करणार नाहीत ना?