आपल्या ताफ्यात तैनात केलेले वाचाळवीर सुब्रमण्यम स्वामी यांना थेट सरकारात सामील करून घेण्यावर आता तरी सत्ताधारी भाजपने गांभीर्याने विचार करावयास हवा. कारण त्यांच्या वक्तव्यांची देशातच नव्हे तर परदेशातही गंभीर दखल घेतली जाऊ लागली असून त्यायोगे सरकारला सारवासारव करण्याच्या नवनव्या संधीदेखील उपलब्ध होऊ लागल्या आहेत. सध्या विरोधात असलेल्या काँग्रेसकडे पूर्वापारपासून दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर, अशा एकाहून एक सरस अशा वाचाळवीरांची फौज असल्याने, त्यांना पुरून उरेल असा कोणी तरी नेता सत्तेवर असलेल्या भाजपला हवाच होता. ही पोकळी भरून काढण्यासाठी भाजपने स्वामीजींना पक्षाच्या परिघावर आणून ठेवले आणि बघता बघता त्यांनी परिघावर आपलाच केंद्रबिंदू निर्माण केला. काँग्रेसी वाचाळवीरांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर मात करून त्याहूनही वादग्रस्त विधाने करण्याच्या स्पर्धेत भाजप कुठेही कमी पडणार नाही, याची हमी स्वामी नावाच्या या नेत्याकडून एव्हाना पक्षाला मिळाली असेल.. एरवीही देशात वाचाळवीरांची कमतरता नाही. स्वामी, गुरुमूर्ती, मणिशंकर, दिग्विजय हे त्यातील सध्याचे अग्रणी. हे स्वामी आणीबाणीच्या काळात अटक वॉरंट असताना लोकसभेत अवतरले आणि तसेच पसारही होऊन सुरक्षा यंत्रणांना त्यांनी चकवा दिला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात अडकवून स्वामी यांनी मायलेकाच्या डोकेदुखीत वाढ केली. भाजपची राज्यसभेची खासदारकी हे त्याचेच बक्षीस! राजकीय परिघावरील नेत्यांच्या वर्तुळात स्वत:चा केंद्रबिंदू निर्माण करणारा कोणताही नेता कधी ना कधी पक्षाला आणि त्यातही, सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणतोच, हे अनुभवण्याची पाळी आता भाजपची आहे. अलीकडेच स्वामी यांनी केलेल्या ट्वीटने नवा वाद ओढवला. मालदीव या राष्ट्राशी आपले संबंध ताणलेले आहेत. पदच्युत राष्ट्राध्यक्ष निशाद यांची बाजू भारताने उचलून धरल्याने सत्ताधारी गयूम यांच्या राजवटीचे भारताशी फार काही सख्य नाही. मालदीवमध्ये पुढील महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होत आहे. भारतासाठी भौगोलिकदृष्टय़ा महत्त्वाचे राष्ट्र असलेल्या मालदीवच्या निवडणुकीतही सुब्रमण्यम स्वामी यांनी नाक खुपसले आणि भारताची कोंडी झाली. मालदीवच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्यास भारताने या राष्ट्रावर आक्रमण करावे, असे स्वामींचे म्हणणे! स्वामी भाजपचे खासदार नसते तर त्यांच्या या ट्वीटची कोणी दखलही घेतली नसती; पण मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने ते गांभीर्याने घेतले आणि सारवासारव करण्यासाठी भारत सरकारला कसरत करावी लागली. एकदा अशा कसरती सुरू झाल्या, की सर्कस पाहणाऱ्यांची चांगलीच करमणूक होऊ लागते आणि कसरतींची भूक भागविण्यासाठी अशा वाचाळवीरांना सरसावून पुढे व्हावे लागते. रिझव्‍‌र्ह बँकेवर अर्धवेळ संचालक म्हणून नियुक्त झालेले स्वदेशी जागरण मंचचे गुरुमूर्ती यांनी सबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यात आल्यानेच निसर्गाचा कोप झाला असावा, असे मत मांडून आपणही मागे नाही हे दाखवून दिले. काँग्रेसने त्या पक्षाचे वाचाळवीर दिग्विजय सिंग यांची बोलतीच बंद केली. त्यांना नवी दिल्लीतून थेट भोपाळमध्ये धाडण्यात आले, तर मणिशंकर अय्यर पक्षातून निलंबित झाले. असे नेते ही कधी कधी पक्षाची बुद्धिसंपदा असते. कारण जेव्हा अडचणीचे मुद्दे डोकी वर काढतात, तेव्हा त्यांवर पांघरूण घालण्यासाठी यांचीच वक्तव्ये राजकारणाला हात देत असतात. स्वामी, दिग्विजय, गुरुमूर्ती यांच्या वाचाळतेची एव्हाना सर्वानाच सवयदेखील झालेली असल्याने त्यांनी बोलत राहावे. ते बोलले नाहीत, तर राजकारणातील सामान्यांचा रसच संपून जाईल.