25 April 2019

News Flash

क्षमाशीलतेची संस्कृती

गोष्ट आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल.

गोष्ट आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल. आपल्याच सहिष्णुतेची आणि आपल्याच क्षमाशीलतेची गोष्ट आज बौद्धिक म्हणून पाहू या. ही क्षमाशीलता महत्त्वाची. आपण तिचे केवळ वाहक. मग ते भय्याजी जोशी असोत, मा. गो. वैद्य असोत, अगदी नरेंद्र मोदी असोत नाही तर सुमित्रा महाजन असोत. मोदीजींनी गोरक्षकांवर नाही नाही ते आरोप केले होते. ही बाब घडली तारीख ८ ऑगस्ट इसवी २०१६ या दिवशी. हैदराबाद या नगरात मोदीजी गेले होते. समोर बंधुभगिनीमातांची गर्दी होती. काय म्हणाले मोदीजी? मी नाही सांगणार. समोरचे श्रोते नुसतेच बौद्धिक ऐकायला बसलेले नाहीत. राष्ट्रभक्ती त्यांच्या नसानसांत आहे. गोरक्षकांना गुंड म्हणणारे आपले नेते होतात, याची लाजसुद्धा त्याच राष्ट्रभक्तीतून वाटते.. ती आठवण जागी करण्याची ही वेळ नव्हे. भय्याजी जोशी किंवा मा. गो. वैद्यांसारख्या आपल्या ज्येष्ठ  मार्गदर्शकांना त्या वेळी मोदीजींचा राग आला, असंही मी म्हणणार नाहीये. ते सर्वार्थानं ज्येष्ठच आहेत. त्यांनी फक्त जाणीव दिली की याचा परिणाम भोगावा लागेल. आपण रागावलो का? नाही. परिणाम भोगावा लागला का? वेगळा विषय आहे. पण आज गोरक्षकांना फटकारण्याची मोदीजींची पद्धत, हा आता त्यांच्या बृहद् प्रतिमेचाच भाग मानला जातो. प्रधानसेवकांची प्रतिमा ही जशी स्वयंसेवकांच्या प्रेमामुळे वाढत असते, तशीच मार्गदर्शकांच्या क्षमाशीलतेमुळे वाढत असते, असा एक इतिहास आपण घडवला, तो आपल्यालाच माहीत नाही! जे इतिहास विसरतात, त्यांना भविष्यकाळ कधीच माफ करत नाही. म्हणून बंधूंनो, चला आपण घडवत असलेल्या इतिहासाकडे पाहण्यासाठी वर्तमानपत्र वाचू. बातम्या चुकीच्याच असतात, अगदी बरोबर. पण त्यातून आपण काय इतिहास घडवणार याला महत्त्व आहे बंधूंनो! काय म्हणतात पाहा रविवारची दैनिकं : ‘सुमित्रा महाजन यांनी गोरक्षकांना फटकारले’. फटकारले?- या दैनिकाच्या म्हणण्याप्रमाणे ‘गोरक्षणाच्या नावाखाली गोंधळ चालतो असे त्या म्हणाल्या’. मुळात ही बातमी आहे का? मोदीजी हेच म्हणाले होते. एकदा नव्हे तीनदा. पद्धत म्हणून बोलल्या असतील त्या, तर लगेच बातमी? लोकसभाध्यक्ष या नात्याने केलेलं काम, त्यामागची तपश्चर्या, हे काहीच न पाहता दैनिकं अशा बातम्या देतात, हा क्षमाशीलतेचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न ठरवता येईल. पण आपण वातावरण शुद्ध करणारे आहोत. आठवून पाहा :  गोरक्षकांविषयी बोलण्याची ही आपली पद्धत संसदेच्या पवित्र सदनात काही काँग्रेसवाल्यांनी अत्यंत गलिच्छ स्वरूपात आणू पाहिली, कागदाचे बोळे बॉम्बसारखे फेकले. तेव्हा त्या बॉम्बफेकीतही न डगमगता अध्यक्षांनी आदेश दिला- ‘हे सहाही सदस्य निलंबित’. पण अध्यक्षपदावरल्या व्यक्तीचा क्षमाशील भाव असा की, हे निलंबन पाचच दिवस. या अध्यक्ष होत्या.. बरोबर ओळखलेत :  सुमित्रा महाजन! बंधूंनो, यापैकी कुठल्या उदाहरणातून क्षमाशीलतेची संस्कृती अधिक उदात्तपणे दिसते, याची चर्चा आपण आपापली स्वतंत्रपणेच करायची आहे.

 

First Published on November 13, 2017 12:12 am

Web Title: sumitra mahajan says violence in the name of gau raksha