क्रिकेटमध्ये २००७ पासून कलियुग सुरू आहे. ज्याला क्रिकेट विश्वाचा महाकुंभ समजावे, ज्याच्या झगमगाटाने डोळे दिपून जावेत, त्या आयपीएलमध्ये अनधिकृतपणे पैसा कमावण्याच्या नादात काही संघांची हकालपट्टी झाली, तर काहींनी पैसे कमावण्यासाठीच आयपीएलमध्ये संघ आणला. खेळाला विचारते कोण, सबसे बडा रुपय्या, हे आयपीएलचे ब्रीद. नवल पाहा. तीन वर्षांपूर्वी सनरायझर्स हैदराबादचा संघ आयपीएलच्या महाकुंभात दाखल झाला. गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांची कामगिरी सुमारच होती. या वर्षी हैदराबाद जेतेपद पटकावील, हे कुणाच्याही गावी नव्हते. पण या वर्षी हा संघ अचानकपणे काही दिवस अव्वल स्थानावरही राहिला. चमत्कार तर आयपीएलमध्ये घडतच असतात. त्यातलाच एक म्हणजे त्यांनी पटकावलेले जेतेपद. यंदा आयपीएलच्या सुरुवातीच्या महिन्यांत जे हैदराबाद आणि बंगळुरूसारखे संघ तळाला जाण्याच्या परिस्थितीत होते, ते अंतिम फेरीत येणे, हादेखील एक चमत्कारच. आयपीएल हे चमत्कारांनीच भरलेले. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स कशी जिंकली, तर तोही चमत्कारच. हे चमत्कार घडवणारे जादूगार कधीही व्यासपीठावर येत नाहीत, त्याची गरजही नाही. पण हे चमत्कार कसे घडतात, हे प्रश्न मात्र आता भारतामधील अतिभावुक, भोळ्या-भाबडय़ा आणि क्रिकेटला धर्म किंवा खेळाडूंना देव मानणाऱ्या क्रिकेटभक्त- जनांनाही पडायला लागला. एखादा संघ कसा हरता-हरता जिंकतो किंवा जिंकता जिंकता हरतो, हा चमत्कार आयपीएलमध्ये बऱ्याचदा घडतो. अगदी रविवारची अंतिम फेरीही त्याला अपवाद कशी असेल? बंगळुरूच्या संघात विराट कोहली हा एकटा जीव सदाशिव वाटत होता. अंतिम फेरीत तर गेलने धावांचे वादळ आणले. तिथे कोहलीच्या हातून वाळूसारखा हा सामना निसटला.. किंवा तसे भासवणारा उत्तम अभिनयही त्यांना करता आला! हेदेखील महत्त्वाचे. भाबडय़ा चाहत्यांच्या मते सामना फिरला. पण मैदानाबाहेरच्या खेळाडूंनी सामना फिरवला, हे मात्र आता सुज्ञ सामान्य जनांच्या ओठावर आपसूकच येऊ लागले आहे. आपल्यालाच या आयपीएलने किती मूर्ख बनवले, हे लोकांना समजले असावे. पण हे सांगायची हिंमत कुणात नाही. कारण आपण मूर्ख बनलो आहोत, हे जगाला ओरडून न सांगण्याचे शहाणपण त्यांच्याकडे अजूनही आहे. त्यामुळेच यंदाच्या आयपीएलचा फड रंगला नाही. पण त्याची काळजी मात्र बीसीसीआयला नसेल. कारण भारतातील चाहत्यांना अभिनय म्हणून का होईना, कुणी तरी चांगली कामगिरी करून दाखवते आहे, हे पाहण्यात भारी रस! ही दुखरी नस बीसीसीआयला माहिती आहेच. त्यामुळे आयपीएलचे अती झाले आणि हसू आले अशी परिस्थिती असली, तरी आयपीएल चालूच राहील. कारण सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीला जगवण्याचे टॉनिक बीसीसीआयकडे नक्कीच आहे.