सारे जण अस्वस्थपणे प्रसूतिगृहाबाहेर येरझारा घालत होते. बारशाची तयारी झाली होती. पाहुण्यांची यादीही तयार होती. पण तारीख टळून गेली तरी बाळंतपण झालंच नाही. ती गोड बातमी कानावर पडेल, या आशेने कधीपासून सगळ्यांचेच कान तहानलेले होते. मधूनच कुणी तरी बाहेर डोकावलं की साऱ्या काळजीयुक्त नजरा तिकडे वळायच्या.. खुणेनंच नकार देत दरवाजा बंद केला जायचा आणि पुन्हा चिंतायुक्त येरझारा सुरू व्हायच्या.. तारीख उलटून तब्बल चौदा दिवस झाले, तरी गोड बातमीचा पत्ता नव्हता. आसपासची लोकंही कुजबुजायला लागली होती. ‘बातमी आहे हे तरी नक्की ना’ असे विचारू लागली होती. मग, अवघडून सारे जण पाठीवर हात घेत येरझारा घालायचे.. आता काही तरी तोडगा काढायलाच हवा असं सगळ्यांनाच वाटू लागलं होतं. प्रसूतिगृहाबाहेरच बाकडय़ांवर दोन्ही घरांतले जुनेजाणते समोरासमोर बसले. चर्चा सुरू झाली. ‘‘बाळंतपण तर व्हायलाच हवं’’.. कुणी तरी गंभीरपणे म्हणालं आणि इकडच्या बाकडय़ाच्या दुसऱ्या टोकावर बसलेल्या एकानं चेहरा कसानुसा केला. ‘‘पण तशी चिन्हं दिसत होती हे नक्की ना?’’.. बोलावं की न बोलावं असा विचार करीत धीर करून त्याने शेवटी हा प्रश्न केलाच आणि सारे चपापले.. गोड बातमी मिळावी हे खरंय, पण त्यासाठी सुखरूप प्रसूती तरी व्हायलाच हवी.. आता साऱ्यांच्या मनात शंकाचे काहूर माजले.. पण लगेचच सगळ्यांनी एकमेकांना सावरले. ‘‘आता तो विचार करण्यात अर्थ नाही. काहीही झाले तरी, काही तरी गोड बातमी आलीच पाहिजे..’’ एक जण म्हणाला.. पुन्हा बाकडय़ाच्या दुसऱ्या टोकावरच्याने तोंड कसंनुसं केलं.. ‘‘किंवा जी बातमी येईल ती गोड मानून घेतली तर?’’.. त्याने पुन्हा शंका व्यक्त केली. पुन्हा सारे डळमळले. ‘‘हा तोडगा चांगला आहे.. असंही करता येईल!’’ पहिला म्हणाला. तेवढय़ात प्रसूतिगृहाचा दरवाजा किलकिला झाला.. कुणी तरी मान बाहेर काढून बाकडय़ावर नजर फिरवली. चर्चा सुरूच होती. पहिला धावत दरवाजाजवळ गेला, पण दरवाजा बंद झाला होता. समोरच्या बाकडय़ावर बसलेल्यांना ही धांदल दिसत होती. त्यांनाही बातमीची प्रतीक्षा होतीच.. इकडच्या बाकावरून उठून पहिला तेथे गेला आणि म्हणाला, ‘‘असं करू या का?.. आमचंच बाळ तुमचंच आहे, असं समजा. त्याला मांडीवर घ्या आणि तीच गोड बातमी म्हणून जाहीर करू या.. बारसं तर व्हायलाच हवं.. सारी तयारी झाली आहे. पाहुणे तर केव्हापासून निमंत्रणाची वाट पाहाताहेत.. आता वाट पाहाण्यात अर्थच नाही!’’.. पहिला उतावीळपणे म्हणाला. समोरच्या बाकडय़ावरच्या सर्वानी एकमेकांकडे पाहिलं. थोडासा विचारविनिमय केला आणि त्यांच्यातल्या थोरल्याने मान हलविली.. ‘‘ठीक आहे. तसं करू या..’’  दोन्ही बाकडय़ावरच्यांचे एकमत झाले आणि ‘तोडगा’ निघाला.. ‘‘हे बरं झालं, नाही तर, एवढय़ा वर्षांचे मधुर संबंध ‘तोड गा’ म्हणायची वेळ आली असती..’’ पहिल्या बाकडय़ावर शेवटी बसलेला तो पुन्हा तोंड कसंनुसं करत म्हणाला आणि कसंनुसं हसत सगळ्यांनीच आपला जीव भांडय़ात टाकला!