प्रिय बनवारीलाल आजोबा, राजकारणातील अनेक टक्केटोणपे खात तुम्ही ७८ वर्षांचे झालात. तुमची नातवंडे तुम्हाला आजोबा म्हणत असणार, तुम्हीही त्यांना प्रेमाने जवळ घेऊन कुरवाळत असाल, गालगुच्चा घेत असाल. पण आपण आजोबा आहोत, म्हणून आजोबाची माया सरसकट उधळत, कुणाही महिलेला नातीच्या जागी पाहून गालावर चापटी मारत नको तेवढी माया उधळण्याची उबळ तुम्हाला का बरे आली? शिवाय, आपण आजोबाच्या वयाच्या टप्प्यावर पोहोचलेलो असलो तरी, ज्या पदावर आहोत, तेथून अशा कौतुकाची जाहीर उधळण करताना, पदाच्या प्रतिष्ठेचे संकेत पाळावयास हवे होते, याचा विसर पडणे हा तुमच्या पदाचाही अपमान नव्हे काय?.. आपण कोण आहोत, आपले वय काय, आपल्या शिष्टाचाराच्या रीती काय, आपण कोणत्या संस्कृतीचा वारसा जगाला ओरडून सांगत असतो, याचा विसर पडून आजोबाच्या नात्याने त्या पत्रकार महिलेच्या गालावर चापटी मारलीत, तेव्हा, आपण एका राज्याचे राज्यपाल आहोत, अनेक विद्यापीठांचे कुलपती आहोत याचा विसर तुम्हाला अचानक कसा पडला? एक तर, ज्या वादग्रस्त विषयाचा खुलासा करण्यासाठी तुम्ही पत्रकारांना बोलाविले, त्याचे उत्तर न देता नवाच वादग्रस्त मुद्दा आपण आपल्या एका लाडिक चापटीतून उभा करत आहोत, याचे भान तुम्हाला का राहिले नाही?.. त्या पत्रकार महिलेच्या प्रश्नाचे कौतुक वाटल्यामुळे तुम्ही तिच्या गालावर प्रेमाने चापट मारलीत, असे तुम्ही म्हणता. ते खरे असेलही, पण असे करणे राज्यपालपदाच्या प्रतिष्ठेस किती साजेसे असेल याचा विचारदेखील तुमच्या मनाला कसा शिवला नाही?.. ती तरुणी आपल्याला नातीसमान आहे, असे वाटल्याने तिचे कौतुक केले, असे तुम्ही म्हणालात. या तुमच्या कुटुंबवत्सल वृत्तीने अनेकांचे ऊर भरून आले असतील. पण तुमच्यातील त्या जाहीर मायाळू आजोबाने तुमच्यातील राज्यपालपदाच्या प्रतिष्ठा आणि जबाबदारीवर मात्र, एका मिनिटात मात करून टाकली आहे. तुमच्या कुटुंबप्रेमाच्या अशा एका अस्थानी आणि जाहीर आविष्काराने मूळ प्रश्न आणि त्याचे उत्तर मात्र मिळालेच नाही. तमिळनाडूच्या त्या कला महाविद्यालयात गुण मिळविण्याकरिता अनैतिक व्यवहार करावे लागतात, हा आरोप तुमच्या एका चापटीमुळे पडद्याआड गेला. आजोबा, तुमच्या पक्षाने कधीकाळी चारित्र्याच्या भांडवलावर स्वत:ची प्रतिमा निर्माण केली होती. अनेक नेत्यांनी चारित्र्याच्या जोरावर समाजात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. तुमच्या पक्षाच्या मातृसंस्थेत, चारित्र्याचे गुणगान सदैव सुरू असते. असे असताना, शिक्षणक्षेत्रातील चारित्र्याला कलंक लावणाऱ्या आरोपांहूनही, गालावर चापटी मारण्याचा वाद मोठा झाल्याने आणि तुमच्या अतिमायाळू आजोबापणामुळे शैक्षणिक क्षेत्रातील लैंगिक भ्रष्टाचाराचा मुद्दा अंधारातच राहिला. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना एखादी प्रेमळ कृतीदेखील किती महागात पडते, याचा धडा वयाच्या या टप्प्यावर तुम्हाला शिकावयास मिळाला, हे बरेच झाले. आता तुमच्या माफीनाम्याने कदाचित त्या वादावर पडदाही पडेल. तेव्हा आता, उत्तर द्या. त्या महाविद्यालयात लैंगिक सुखाची किंमत देऊन गुण मिळवावे लागतात, हे खरे की खोटे?