19 November 2017

News Flash

मतलबी वारे

गेल्या सुमारे दीडशे वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळ तामिळनाडूमध्ये यंदा पडला आहे.

लोकसत्ता टीम | Updated: April 25, 2017 1:24 AM

साक्षात सूर्याशी पंगा घेऊन पाणी वाचवण्याचे अद्भुत तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल तामिळनाडूचे सहकारमंत्री सेल्लूरा के राजू आणि त्यांना या संशोधनात मोलाची साथ देणारे मदुराईचे जिल्हाधिकारी के वीरराघव राव यांना जागतिक पातळीवरील पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे! आपल्या या संशोधनाचे पेटंट घेण्यासाठी सेल्लूरा के राजू हे प्रयत्नशील असून ते मिळाल्यास त्यांना आकाश तर ठेंगणे होईलच, पण साक्षात सूर्यदेवताही प्रसन्न होण्याची शक्यता आहे. शाळेत असताना बाष्पीभवन हा विषय शिकताना झालेला थोडासा गोंधळ आणि खारे वारे, मतलई वारे यांच्यातील फरक समजावून घेण्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळेच हे संशोधन करता आले, असेही राजू यांचे म्हणणे असू शकते. गेल्या सुमारे दीडशे वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळ तामिळनाडूमध्ये यंदा पडला आहे. त्याला तोंड देण्यासाठी कल्पनांचा मात्र तेथे सुकाळ आहे. पाऊस कसा पडतो, याचे जागतिक संशोधकांनी आजवर केलेले विवेचन मागे पडून आता दुष्काळ हटवण्याचा सोप्पा आणि सुकर मार्ग म्हणून या संशोधनाकडे सारे जग पाहील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेही अशाच कल्पनांच्या बँकेचे अध्यक्ष असल्याने, त्यांच्यावरही या नव्या कल्पनेचे गारुड झाल्यास नवल वाटायला नको! मदुराईजवळील वाईगई या धरणातील पाण्याची हा सूर्यदेव वाफ करून टाकतो, हे लक्षात आल्याने बेचैन झालेल्या राजू यांनी नामी शक्कल लढवली. या धरणातील पाण्यावर सूर्याची वक्रदृष्टी पडताच कामा नये, यासाठी त्यांनी धरणाच्या पाण्यावर पांढऱ्या शुभ्र थर्मोकोलचे पांघरूण घालायचे ठरवले. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही आणि आहे ते पाणी अधिक प्रमाणात वापरता येईल, असे राजू यांना वाटू लागले. त्यांचेही म्हणणे खरेच म्हणा. साठवलेल्या पाण्यापैकी चाळीस टक्के पाणी वाफ होऊन उडून जात असेल, तर ते साठवायचेच कशाला? बरे ही वाफ आकाशात जाऊन पुन्हा पावसाच्याच रूपाने पृथ्वीवर अवतरणार असेल, तर ती दवडायचीच कशाला? असा राजू यांचा साधा प्रश्न. ज्या प्लॅस्टिक आणि थर्मोकोलला पर्यावरणविरोधी ठरवून त्यांच्या वापरावर बंदी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, ते किती मूर्ख आहेत, हेही राजू यांना सिद्ध करायचे होते. म्हणून दोनशे चौरस किलोमीटरचा पाणीसाठा थर्मोकोलने आच्छादित करण्याचा घाट त्यांनी घातला. त्यासाठी १० लाख रुपयांचे थर्मोकोल तुकडे दाखलही झाले. प्रयोगाच्या दिवशी जेव्हा हे दोन मिलीमीटर जाडीचे थर्मोकोलचे आयताकृती तुकडे पाण्यावर अंथरण्यास सुरुवात झाली, तेव्हा तर राजू यांचा आनंद गगनात मावेना. कोणताही आनंद क्षणिक असतो, हे तत्त्वज्ञान समजण्याची त्यांना गरजच नव्हती. पण ऐनवेळी धरणावरील वाऱ्यांनी घात केला. मतलबीच ते. त्यांनी थर्मोकोलचे हे पांघरूण क्षणार्धात फुंकरीने उडवून लावले. उपस्थितांनी टाळ्या वाजवून या विनोदाचे स्वागत केले तरीही राजू यांनी हाय खाल्ली नाही, असे सांगितले जाते.

First Published on April 25, 2017 1:19 am

Web Title: tamil nadus cooperation minister sellur k raju drought