नाना-नानी पार्कात सकाळीच लाफ्टर क्लबमध्ये काखा वर करून मनसोक्त हसून हसून पुरेवाट झाल्यामुळे सलावलेले पोटाचे स्नायू पूर्ववत करण्यासाठी नाना आणि नानी नेहमीप्रमाणे बाजूच्या सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयाच्या बाकडय़ावर बसले. समोरच ती बातमी नानांना दिसली. नानांचा चेहरा उजळलेला पाहून नानीदेखील थोडय़ा पुढे झुकल्या, आणि नानांच्या हातातील पेपरात डोकावू लागल्या. पण त्यांचे लक्ष भलत्याच बातमीकडे गेले होते. तरीही त्या हसू लागल्या. नानींनी हसतच त्यांच्या बातमीवर बोट ठेवले, तर नाना आपल्यासमोरची बातमी नानींना दाखवू लागले.. मग दोघेही मनमुराद हसू लागले.  नंतर नानींचे बोट असलेली बातमी नानांनी वाचावयास घेतली.. आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांचे लक्षही नानांच्या हातातील वर्तमानपत्राच्या बातमीवर खिळले गेले होते. सरकार राज्यात आनंद मंत्रालय सुरू करणार होते.. तेवढय़ात एका बातमीचे नानांनी मोठय़ाने वाचन सुरू केले. राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरणाचा पहिला भाग जाहीर केला असून आता सवलतींच्या सरी ज्येष्ठांवर पडणार आहेत, असे नानांनी वाचून दाखविताच सर्व ज्येष्ठजनांनी आपापल्या जागा सोडून नानांच्या हातातील वर्तमानपत्रात माना खुपसल्या. आता त्या बातमीचे सार्वजनिक वाचन सुरू झाले. नाना एकएक सवलत वाचून दाखवत होते, आणि त्यावर प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आपापले मत मांडत होता. ‘खासगी डॉक्टरांनी ज्येष्ठांना शुल्क आकारणीत सवलत द्यावी अशा सूचना’ यासारख्या वाक्यावर हशाही उसळत होता!  ‘आणि ऐकलंत का, आता ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या मुलांना राज्य सरकारकडून आयकरातूनही सवलत मिळणार आहे..’ नाना आनंदाने जवळजवळ ओरडलेच, आणि सर्वाच्या चेहऱ्यावरचे हास्य क्षणभर मावळले ‘म्हणजे, आम्हा दोघांसाठी मुलांना दुहेरी सवलत मिळणार तर!’ एकजण म्हणाला. ‘अहो, आता आम्ही मुलीकडे जाऊन राहतो. तिच्या घरात तिचे सासूसासरे आहेत, आणि आम्ही दोघं.. म्हणजे, त्यांना आयकर भरावाच लागणार नाही..’ दुसरा एकजण आनंदाने म्हणाला. ‘अहो पण राज्य सरकार कशा देणार आयकरात सवलती? केंद्र सरकारच आयकर घेतं..’ हा तिसरा आवाज कुठल्याकुठे विरून गेला..  एकंदर ज्येष्ठांचा हा मेळा सरकारवर खूश होता! ‘आनंद मंत्रालय सुरू व्हायच्या आधीच आनंदाची कारंजी उडवायला सरकारने सुरुवात केली..’  अशी दादही दिली नानींनी! .. नाना अजूनही तीच बातमी पुन्हा पुन्हा वाचत होते. नानी पुढे झाल्या. त्यांनीही पेपरातली ती पुढची बातमी पाहिली, आणि त्या हसू लागल्या.. ‘एवढय़ा सगळ्या सवलती मिळणार, मुलांना आर्थिक फायदे होणार, मग वृद्धाश्रमात कोण टाकेल आपल्याला? सरकारचं हे काहीतरीच.. वृद्धाश्रमसुद्धा बांधणे सक्तीचे करणार म्हणे!’ .. नानी रागानेच बोलल्या, आणि नानांनी सुस्कारा टाकला. ‘अहो! ते सरकार आहे.. त्यांना सगळ्या बाजूंचा विचार करावा लागतो. उद्या धोरण फसले, वृद्ध पुन्हा वाऱ्यावर आले, तर वृद्धाश्रमांची सोय नको?’  नाना हताशपणे म्हणाले, आणि नानींना आधारासाठी हात पुढे करून म्हणाले, ‘चला घरी, आज तरी मुलं आपली वाट पाहात असतील’ . आणि दोघे घराच्या दिशेने चालू लागले..