06 August 2020

News Flash

नवे शिक्षक!

अब्राहम लिंकनचे पत्र वगैरे गोष्टी आता जुन्या झाल्या. नवा शिक्षक हा चौफेर वृत्तीचा व तशी कृती करणारा असावा.

प्रतिनिधिक छायाचित्र

गेला हो तो जमाना. मास्तर वर्गात येण्याआधी त्यांच्या चपलांचा ‘करकर’ असा आवाज येण्याचा. त्यामुळे सारा वर्ग चिडीचूप होण्याचा. गुरुदक्षिणेची प्राचीन पद्धत तर कधीचीच बाद झालीय. आता एकाच मुठीत मळलेला तंबाखू दोघांनी मिळून खाण्याचे दिवस आहेत. करणार काय? या व्यवस्थेने दिवसच तसे आणलेत. पूर्वी शिकवण्याची कला अवगत असेल तो खरा शिक्षक मानला जाई. आता या कलेला विचारते कोण? शिकवण्याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय काय करता येते, हाच प्रश्न सध्या महत्त्वाचा!  म्हणजे तुम्हाला स्वयंपाक करता येतो का? त्यातल्या त्यात खिचडी बनवता येते का? दारूच्या गुत्त्यावर सरकारी राखणदारी करता येते का? जिल्ह्याच्या वेशीवर सलग १२ तास उभे राहून वाहनतपासणी करता येते का? रात्रपाळीचा सुरक्षारक्षक म्हणून न झोपता कर्तव्य बजावता येते का? कारकून म्हणून विविध सरकारी कोष्टके भरता येतात का? विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची रखवाली करता येते का? खानेसुमारीचे काम आता जुने झाले, त्यात तुम्ही निपुण झालात, पण आता जे नवनवे आजार येतील, त्याची घरोघरी जाऊन पाहणी करता येते का? साथीच्या आजाराचे रुग्ण शोधता येतात का? वर्गात न जाता शैक्षणिक मार्गदर्शन कसे करावे याचे कसब तुमच्या अंगी आहे का? ग्रंथालयातील पुस्तके ओळीने रचता व काढता येतात का? शाळेचा मदतनीस – म्हणजे एक प्रकारचा हरकाम्याच-  अशी जबाबदारी तुम्हाला पेलता येते का? आणि हो, मुख्य म्हणजे आजकालचे चपराशी वरिष्ठांना पाणी देणेसुद्धा कमीपणाचे मानतात. चहा तर दूरच. तर हे पाणीचहा देण्याचे, साहेबाच्या घरचा भाजीपाला आणण्याचे, त्यांची मुले सांभाळण्याचे काम तुम्हाला येते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे होय अशी येत असतील तर तुम्ही शिक्षक या पदासाठी पात्र ठरलात म्हणून समजा! हे निकष आम्ही ठरवलेले नाहीत. त्रिपुरा नावाच्या इटुकल्या राज्याने ठरवले आहेत व त्यापैकी काही त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला शपथेवर सांगितल्याचे आम्ही वाचले आहे. आजच्या काळात शिक्षक हा हरहुन्नरी असावा असे त्रिपुराच नाही तर हळूहळू साऱ्याच राज्यांचे मत बनत चालले आहे. हे हरहुन्नरीपण अपराधाकडे वळणारे नसावे. नाही तर त्या यूपीतल्या अनामिका गुप्ताबाईसारखे व्हायचे. त्या एकाच वेळी अनेक शाळांत शिक्षक होत्या म्हणे! असा गुन्हा न करता कामाचे अष्टपैलुत्व तुमच्यात असेल तर तुम्ही या पदासाठी नक्की पात्र ठरू शकता. अब्राहम लिंकनचे पत्र वगैरे गोष्टी आता जुन्या झाल्या. नवा शिक्षक हा चौफेर वृत्तीचा व तशी कृती करणारा असावा. शिक्षकांविषयी कमालीचा आदर बाळगणाऱ्या व त्यांना सर्वाधिक वेतन देणाऱ्या प्रगत देशांचे कौतुक नका सांगू. ते देश वेगळे, आपण वेगळे. त्यामुळे येथील व्यवस्थेला हवा तसा वाकू शकेल असाच शिक्षक हवा. त्यानेच आपली प्रगती साधेल. आणि एक महत्त्वाचे : शिक्षक म्हणून नोकरी मिळाल्यावर त्याचा लग्नाच्या बाजारात गवगवा करण्याचे आता काही कारण नाही. कारण सकाळी तुम्ही शिक्षक म्हणून घरून निघाल तर सायंकाळी चपराशी म्हणून परतण्याची शक्यता जास्त. त्यामुळे मिळेल ते काम करण्याची तयारी असलेला कर्मचारी असे लांबलचक नाव तुमच्या पदाला आता देण्यात येत आहे. त्रिपुराने पुढाकार घेतला आहे. तयारी असेल तर व्यवस्थेने निर्माण केलेल्या या पदभरतीत सामील व्हा. नसेल तर बसा बोंबलत. तुम्ही नाही म्हणाल, तरी आहेत भरपूर बेरोजगार. शेवटी आम्हाला महासत्ता व्हायचे आहे. तेही लवकरात लवकर!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 12:53 am

Web Title: teachers recruitment by tripura government tripura government teachers zws 70
Next Stories
1 दु:खात सुखपट्टी!
2 राजकारण? नाही.. जुगारच!
3 गृहसमालोचनाचे माहात्म्य!
Just Now!
X