नगररचनातज्ज्ञ, अर्थशास्त्राचा अभ्यासक, कुशल प्रशासक, महसुली कामकाजाचा हुकमाचा एक्का असे अनेक गुण एकाच व्यक्तिमत्त्वाच्या अंगी असणे ही बाब, काहीशी दुर्मीळच! पण याबाबतीत महाराष्ट्र भाग्यवानच म्हणावा लागेल. सध्या राज्य बिकट परिस्थितीतून वाटचाल करीत आहे, हे आपणास ठाऊक आहेच. अर्थात, ही स्थिती वर्षांनुवर्षांची असली तरी आपण सद्य:स्थितीपुरताच विचार करत आहोत. तर, त्यामुळे, राज्याच्या तिजोरीवर कोणताही जादा आर्थिक बोजा न टाकता पायाभूत सुविधा पुरविणे हे राज्यकर्त्यांसमोरील मोठे आव्हान असल्याने, वरील सर्व गुणांची कसोटी लागत असते. यापैकी एखादा गुण या कसोटीस उतरला नाही, तर बिकट असलेली आर्थिक स्थिती अधिकच बिकट होण्यास विलंब लागणार नाही. सध्या तमाम महाराष्ट्र याचाही अनुभव घेत आहे. ठाण्याजवळच्या मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याची डागडुजी हे त्याचे सद्य:स्थितीतील उत्तम उदाहरण.. या एका कामामुळे एवढय़ा गुणसमुच्चयाचे दर्शन घडले, हा केवळ एक योगायोग! आपण सारे हे जाणतो, की ‘एखाद्या ठिकाणी खड्डा पडला, की दुसऱ्या ठिकाणी भराव निर्माण होणे’ हे वैज्ञानिक सत्य आहे. आर्किमिडीजच्या सिद्धान्ताचा आधार असलेल्या या संशोधनानुसार, वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘रस्त्यांवरील खड्डे’ या समस्येकडे पाहिले, तर या समस्येची उकल सोपी होऊ शकते. या खड्डय़ांचे एक व्यापक अर्थशास्त्र असून त्यामागे या वैज्ञानिक सिद्धान्ताचे तत्त्व लपले आहे, हे फारच थोडय़ा- म्हणजे, या समस्येशी संबंधित- लोकांनाच ठाऊक आहे. खड्डय़ांची समस्या ही खिशाच्या राजकारणाशी संबंधित असते. कारण एकाचा खर्च हे दुसऱ्या कोणाचे उत्पन्न असते. रस्त्यावरील खड्डे जेवढे अधिक, तेवढा मोठा भराव या समस्येशी संबंधित यंत्रणांच्या खिशात जात असतो. खड्डय़ांमुळे राज्याच्या अर्थकारणास गती मिळते.. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून इंधनाचा वापर वाढतो, तेल कंपन्यांचा महसूल वाढून इंधनविक्रीतून राज्याला प्राप्त होणाऱ्या करांचा महसूलही प्रचंड वाढतो. बिकट अवस्थेत सापडलेल्या राज्याच्या तिजोरीस मोठा दिलासा मिळतोच, पण बिघडणाऱ्या वाहनांची देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकांच्या धंद्यासही मोठी चालना मिळून वाहने बिघडल्यामुळे खासगी व्यक्तींना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करावा लागत असल्याने, त्या आघाडीवरही तेजी येते. शिवाय, अशा परिस्थितीत विमा उतरविण्याची मानसिकता बळावून विमा कंपन्यांनाही ऊर्जितावस्था येते. एका रस्त्याच्या डागडुजीमुळे कंत्राटदाराच्या माध्यमातून नवे रोजगार निर्माण होतात, रस्ते-दुरुस्ती साहित्याच्या निर्मिती व्यवसायासही बरे दिवस दिसू लागतात. अशा तऱ्हेने अर्थव्यवस्थेस बहुपेडी चालना मिळत असतानाच, ‘एक रस्ता बंद झाल्याने दुसरीकडे वाहतूक वाढणे’ हेही आर्किमिडीजच्या सिद्धान्तानुसार साहजिकच असल्याने, टोल कंत्राटदार कंपन्यांच्या तिजोरीतही उत्पन्नाचा वाढीव ओघ सुरू होतो. एवढे सारे आर्थिक फायदे होत असताना, सरकारला सारी कामे कंत्राटदाराकडूनच करून घ्यावयाची असल्याने, तिजोरीत जमा होणारा महसूल ही फक्त जमेचीच बाजू राहात असल्याने सरकारची आर्थिक स्थितीही सुधारते. हे सारे लक्षात घेऊन, अधिक रहदारीच्या खड्डेमय रस्त्यास हातदेखील न लावता शेजारचा एखादा रस्ता दुरुस्त करण्यामागील दूरदृष्टी दाखविण्याचे धाडस अशा गुणसमुच्चयसंपन्न नेत्याकडूनच केले जात असल्याने राज्याला आर्थिक स्थर्य लाभू शकते, हे लक्षात घ्यावयास हवे. एखाद्या रस्त्यावर अशा कारणांमुळे वाहतूक वाढल्यास टोलवसुली वाढणार व कोंडीची नवी समस्या सुरू होणार हे लक्षात घेऊन दुमजली टोलनाके उभारण्याची कल्पना तर अफलातूनच म्हणावी लागेल. ती अमलात आणलीच पाहिजे. कामे सुरू असेपर्यंत हा वरचा मजला रिकामा कधीच राहणार नाही, हे नक्की!