ठाण्याच्या रेल्वे स्थानकात बघ्यांची मोठी गर्दी गोळा झाली होती. संध्याकाळचे सव्वाचार वाजले आणि मुंबईच्या दिशेने साऱ्या नजरा वळल्या. लांबवर धुराचा लोट आकाशात झेपावताना दिसताच गर्दीत आनंदाच्या लाटा उसळल्या.. बिनबलाची, बिनघोडय़ाची गाडी, लोखंडी रस्त्यावरून दुडुदुडु धावत, धापा टाकत पुढे सरकत होती आणि बघ्यांच्या नजरा विस्फारल्या होत्या. ४ वाजून २७ मिनिटे झाली आणि गाडी स्टेशनात येऊन थांबली. तब्बल चारशे माणसे गाडीच्या वेगवेगळ्या डब्यांतून उतरू लागली. एवढी प्रचंड गर्दी एकाच वेळी वाहून नेणारी ही गाडी पाहून ठाणेकर सुखावले. गाडी परतीच्या प्रवासाला लागली आणि ठाण्यापासून बोरीबंदरापर्यंत लोखंडी रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांची गर्दी तोंडात बोटे घालूनच हा चमत्कार न्याहाळू लागली.. काहींनी गाडीवर फुले उधळली, कुणाला ही भुताटकी वाटली, कुणाला चमत्कार भासला.. ‘साहेबाचा पोर लई आकली रे, बिनबैलाची गाडी कशी हाकली रे..’ असे गाणे पुढे जो तो गुणगुणू लागला..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही गोष्ट एकशे पासष्ट वर्षांपूर्वीची! तेव्हाचा हा चमत्कार गेल्या १६५ वर्षांत आपल्या एवढा अंगवळणी पडला, की आयुष्यातील प्रत्येक दिवसाचा निम्मा वेळ या गाडीत एका पायावर प्रवास करण्यातच वाया जातो, हेही आपण विसरून गेलो. तेव्हा चार डब्यांतील ४०० प्रवाशांनी भरलेली ही गाडी म्हणजे जादू वाटत होती. आता एकाच डब्यात त्याहून अधिक प्रवासी कोंबून धावते, तरी तिचे आम्हाला काही कौतुक वाटतच नाही. तेव्हा याच प्रवासाला ५७ मिनिटे लागली होती. काळ कितीही पुढे गेला, तरी अंतर आणि वेळ या गोष्टी जागच्या जागीच असतात. उलट, बदलत्या काळासोबत, आपण कितीही पुढे सरकत असलो, जगण्याची गती कितीही वाढत असली, तरी रेल्वेच्या गतीचे गणित नेमके उलटय़ा दिशेनेच चालत असते. बोरीबंदरचे छशिमट झाले असले, तरी तेथून ठाण्याकडे धावणाऱ्या गाडीच्या वेळेचा वेग मात्र आज इंडिकेटरवरील लाल आकडय़ांपुरताच उरला आहे. त्याचा घडय़ाळाशी काहीही संबंध नसतो, म्हणून आजही दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांनी छशिमट सोडणारी गाडी ५७ मिनिटांत ठाण्याला पोहोचेलच अशी खात्री नसते. गेल्या १६५ वर्षांत या रेल्वेच्या सवयी पुरत्या बदलून गेल्या आणि तिच्यासोबत जगणाऱ्या मुंबईकरांच्याही सवयी रेल्वेच्या तालावर नाचण्याच्या नादात सुटून गेल्या आहेत, हे आम्हाला जाणवलेच नाही. आता बिनबलाची ही गाडी वेळेवर सुटणे आणि वेळेत पोहोचणे या चमत्काराचा अनुभव आला तरच आमची बोटे तोंडात जातात. आता आम्ही गाडी फलाटावर येण्याची वाट उत्सुकतेने पाहात नाही आणि ती येऊन थांबताच त्यातून उतरणाऱ्या लोंढय़ांकडे ढुंकूनही पाहात नाही. आम्हाला आमची जागा पकडण्यासाठी पळापळ करावयाची असते. गाडीत बसायला मिळाले की आयुष्यातील तो दिवस सार्थ झाला, एवढय़ाच आमच्या अपेक्षा उरल्या आहेत. तरीही, १६५ वर्षांत या रेल्वेगाडीने आम्हाला जगणे शिकविले, माणुसकी शिकविली आणि अनेक अनुभवांची पोतडीही आमच्या अकलेच्या कप्प्यात भरून ठेवली. या गाडीच्या बाकडय़ावरील चौथी सीट हा माणुसकीचा कोपराही आम्हाला इथेच गवसला आणि मदतीचा हात देत सहप्रवाशाला सांभाळून घेण्याची मानवताही याच गाडीने शिकविली. लाखो मुंबईकरांना अंगाखांद्यावर घेऊन या टोकापासून त्या टोकापर्यंत धावणारी, मुंबईच्या जगण्याच्या नाटकाची ही महानायिका १६५ वर्षांची झाली असली, तरी ती दमलेली नाही. दिवसागणिक तिला तारुण्याची झळाळी येत आहे. तिच्या विस्कटलेल्या तालावर नाचण्यातही आनंद आहे..

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane railway station completes 165 year first train
First published on: 17-04-2018 at 02:30 IST