पोट फुगेस्तोवर खाल्ल्याने आलेल्या सुस्तीचा आनंद घेत बराकीत डोळे मिटून पडलेल्या त्याला बायको भेटीला आल्याचा निरोप मिळाल्यावर तो अनिच्छेनेच उठला. मुलाखत कक्षात आल्यावर त्याने तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. ‘कसा हायेस’ या प्रश्नापासून सुरू झालेले तिचे बोलणे तो नुसता हूं हूं करून ऐकत होता. आता पुन्हा दरोडे नको घालू यावर ती कीर्तन झोडणार असे त्याला वाटत असतानाच तिने वकिलाकडून आणलेला शिक्षा कमी करण्याचा अर्ज त्याच्यासमोर सहीसाठी धरला. मग मात्र त्याला राहावले नाही. आजूबाजूला असलेल्या शिपायांकडे पाहात त्याने आवाजावर नियंत्रण ठेवत बोलायला सुरुवात केली. ‘हे पाहा, माझी शिक्षा कमी करण्यासाठी तू धडपड करायची काही आवश्यकता नाही. सुरवातीला इथे लई जाच वाटायचा पण आता वातावरण पार बदललं. आता जेवणबी सुधारलं, कँटीनमध्ये तर नवेनवे पदार्थ मिळाया लागलेत. पुरणपोळ्या, श्रीखंडपुऱ्या, मिठाई, फरसाण, पनीर, वेगवेगळ्या फळांचा रस असे लय कायकाय. त्यामुळं पोटाची चिंताच मिटली. मस्तपैकी खावं, झोपावं. सोबत जरासं काम. दिवस कसा जातो ते कळाया मार्गच नाही. ही खाण्याची सोय सुरू झाल्यापासून इथल्या वातावरणातबी लई फरक पडलाय. सुस्तावलेले लोक मारामाऱ्या करायचे इसरू लागलेत. पळून जाण्याचं तर कुणी नाव काढत नाही. एखादी पुरणपोळी शिपायाला चारली की तो बी खूश. त्यामुळं दंडुकासुद्धा चालेनासा झालाय. खेळीमेळीच्या वातावरणात वाढ झालीया. बाहेरच्या करोनाच्या कहाण्या आम्ही ऐकतो तेव्हा आपण येथे किती सुखी असंच वाटाया लागते. अगं, आमच्या शेजारच्या बराकीतल्या एका कलाकाराला तर जजसाहेबांनी या कारणाहून जामीन देण्यास मनाई केली म्हणे! आता ते बाहेरचं जग, त्यातली धावपळ, काटछाट नको वाटते. आपल्या घरी तरी पुरणपोळी, श्रीखंडपुरी कधी व्हायची सांग. मी मोठा हात मारल्यावरच तू करायची. बरोबर ना! इथं तर रोज मिळते गं. तीही साजूक तुपातली. दोन भुरटे माझ्याच बराकीत हायेत. आधी ते रोज पळून जाण्याच्या जागा शोधायचे. आता दणकून खायला भेटू लागल्याबरोबर शांतच झालेत. म्हणतात हेच बरं हाय. आधी जेवणासाठी रांगा लागायच्या. आता कँटीन कधी सुरू होते याची वाट पाहातात सारे. कधीकधी खाणं बी इतकं होतं की काम करायचा कंटाळा येतो. मग तिथे फटके खावे लागतात. भरल्या पोटामुळं ते सहन करायची ताकद वाढली आता. ज्यानं कोणी ही सोय करून दिली त्याचे आभार आम्ही रोजच मानतो. प्रार्थनेच्या वेळी. तेव्हा आता माझ्या सुटकेचं विसर. फक्त एकच कर. तू महिन्याला देत असलेले साडेचार हजार पुरत नाही. ते थोडे वाढवून मिळावे यासाठी वकीलसाहेबाला प्रयत्न कर म्हणा. पुढच्या भेटीत तसा कागद घेऊन ये. लगेच सही करतो. त्यांना सांग. साऱ्याच कैद्यांची ही मागणी आहे. त्यासाठी लढाची तयारी करा म्हणा.’ त्याचा हा युक्तिवाद ऐकून ती अनावर संतापाने म्हणते, ‘इथं बसून ऐतखाऊ झालास तू. बाहेर चार लेकरांना घेऊन कशी जगते ते ठाऊक आहे का तुला? म्हणे आणखी पैसे पाहिजे. कुठून आणू? आता मी बी दरोडा टाकू काय? ते काही नाही. तू गपगुमान या कागदावर सही कर. नाहीतर मीच त्या वकिलाला सांगून मार्ग काढाया सांगते. आणि कोण रे तो श्रीखंडपुरी सुरू करणारा साहेब. नाव सांग बरं त्याचं.’ हे ऐकताच शिपाई तिला आवरतात, बाहेर नेतात. हे ऐकून कारागृहाचे अधीक्षक शासनाला अहवाल पाठवण्याच्या कामी लागतात.