ज्या रत्नजडित जेवणाच्या डब्याने निजामाच्या शाही कुटुंबाच्या भोजनकक्षाला वैभव मिळवून दिले, त्या डब्याला अनेक वर्षांच्या कुलूपबंद स्थितीतून त्या दोघांनी काही काळाकरिता मुक्त केले. त्याच डब्यातून त्या दोघांनी शाही थाटात भोजन घेतले.. वैभवशाली शाही सुवर्णडब्यातून भोजन घेण्याचे भाग्य सामान्य माणसाला कोठून मिळणार? पण चोरीच्या निमित्ताने का होईना, त्या दोघांनी ही सुवर्णसंधी साधलीच.. हैदराबादच्या निजामाच्या कुटुंबातील हिरेमाणकांनी जडविलेला सोन्याचा डबा चोरायचा हे त्यांनी ज्या दिवशी ठरविले, त्याच दिवशी त्यांनी हे स्वप्न मनाशी जपले असावे. चोरीचा तो दिवस ठरला. त्या दोघांनी कुठून तरी अन्नपदार्थ विकत घेतले आणि निजामाच्या कुटुंबातील मौल्यवान वस्तू ठेवलेल्या संग्रहालयाच्या तावदानातून हवेलीत प्रवेश केला. त्यांनी कपाटाची चौकट उखडली. कित्येक वर्षे कडेकोट बंदोबस्तात कुलूपबंद अवस्थेत घुसमटलेल्या त्या डब्याला तेव्हा काय वाटले असेल?.. वस्तूंना भावना नसतात; पण त्या डब्याला भावना असत्या, तर कदाचित, वापराविना निर्थकपणे कपाटात कुलूपबंद स्थितीत जखडून घेतल्यानंतर त्यालाही मुक्ततेचा आनंद झाला असता. त्या दोघांनी कपाटाची चौकट उखडून डबा बाहेर काढला, बाहेरून विकत आणलेले अन्नपदार्थ त्या डब्यात ओतले आणि निजामाच्या थाटात त्या डब्यातून शाही शैलीत त्या अन्नपदार्थाचा आस्वाद घेतला.. तेव्हा त्या डब्याला पुन्हा कृतकृत्यतेचा आनंद झाला असेल का?.. समाजाच्या आणि कायद्याच्या दृष्टीने चोरी हा गुन्हा आहेच, पण मुळात गरिबी हे बऱ्याचशा गुन्ह्य़ांचे मूळ असते, असे म्हणतात. त्या अंधाऱ्या रात्री, चोरपावलांनी येऊन पळविलेल्या त्या सोन्याच्या रत्नजडित डब्यातून भोजन घेताना त्या दोघांना त्या क्षणापुरता तरी निजामी ऐश्वर्याच्या स्वप्नपूर्तीचा आनंद मिळाला असेल का?.. त्या ऐश्वर्यवान डब्यातून भोजन घेत स्वप्नपूर्तीचा आनंद पुरेपूर उपभोगून त्या दोघांनी त्या डब्यासह पोबारा केला आणखी काही सोन्याच्या कपबशाही लांबविल्या, तेव्हा आपण चोरीच्या उद्देशाने केलेली ही कृती तर थेट दरोडाच ठरली, याची त्या दोघांना बहुधा कल्पनाही नसावी.. दुसऱ्या दिवशी दरोडय़ाची बातमी जगभर पसरली, तेव्हा आपण चोरलेल्या या वस्तूंची किंमत पन्नास कोटींच्या घरातील आहे हे समजल्यावर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असेल का?.. एवढे ऐश्वर्य आपल्या फाटक्या आयुष्याला पेलवणार नाही याचीही त्यांना जाणीव झाली असेल.. आपल्याकडचा हा चोरीचा ऐवज विकत घेण्याचीही कुणाचीच हिंमत होत नाही हे लक्षात आल्यावर आपल्या अतिरेकी धाडसाचा धक्कादेखील त्यांना बसला असेल.. ते दोघेही पोलिसांच्या दप्तरात नोंद असलेले गुन्हेगार होते असे म्हणतात. रत्नजडित सोन्याचा डबा, सोन्याच्या कपबशा चोरताना त्यांचे लक्ष तेथील कुराणाच्या सुवर्णाकित प्रतीकडे गेले, तेव्हा ती उचलण्याचा मोहदेखील त्यांना अनावर झाला होता; पण त्याच वेळी दूरवरून कुठून तरी आलेले प्रार्थनेचे सूर कानावर पडले आणि ती प्रत चोरण्याचा विचार सोडून त्यांनी पलायन केले. निजामाच्या खजिन्यावर डल्ला मारण्याचा हा चोरीचा मामला जगभर गाजला असला, तरी या दोघा चोरांनी हा मामला आगळा ठरविला की नाही?..