राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून मुंबईपासून मेळघाटापर्यंत आणि सावंतवाडीपासून सावनेपर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांचे नाव सदैव दुमदुमत राहिले अशा व्यक्तीला महाराष्ट्राचा ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ करावे असे आमचे फडणवीस सरकारच्या राज्याभिषेकाच्या पहिल्या दिवसापासूनचे मत होते. अशी व्यक्ती कोण असू शकते याचा शोधही आम्ही आमच्या उलटय़ा चष्म्यातून लगोलग सुरू केला होता. कारण सर्वसाधारण सुलटय़ा चष्म्यातून एवढय़ा सूक्ष्मपणे पाहता येत नाही असे आमचे मत आहे. महाराष्ट्राचा डिंडिम सर्वदूर वाजवू शकेल, असे एक नाव तेव्हा आमच्या नुसतेच नजरेसमोर होते, पण पुढे या नामाचा महिमाही लक्षात येऊ  लागला. आता तर आम्ही त्यावर शिक्कामोर्तबच करून टाकले आहे. एवढय़ा वर्णनानंतर आता, ही व्यक्ती कोण हे तुमच्याही लक्षात आले असेल. पुण्याच्या प्रभात शाखेत उपस्थिती लावणारा, पिंपरीच्या ‘शिवशक्ती संगमा’त पूर्ण गणवेशात दिसणारा, ‘हिरव्या देठा’चा नेता हाच महाराष्ट्राचा आदर्श राज्यदूत होऊ  शकतो, याबद्दल आमच्या मनात आधीपासूनच कोणतीही कोणतीच शंका नव्हती. पुढे बाजारातून तुरी गायब झाली आणि राजकीय मारामारी सुरू झाली तेव्हाही साऱ्या देशाच्या, तमाम राजकीय नेत्यांच्या नजरा याच व्यक्तीवर खिळल्या होत्या. राज्याच्या पोषणाचा भार पेलणाऱ्या, सुपोषित मुंबईपासून कुपोषित मेळघाटापर्यंत सर्वत्र चर्चेत असलेल्या या व्यक्तीस महाराष्ट्राचा राज्यदूत म्हणून नियुक्त  केले, तर महाराष्ट्र ही काय ‘चीज’ आहे हे वेगळ्याने सांगावयाची गरजच राहणार नाही, अशी आमची धारणा होती. ती फळाला येण्याची धूसर चिन्हे आम्हाला जाणवू लागली आहेत. आता तर महाराष्ट्राचे हे ‘गौरव’चिन्ह पुण्यनगरीच्या विकासाची आस उरी घेऊन उगवत्या सूर्याच्या देशात दाखल झाले आहे. कीर्तीचा झेंडा अटकेपार पोहोचविण्याची परंपरा लाभलेल्या पुण्यनगरीचे पालकत्व पदरी पडलेल्या या हिऱ्याला या दौऱ्यानंतर आता स्वतेजाने चमकण्याइतपत पुरेसे पैलू पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच, महाराष्ट्राला कीर्तिमान घडविण्यासाठी याच व्यक्तीला राज्याचा ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’, अर्थात, ‘महा-राज्यदूत’ म्हणून घोषित करावे, अशी आमची मागणी आहे. ज्याच्यासोबत ‘गौरव’ सदैव सावलीसारखा वावरत असतो, तो महाराष्ट्रालाही गौरव मिळवून देईल, असे आमचे फार प्रामाणिक मत आहे. महाराष्ट्राला थोरामोठय़ांची परंपरा आहे. पदामुळे मिळणाऱ्या सरकारी लाभांचा फायदा घेत कुटुंबकबिल्यासह परदेशवाऱ्यांवर वारेमाप उधळपट्टी करण्याच्या महाराष्ट्राच्या ‘प्रतिभा’शाली परंपरेचा तर काही वर्षांपूर्वी देशभर गवगवा झाला होता. या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता असणे हादेखील एक गुणच म्हटला पाहिजे. या व्यक्तीने तो गुण इतक्या लवकर आत्मसात केला, याचेही आम्हाला कौतुकच वाटते. म्हणूनच, या प्रतिभाशाली परंपरेचा पाईक ठरणारी ही व्यक्तीच या सन्मानाचा मानकरी होऊ  शकते, यावर आम्ही ठाम आहेत. एवढे सारे वाचून तुमच्या डोळ्यांपुढे गिरीश बापट यांची प्रतिमा उभी राहिली असेल, तर तो एक दुर्मीळ योगायोग समजावा!