13 December 2018

News Flash

गरीब वाघाची गोष्ट

पत्रकारांच्या जगात ‘बातमी'ची एक साधी व्याख्या सांगतात.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पत्रकारांच्या जगात ‘बातमी’ची एक साधी व्याख्या सांगतात. ‘कुत्रा माणसाला चावला, तर ती बातमी होत नाही. माणूस कुत्र्याला चावला तर मात्र, ती बातमी असते’. असे असेल, तर एका वाघाची ही गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगितलीच पाहिजे. पण ही केवळ एका वाघाची गोष्ट नाही, तर ती एका ‘गरीब’ वाघाची गोष्ट आहे. कदाचित, तुम्हाला आता यात बातमी वाटणार नाही. कारण ‘गरीब वाघ’ काही पहिल्यांदाच पाहिला नाही असे तुम्ही म्हणाल. पण हा खरोखरीचा, जंगलातला, पट्टेरी वाघ आहे आणि तरीही तो गरीब आहे, म्हणून त्याची गोष्ट ही ‘बातमी’ होते. त्याशिवाय, या वाघासंदर्भात आणखीही एक आनंदाची बातमी आहे. हा गरीब वाघ, लवकरच मुंबईकरांना आणि जिवाची मुंबई करावयास येणाऱ्या प्रत्येकास चक्क मुंबईत पाहायलादेखील मिळणार आहे.

आता तुम्ही म्हणाल, ‘गरीब वाघ मुंबईत’ यात तरी बातमी काय आहे?.. तर त्याचे उत्तर असे की, हा चक्क खराखुरा वाघ आहे आणि लवकरच त्याला नागपूरहून मुंबईत आणण्यात येणार आहे. नागपूरचा वाघ मुंबईत येणार म्हटल्यावर आता तुम्ही नक्कीच थोडेसे सरसावून ही बातमी वाचली असेल. तर, हा वाघ, मुळातच गरीब आहे. नागपुरातला असूनही त्याने कुणाला त्रास वगैरे दिलेला नाही. एकदा तर तो मध्य प्रदेशातील एका गावात चक्क एका लग्नमंडपात शांतपणे फेरफटका मारून आला होता.

एकदा खूप भूक लागली म्हणून त्याने भंडाऱ्याजवळच्या रानात एका मजुराचा जेवणाचा डबाच पळविला होता.. आता तुम्हाला थोडासा संशय येऊ लागला असेल.. हा खरोखरीच वाघ आहे, की एखाद्या मांजराची गोष्ट ‘वाघाची बातमी’ म्हणून सांगितली जात आहे?.. तर या संशयाचे निराकरण करण्यासाठी तुम्ही आणखी दोन महिन्यांनी मुंबईच्या संजय गांधी व्याघ्र प्रकल्पाला नक्की भेट द्या. तिथे तुम्हाला हा गरीब वाघ पाहायला मिळेल. गरीब वाघ असतात हे खरे आहे, पण नागपुरातून मुंबईत येणारा हा खराखुरा वाघ खरोखरीच गरीब आहे. ‘जबडय़ात घालुनि हात, मोजतो दात, जात ही अमुची’ असे मागे एकदा आपले मुख्यमंत्री म्हणाले होते. तेदेखील नागपूरकरच असल्याने, त्यांनी बहुधा याच वाघाचे दात मोजले असावेत, या शंकेस वाव आहे. तर हा वाघ मुंबईत येणार असल्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र प्रकल्पास नवी शोभा येणार आहे, याबद्दल कुणाचेच दुमत असू नये. बोरिवलीच्या या व्याघ्र प्रकल्पात वाघांचे भले व्हावे, यासाठी त्यांना दत्तक घेण्याची योजना पुढे गेली ती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे!

मात्र अनेक वाघ कालपरत्वे आता म्हातारे झाले आहेत. म्हणूनच या गरीब वाघाची भर उद्यानातील व्याघ्र प्रकल्पात पडली पाहिजे. खरे म्हणजे, या वाघाला ‘राणीच्या बागे’त ठेवले असते, तर मुलेबाळे त्याच्या पिंजऱ्यासमोर प्रेमाने बागडली तरी असती. पण सरकारने नागपूरच्या गरीब वाघास मुंबईत आणण्याचा निर्णय घेऊन मुंबईच्या व्याघ्र संख्येत एक भर घातली हेही काही कमी नाही.

नागपूरच्या या वाघास मुंबईची हवा नक्की मानवेल, अशी सरकारला खात्री आहे म्हणे! तसेही, मुंबईतील गर्र्दीच्या गजबजाटात, वाघांनी गरीब असणेच चांगले..

First Published on March 8, 2018 2:38 am

Web Title: tiger reserve in sanjay gandhi national park