बातम्यांच्या विस्फोटाचा धसका बहुधा प्राण्यांच्या जगातही पसरला असावा. नाही तर, गुजरातच्या विधिमंडळ सचिवालयात एक बिबटय़ा दहा तासांहून अधिक काळ दडी मारून बसलाच नसता. महाराष्ट्राच्या जंगलात अवनी वाघिणीला ठार मारल्याची बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावर चघळली जाऊ लागली, तिच्या मृत्यूमुळे आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले; तरी अवनीचा जीव गेला तो गेलाच.. ती आता परत येणार नाही, हे तमाम प्राणिमात्रांना एव्हाना कळून चुकले असावे. त्यामुळे आता त्यांना आपल्या सुरक्षिततेची चिंतादेखील वाटू लागली असेल. जंगलोजंगलीच्या वाघसिंहादी प्राण्यांनी जीव मुठीत धरून सुरक्षित जागा शोधायचा निर्णयच घेतला असावा, अशी शंका येण्यासारखीच ही परिस्थिती! ..अवनीच्या मृत्यूची बातमी सर्वदूर पसरली तशी ती जंगलातही पोहोचली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माणसाला प्राण्यांची भाषा समजत नाही. आता तर, जंगली प्राणी आणि माणसे यांच्यातील अंतर वाढतच असून यापुढे त्यांची भाषा माणसाला समजणे अधिकच दुरापास्त झाल्याने, जंगली प्राणी सुरक्षित जागेच्या शोधात वणवण करून दडी मारून का बसू लागले आहेत, या कोडय़ाची उकल माणसाला होईल अशीही शक्यता नाहीच. गुजरातेत गांधीनगरमध्ये विधिमंडळाच्या सचिवालयाच्या एका प्रवेशद्वारातून एक भेदरलेला बिबटय़ा रात्रीच्या अंधारात दबक्या पावलांनी प्रवेशकरता झाला. विधिमंडळाचे सचिवालय असल्याने, या इमारतीला सुरक्षारक्षकांचा वेढा असणार आणि त्यांची नजर चुकवून झुरळदेखील इमारतीच्या आवारात शिरू शकणार नाही एवढा कडेकोट बंदोबस्त असणार अशी सर्वसाधारण समजूत असते. पण या बिबटय़ाने बंदोबस्ताचे कडे बेमालूमपणे तोडले आणि सचिवालयाच्या इमारतीत दडी मारली. म्हणजे, अवनीच्या बातम्यांमुळे तो भेदरलेला असावा या शंकेस वाव आहे. ही बातमी चघळली जात असतानाच, तिकडे उत्तर प्रदेशात दुधवा व्याघ्र प्रकल्पातील एका वाघिणीच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिला ठार मारल्याची बातमी पसरली. जंगली प्राण्यांच्या जगात घबराट माजविणारी अशी ही नवी बातमी येऊन थडकल्याने सरभर होऊन सुरक्षित जागेच्या शोधात हा बिबटय़ा जंगलाबाहेर पडला असावा आणि दडी मारण्यासाठी त्याला बहुधा ही जागा सुरक्षित वाटली असावी असा तर्क बांधता येऊ शकतो. अर्थात, बिबटय़ा किंवा कोणत्याच जंगली प्राण्यांना माणसांच्या जगातील माध्यमांची भाषा कळते किंवा नाही हे स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे या बातम्यांनंतर हा बिबटय़ा जिवाच्या भयाने तेथे गेला असावा असा केवळ तर्कच लढविता येतो. या बिबटय़ाच्या शोधासाठी सुमारे शंभर सुरक्षारक्षकांनी कंबर कसली, तो सापडेपर्यंत विधिमंडळाच्या कामकाजास सुट्टी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. अखेर तो इमारतीतून निघाला असावा, असा निष्कर्ष निघाला. ऐन दिवाळीत बिबटय़ामुळे न मागता मिळालेल्या सुट्टीबद्दल कर्मचारी त्याचे मनोमन आभार मानत असले, तरी बिबटय़ा अजूनही दडून बसला आहे का, हेही शोधावे लागणार आहे. कदाचित, त्याला सुरक्षिततेची जाहीर हमी हवी असेल. एखादी पत्रकार परिषद घेऊन ती द्यावी, विविध माध्यमांतून त्याचे थेट प्रसारण करावे, म्हणजे ती बातमी त्याच्यापर्यंत पोहोचून कदाचित तो बाहेर येईल. असा प्रयोग करून पाहावयास हरकत नाही..