22 November 2019

News Flash

देव दीनाघरी धावला!

गेल्या काही दिवसांत मदतीसाठी धावून आलेली माणुसकी हेदेखील देवाचेच रूप असल्याचा साक्षात्कार असंख्य संकटग्रस्तांना झाला.

(संग्रहित छायाचित्र)

तो कोणत्याही रूपात, कोठेही दिसतो. कधी झाडांमध्ये, तर कधी दगडामध्ये दिसतो. खरे म्हणजे, देव ही निव्वळ एक संकल्पना आहे. कधी कुणा गरजवंतास अचानक कुणाचा मदतीचा हात मिळतो आणि संकटातून बाहेर काढणाऱ्या त्या हातामध्ये त्या गरजवंतास देवाचे रूप दिसू लागते. गेल्या काही दिवसांत मदतीसाठी धावून आलेली माणुसकी हेदेखील देवाचेच रूप असल्याचा साक्षात्कार असंख्य संकटग्रस्तांना झाला. तसे पाहिले तर जेथे देवाचे हातही तोकडे पडतात, तेथे बचावासाठी आणि मदतीसाठी धावून येणारे सरकार हा देवाचाच आविष्कार असतो. आजकाल तर, सरकारची मेहेरनजर असावी, यासाठी देवस्थानेही ताटकळताना दिसतात आणि सरकार प्रसन्न झाले तरच देवस्थानासही अच्छे दिन येतात. म्हणून सरकार हाच आजकालचा खराखुरा भगवान असतो. ज्याच्या अंगी दीनदुबळ्यांच्या उद्धाराची शक्ती तोच खरा देव, असे मानल्यास सरकारविना दुसरा देव नाही, हेच आजचे सत्य आहे. ज्याच्या तिजोरीत भक्तांकडून गडगंज पैसा जमा होत असतो, खजिन्यात अमूल्य दागदागिन्यांच्या रूपाने कोटय़वधींची संपत्ती गोळा होते, त्या तिरुपतीच्या बालाजी वेंकटेश्वरालादेखील अलीकडेच महाराष्ट्रात सरकारच्या देवत्वाचा साक्षात्कार घडला आणि देवावरही मेहेरबान होण्याचा चमत्कार घडविण्याची शक्ती केवळ सरकारकडेच असते, याची प्रचीती भाविकांनाही आली.. देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ख्याती असलेल्या तिरुपती बालाजी देवस्थानास महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबई महानगरीत मोक्याच्या जागी कोटय़वधींचा भूखंड केवळ एक रुपया नाममात्र भाडय़ाने बहाल करण्याचे दातृत्व दाखविणारे आणि पश्चिम महाराष्ट्रात पुराच्या विळख्यात सापडून केविलवाणी प्रतीक्षा करणाऱ्या हजारो पूरग्रस्त कुटुंबांना पाच हजारांची रोखीची मदत जाहीर करणारे सरकार म्हणजे दोघांच्याही दृष्टीने देवाचीच रूपे आहेत. सर्वशक्तिमान मानल्या जाणाऱ्या वेंकटेश्वरासही मुंबईतील मोक्याच्या भूखंडाच्या रूपाने महाप्रसाद देणारे राज्य सरकार हे दीनदुबळ्यांच्या मदतीसाठी धावणाऱ्या देवाचेच दुसरे रूप आहे, याची खात्री आता या देवस्थानासही पटलीच असेल. आता मुंबईतील या मोक्याच्या जागी तिरुपती बालाजीचे एक मंदिरही उभे राहणार असल्याने, भगवंतास साकडे घालण्यासाठी, त्याच्या दर्शनाचे पुण्य पदरी जोडण्यासाठी कित्येक तासांचा खडतर प्रवास करून तिरुमला गाठण्याची गरज नाही. सरकारने दिलेल्या या भूखंडावर उभ्या राहणाऱ्या मंदिराच्या रूपाने देवालाच दाराशी उभे करणारे सरकार म्हणजेच देव या वास्तवाची भक्तांनाही खात्री पटेल यात शंकाच नाही. या देवस्थानाच्या विश्वस्त मंडळावर कुणा मंत्र्याच्या पत्नीची वर्णी लागावी यासाठी हा भूखंड देवस्थानला बहाल करण्याचा निर्णय सरकारने घेतला अशी चर्चा आहे. ती असली, तरी त्याच्याशी भक्तांना देणेघेणे नाही. शेवटी गोरगरिबांच्या, गरजवंतांच्या आणि दीनदुबळ्यांच्या साह्य़ासाठी जो धावून जातो तो देव असतो, हे एकदा मान्य केले, की सरकार हेच देवाचे रूप असते. प्रत्यक्ष वेंकटेशाची मुंबईतील जागेची अडचण सोडविण्यासाठी शेवटी सरकारच धावून गेले, हे वास्तव आहे. असे काही झाले, की ‘देव दीनाघरी धावला’ या उक्तीचीच प्रचीती येते!

First Published on August 13, 2019 12:02 am

Web Title: tirumala tirupati devasthanam get plots in mumbai abn 97
Just Now!
X