शेतकऱ्यांचा माल हाय, शेतकऱ्यांचा सेल हाय.. आडतमुक्त भाजी, नियंत्रणमुक्त भाजी.. अशी हाळी भल्या पहाटे दादरच्या भाजी मार्केटातून उठली आणि अवघा बाजार थरारून गेला. इंडियातल्या भारतातल्या शेतांतून, वावरांतून, गावपांद्यांतून या हाळीचे प्रतिध्वनी निनादले. जयकिसानांच्या, कास्तकारांच्या दुष्काळग्रस्त डोळ्यांना तर भारतातल्या इंडियातसुद्धा आता बळीचे राज्य येते की काय असे किंचित स्वप्न पडून गेले. याचे कारण ही हाळी कोणा किरकोळ व्यापाऱ्याची नव्हती. ती ज्या स्वरयंत्रातून उमटली होती ते होते देवेंद्र सरकारांच्या नव्या स्वाभिमानी राज्यमंत्र्याचे. ते होते शेतकऱ्यांच्या मनबांधावर राज्य करणाऱ्या सदाभाऊ खोतांचे. दादरच्या प्लाझा मार्केटात शेतकरी कम विक्रेत्यांच्या खांद्याला खांदा लावून, त्यांना संरक्षण देत, खुद्द सदाभाऊ भाजी विकायला उभे राहिले होते. राज्याच्या इतिहासाने राज्य विकायला काढणारे अनेक मंत्री पाहिले आहेत. कोणी जलसंपदा विकले, तर कोणी महसूल विकले. हा पहिलाच असा मंत्री की जो बाजारात भाजी विकायला उभा राहिला. दिल्लीच्या अरविंदांनाही जे जमले नाही ते सदाभाऊंनी केले. राज्यातील असंख्य बळीराजांनी आदर्श घ्यावा असाच तो प्रसंग होता. कारण आता आपल्या नांगरधारी शेतकऱ्यालाच हातात तागडी घेऊन बाजारचा मानकरी बनण्याशिवाय गत्यंतर नाही. यातूनच आता एक नवा इतिहास घडणार आहे. तो एवढा क्रांतिकारी असेल, की उद्या हुतात्मा चौकातील शेतकऱ्याच्या एका हाती मशालीऐवजी नांगर आणि दुसऱ्या हाती तराजू असा नवा पुतळा खचितच उभारावा लागणार आहे. नांगरधारी शेतकरी, भाजी मार्केटांचा मानकरी, अशी एक नवी घोषणाही यातून जन्मणार आहे. कारण या पुढे गावोगावच्या भाजी बाजारातही ‘कसेल त्याची जमीन’ अशा प्रकारे ‘पिकवेल तो विकेल’ असा कायदा लागू होणार आहे. चित्रच बदलणार आहे यातून महाराष्ट्राचे. हरेक कास्तकार आता रामप्रहरी शेतातून बाहेर पडेल. कोपरी-बंडी-टोपी उतरवून अंगात मलमलीचा पांढराफेक कुर्ता चढवेल. त्याला चमचमत्या गुंडय़ा, मस्तकी झोकदार टोपी लावून आपला ‘गार्डनफ्रेश’ माल विकायला बाजारात येईल. तो शेती कधी करील हा त्याचा प्रश्न. एरवीही तसे बहुतेक शेतकरी रात्रीच पाण्याच्या पाळ्या भरत असतात शेतात. पण यामुळे बाजारात किती कौतुकास्पद दरक्रांती होईल. ताज्या ताज्या भाज्या ग्राहकांना स्वस्तात मिळतील. बळीराजा युगानुयुगे पाहत असलेले हे स्वप्न साकार करण्याचा नागवेलीचा विडाच सदाभाऊंनी उचलला आहे. म्हणून तर ते शेतकऱ्यांच्या शोषकांना आवाज देत भल्या पहाटे भाज्या विकायला उतरले. मंत्र्यांच्या कार्याची व्याख्याच बदलली त्यांनी. आता शेतकऱ्यांचे त्यांच्याकडे एकच मागणे असेल. की सदाभाऊंनी अशीच कृपा ठेवावी आणि रोज पहाटे बाजारात यावे. नाही तर शेतकऱ्यांना बाजारात उभे राहायला जागा कोण देणार? ती मिळेपर्यंत तरी सदाभाऊ भल्या पहाटे भाजी मार्केटात दिसतील यात बाकी शंका नाही. प्रश्न एवढाच आहे की एका वेळी ते किती मार्केटे सांभाळतील?