रविवारचा दिवस असला, तरी मोरू लवकरच उठला. आळस झटकून कामाला लागला. त्याच्या मोबाइलच्या कॅलेंडरवर आजचा दिवस ठळकपणे दिसत होता. सुटी असल्याने आज काय काय करायचे, हे मोरूने पक्के ठरवलेले होते. त्याच्या दिवसभराच्या कामांची यादी मोठी होती. त्यात नेहमीप्रमाणे मॉलला भेट, मित्रांबरोबर चकाटय़ा, संध्याकाळचा पावभाजीचा बेत.. असले काही काही नव्हते. आजचा दिवस त्याच्यासाठी खासच होता. त्यात सकाळीच वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची नोंद होती. झाडाच्या रोपासाठी खड्डा खणून तयार असणार होता आणि पाण्याची झारीही. फक्त जाऊन रोप लावायचे. फावडय़ाने खड्डय़ात माती ओढायची.. पण हे सारे करताना, समोर असलेल्या कॅमेऱ्यात सतत पाहात राहायचे. चेहऱ्यावरील हसू जराही ढळू न द्यायचे.. हे सारे मोरू गेली अनेक वर्षे करत आला होता. सवयच होती त्याला. घरातला कचरा ओला आणि सुका असा वेगवेगळा करण्याची आठवण मोरूने आपल्या ‘थिंग्ज टू डू’मध्ये ठळक अक्षरात नोंदवली होती. मग त्याने घरातला कचरा वेगळा करून तो जिरवण्यासाठी शोधाशोध केली. ओला कचरा जिरवला, तरीही सुक्याचे काय करायचे, हे त्याला माहीत नव्हते. मग त्याने प्लास्टिकच्या बादलीत कचरा गोळा केला आणि पालिकेची कचरा गाडी येण्याची वाट पाहिली. उद्यापासून हे काम रोजच्या रोज कोण करेल? अशा शंकेने त्याला गहिवरूनही आले. पण आजच्या कामांच्या यादीतील सगळी कामे करण्याचा त्याचा निश्चय होता. झकपक करून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमस्थळी जाण्याची मोरूची लगबग घरातल्यांच्या लक्षात आली होती. पण त्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्षही केले. रोपटे लावल्यानंतर मोरूला आपण वसुंधरेवर किती मनापासून प्रेम करतो, याची जाणीव झाली आणि तो आतून बहरून आला! तिथे जागतिक पर्यावरणाच्या समस्यांचा ऊहापोह करणारी भाषणे ऐकत असतानाही, त्याच्या डोक्यात निराळेच विषय घोळत होते. जवळच्या पर्यटनस्थळी जाऊन वर्षभर आलेल्या पर्यटकांनी टाकलेला प्लास्टिकचा कचरा गोळा करणे, हे त्याच्या यादीतील एक काम होते. तिथे जाताना पिण्याच्या पाण्याची आबाळ होऊ नये, म्हणून त्याने प्लास्टिकच्या दोन बाटल्याही बरोबर घेतल्या होत्या. या बाटल्या आज रस्त्यावर फेकायच्या नाहीत, यासाठी त्याने स्वत:ला अनेकदा बजावलेदेखील. शाळेत पर्यावरण हा एक विषय होता. तो सक्तीचा असल्याने, आपोआपच मोरूने त्याकडे दुर्लक्ष केले होते. आज त्याला ते सारे आठवले आणि आपली चूकही उमगली. वृत्तपत्रांतून आजच्या दिवशी आलेला मजकूर आपल्या चिकटवहीत लावायचेही त्याने मनोमन ठरवले. पाऊस येण्याच्या आत आपल्या सोसायटीच्या इमारतींवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची व्यवस्था करण्यासाठी अध्यक्षांची भेट घेण्याचेही त्याने ठरवले. सारा दिवस पर्यावरणासाठी झटणाऱ्या मोरूला उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘रोजर्मे की दुनिया’ची आठवण आली आणि मग मात्र तो शहारून गेला!