12 December 2017

News Flash

सुंदर ती दुसरी दुनिया..

महाराष्ट्राची राजधानी असलेले मुंबई हे महानगर देशाच्या विकासाचे मॉडेल झाले पाहिजे

लोकसत्ता टीम | Updated: July 11, 2017 2:06 AM

राज्यकर्ते केवळ ‘जाणते’ किंवा ‘धोरणी’ असून चालत नाहीत. ते ‘द्रष्टे’देखील असावे लागतात. असे ‘त्रिगुणी’ राज्यकर्ते आपल्याला सदैव लाभले. तसे नसते तर, भूतकाळातील शहाणपणाचे कित्ते गिरवत वर्तमानकाळाची पावले ओळखणे आणि भविष्याची तरतूद करणे राज्यकर्त्यांना साधलेच नसते. महाराष्ट्राची राजधानी असलेले मुंबई हे महानगर देशाच्या विकासाचे मॉडेल झाले पाहिजे, हे उभ्या देशाचे स्वप्न असल्याने गतिमान विकासाचे सारे प्रकल्प अगोदर मुंबईतच जन्माला येणे यापुढे अटळ आहे. हे वास्तव एकदा निश्चित झाले, की नाइलाजाने का होईना, त्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास होणार हे वास्तवही ओघानेच येते. पूर्वी कधीकाळी, मुंबईच्या समुद्रात आणि खाडय़ांमध्ये भराव टाकून गिरगाव-वरळी जोडले गेले, लोखंडवाला संकुल उभे राहिले, नरिमन पॉइंट आणि वांद्रे-कुर्ला संकुलाची नवी व्यापारभूमीदेखील याच भरावातून उभी राहिली. इतिहासाच्या या बोधकथेपासून प्रेरणा घेऊन भविष्यकाळातील विकासाची वर्तमानाशी सांगड घालण्याचे धोरणी द्रष्टेपण असलेले राज्यकर्ते आता याच इतिहासाची पुनरावृत्ती करू पाहात आहेत. मुंबईतील मेट्रो प्रकल्पासाठी या शहराच्या आजपर्यंतच्या विकासाच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या शेकडो वृक्षांचा ‘उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी’ जिवंतपणी बळी द्यावा लागल्याने, राज्यकर्त्यांच्या या द्रष्टेपणाला जाग आली आणि मुंबईत कुलाब्याच्या समुद्रात भराव टाकून ३०० एकराची नवी वनभूमी तयार करून हरवलेली हिरवाई जिवंत करण्याचे स्वप्न महापालिकेत रुजले. असे द्रष्टेपण अंगी असले की, काय करू अन् काय नको, असेही होऊन जात असावे. मेट्रो आणि सागरी महामार्गाच्या खोदाईतून निर्माण होणारी हजारो घनमीटर माती समुद्रातील संकल्पित शिवस्मारकासाठी वापरण्याची योजना याआधी तयार होती, पण महापालिका निवडणुकीत मनाजोगता कौल मिळाला आणि शिवस्मारकाचे भविष्य तात्पुरते लांबणीवर पडण्याचा मार्ग मोकळा झाला. आता पुढच्या निवडणुकीपर्यंत शिवस्मारकाचा विषय बासनात ठेवण्यात कोणतीच अडचण नाही हे लक्षात आल्याने, मेट्रोच्या मातीचे काय करायचे, हा नवा प्रश्नदेखील चुटकीसरशी सोडवावा लागला आणि मुंबईत कुलाब्याजवळ नवी वनभूमी तयार करण्याचे स्वप्न पालिकेला पडले. आता या मातीच्या भरावातून नव्या संधींचे सोनेही हाती लागेल. मातीच्या वाहतुकीची कंत्राटे निघतील, रोजगाराच्या नव्या संधी जन्म घेतील, आणि माती म्हणजे केवळ माती नसते, तर त्यातही संधींचे सोने सापडते याचा साक्षात्कार अनेक यंत्रणांनाही होईल. वनभूमीच्या भरावाची घोषणा झाली, की समुद्रातील हिरवाईच्या सुखद स्वप्नांत मुंबईकर काही काळ हरखून जातील. स्वप्नातल्या त्या वनभूमीतून वाऱ्याची झुळूक कधी तरी हळूच मुंबईला आगामी निवडणुकीची चाहूल देतील आणि तेव्हा मग, शिवस्मारकाचे जुने स्वप्नदेखील तरारून उठेल.. द्रष्टेपण असले, की काहीही अशक्य नसते, ते असे!

First Published on July 11, 2017 2:06 am

Web Title: tree plantation project marine drive bmc