17 December 2017

News Flash

स्वागताचा हॅशटॅग

ना याचा कोणी हॅशटॅग बनविला

लोकसत्ता टीम | Updated: September 29, 2017 4:36 AM

ट्विटरवरील १४० अक्षरांची मर्यादा अनेकांसाठी अडचणीची ठरत होती. ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ना याचा कोणी हॅशटॅग बनविला, ना कोणाच्या आयटी सेल नामक प्रकरणाने तो ‘चालवला’, परंतु अनेकांच्या मनातून एकच ट्विप्पणी कालमितीस होती. ती म्हणजे – #हुश्श. आमच्या मनात तर शब्दश सुटल्याचीच भावना होती. म्हणजे १४० टंकखुणा ही काय मर्यादा झाली लेखनाची? आमच्या मराठीत व आमच्या मराठी-इंग्रजीत लेखन म्हणजे कसे भारदस्त हवे! त्यात नमनालाच घडाभर खनिजतेल हवे. मग छानसा रसभरीत पाल्हाळ हवा. त्यात शब्दांशी लडिवाळ खेळ हवा. मग कुठे मुद्दय़ाला यायचे. किंबहुना मुद्दा नसला तरी एकवेळ चालेल. परंतु बसल्या जागी किमानपक्षी हजारेक शब्दांचा ऐवज असा हा हा म्हणता उतरला पाहिजे. एवढे झाले म्हणजे कुठे आपल्या विचार्रवंतांस मत्त मांडल्यासारखे वाटते. परंतु अमेरिकी ट्विटरकर्त्यांना हे कुठून कळायला? त्यांनी अट्ट घातली की १४० शब्द. बस्स. यापुढे वजावटीची लाल खूण. गेली कित्येक वर्षे हा अन्यायच चालला होता. परंतु अखेर त्यांनाही खास लोकाग्रहास्तव ही अट रद्द करावीच लागली. म्हणजे फार नाही. पळत्या चोराची लंगोटी म्हणतात, त्याप्रमाणे त्यांनी आपणां विचारवंतांस २८० शब्दखुणांची वाढ करून दिली. अर्थात हेही नसे थोडके. यामुळे आता आपणांस अधिक मोकळेपणाने ही ट्विप्पणी सेवा वापरता येईल. एरवी बोवा, प्रश्नच पडायचा, की एवढे व्हाट्स्याप विद्यापीठ आपल्या हाती; परंतु त्यातील ज्ञानकण आपणांस फॉरवर्डण्याखेरीज काहीच करता येत नाही. आता तेही ट्विटरवर टाकता येतील. त्यामुळे हे एक नवेच विद्यापीठ जन्मास येईल. त्यास ट्विटर विद्यापीठ म्हणता येईल. त्याचाही अनेकांना लाभच होईल. शिवाय अनेकदा व्हायचे काय, की लिबटार्ड, प्रेस्टिटय़ूटांपासून अ‍ॅण्टी न्याशनलांपर्यंत असंख्यांच्या बाबत आपल्या मनी पूज्य भाव तरळायचा, की यांस साग्रसंगीत गालीमंत्राक्षरे अर्पण करावीत. किंतु ते राष्ट्रकार्य शब्दमर्यादेमुळे अधुरेअपूर्णच राहायचे. आता ती गालीमंत्राक्षरे अधिक म्हणता येतील. आता काही नतद्रष्टांस वाटेल, की यामुळे जल्पकांच्या जल्पनेला सुमार राहणार नाही. परंतु अखेर आपण कोठे उभे आहोत त्यावरच नाही का जल्पक कोण आणि जल्पना काय हे ठरत? तेव्हा त्या टीकेकडे लक्ष देण्याचे काहीच कारण नाही. उलट या सर्व गालीमंत्राक्षरांमुळे ट्विटरला आज जे सामाजिक व्यासपीठाचे स्वरूप आले आहे, ते अधिकच भक्कम होईल. समाजप्रबोधनाचा हा मोठाच उपक्रम ठरेल. याचे आर्थिक परिणामही होणार आहेत, याची जाणीव आपल्या अर्थतज्ज्ञांना नसेलच. वस्तुत शब्दमर्यादावाढीमुळे काम वाढल्यामुळे आयटीसेल कर्मचाऱ्यांच्या वेतनातही घसघशीत वाढ होईल. तेव्हा ट्विटरच्या या निर्णयाचे स्वागतच करावयास हवे. किमानपक्षा तसा एखादा हॅशटॅग तर बनलाच पाहिजे.

First Published on September 29, 2017 4:23 am

Web Title: twitter just doubled the character limit for tweets to 280