16 January 2019

News Flash

‘बजाव पुंगी’!..

दादा तर कधीपासून उभा दावा धरल्यागत वागत असतात.

‘घोर अपमान.. आज राजेशाही असती आणि आम्ही तख्तावर असतो, तर त्यांना धडा शिकविला असता!’ दिवाणखान्यात संतापाने येरझारा घालता घालता राजे अचानक थबकले आणि अदबीने बाजूला उभे असलेल्या मनसबदारांनी एकमेकांकडे पाहात खाणाखुणा केल्या. काही क्षण असेच गेले. समोरचा प्याला उचलून राजेंनी जलपान केले. तोवर दालनात कुजबुज सुरू झाली होती. पवारांनी कॉलर उडवून दाखवत राजेंची नक्कल केल्यामुळे मनसबदारांमध्ये अस्वस्थता होती. राजेशाही संपून कितीतरी दशके लोटली होती. आता आपण लोकशाहीत आहोत, शिवाय, घराण्यातही राजकीय स्पर्धकांचे डावपेंच सुरू झाले आहेत. गेल्याच आठवडय़ात, शिवेंद्रराजेंनी अजितदादांना घडय़ाळाचे काटे फिरवून दाखविले, तेव्हाच, राजकारणाचे रंग बदलणार अशी शंका अनुभवी राजांना आली होती. दादा तर कधीपासून उभा दावा धरल्यागत वागत असतात. आता तर जाणत्या राजांनी कॉलर उडवून दाखविली. आता काही तरी नवा डाव सुरू होणार याची कुणकुण खास दरबारी हेरांकडून राजांना लागली होती. ‘आता पहिली चाल आपणच खेळली पाहिजे’ डोळे बारीक करून मनसबदारांकडे पाहात राजे बोलले आणि सर्वानी माना डोलविल्या. खलबते सुरू झाली.

बराच वेळ गेला, आणि खलबतखान्यातून एक एक जण बाहेर पडू लागला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. आता नवीन काय शिजले असावे, याची चर्चा रयतेत सुरू झाली. दुसरा दिवस उजाडताच राजेंनी शहर सोडले. त्यांची गाडी मुंबईच्या दिशेने सुसाट निघाली. काही तासांतच राजे ‘वर्षां’वर पोहोचले होते.. सारे काही मनसबदारांच्या बैठकीत ठरल्यानुसार पार पडले होते. पवारांनी कॉलर उडवून दाखवत नक्कल केली आणि लगोलग राजे मुंबईत वर्षांवर पोहोचले हे समजताच तर्कवितर्क सुरू झाले. मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करतानाची छायाचित्रे समाजमाध्यमांवरून सर्वत्र पोहोचल्याची खात्री होताच राजे वर्षांवरून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसत होते. थोरल्या साहेबांनी कॉलर उडवून नक्कल केल्यापासूनची अस्वस्थता कुठल्या कुठे पळाली होती. माध्यमांच्या प्रतिनिधींनी राजेंना गराडा घातला, पण राजे स्वस्थच होते. ‘मी अजून आहे!..’ कुणालाच ऐकू येणार नाही अशा आवाजात राजे पुटपुटले आणि कॉलर उडवत ते गाडीत बसले. गाडी साताऱ्याकडे सुसाट निघाली. काही दिवस शांततेत गेले. खलबतखान्यात मनसबदारांचा राबता वाढला होता. बैठकांवर बैठका सुरू होत्या. रयतेमध्ये चर्चा सुरू झाली होती. मुंबईच्या मोहिमेत राजेंनी काय केले, हे कुणालाच कळत नव्हते.

अखेर तो दिवस आला, आणि राजेंनी तोंड उघडले. निवडणूक लढविणारच असे त्यांनी जाहीर केले. पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर अपक्ष लढणार आणि एकेकाची पुंगी वाजविणार.. पुन्हा एकदा कॉलर उडवतच राजेंनी गर्जना केली, आणि मुंबई भेटीनंतरचा राजेंचा बदलता अवतार पाहून रयतेला राजकारणाचाही अंदाज आला. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा तपशील समजला नाही, म्हणून रयतेत पसरलेली अस्वस्थता आता संपली होती. कराडच्या मोहिमेवरून राजे परतले. साताऱ्यात दाखल झाले, आणि गाडीतून उतरत राजवाडय़ात शिरताना त्यांनी पुन्हा एकदा कॉलर उडविली. मनसबदारांनी एकमेकांना खाणाखुणा केल्या आणि ते खलबतखान्याकडे रवाना झाले..

First Published on May 15, 2018 2:26 am

Web Title: udayanraje bhosale ncp sharad pawar