एक चक्रीवादळ नुकतेच स्वत:भोवतीच गोल गोल फिरून शमले आणि महालाच्या सौंधावर जाऊन राजांनी आसपास नजर फिरविली. ‘‘बरेच नुकसान झाले आहे’’.. पाठीमागे गुंफलेले हात सोडवून तोंडावर फिरवत राजे बोलले आणि मनसबदाराने मान डोलावली. ‘‘राजे, बाहेर वादळ असताना आपण शिकारीसाठी निघणार?’’ मनसबदाराने चाचरतच राजांना विचारले. राजे हसले. मनसबदारास खूण करून ते पुन्हा महालात परतले आणि खास बनविलेल्या सिंहासनावर बसत त्यांनी मनसबदारासही बसण्याची खूण केली. मनसबदार अदबीने समोरच्या आसनावर बसला. त्याच्या चेहऱ्यावर बरीच प्रश्नचिन्हे उमटली होती. राजेही निवांत दिसत होते. ‘‘विचारा आज तुमच्या मनात असतील ते सारे प्रश्न.. आज आम्ही तुमच्या मनातील साऱ्या शंका दूर करून टाकू.. त्यामुळे रयतेलाही अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील..’’ बोलता बोलता राजे उठले. समोरच्या भिंतीवर व्याघ्रजिनाशेजारीच एक विदेशी बनावटीची बंदूक लटकत होती. राजांनी हलकेच खुंटीवरून ती बंदूक उचलली आणि ती हाताळतच ते पुन्हा सिंहासनावर बसले. मनसबदार काहीसा धसकला, पण त्याने तसे दाखविले नाही. थोडे सावरून बसत त्याने राजांना पुन्हा विचारले, ‘‘आजच शिकारीचा बेत आखायचा काय?’’ राजे काहीच बोलले नाहीत. लांबवर कुठे तरी, बहुधा उत्तरेस, बंदूक रोखून राजांनी नेमही धरला. काही क्षण शांततेत गेले. राजेंनी पुन्हा बंदूक खाली ठेवली. ‘‘आता तर सावज समोरच, टप्प्यात येऊन थांबलंय. ही शिकार तर मीच करणार, पण त्यासाठी बंदूक कशाला हवी?.. ते तर दमून बसलंय..’’ राजे हसत हसत म्हणाले. ‘‘पण महाराज, सावज हुशार आहे. ते शिकारीच्या टप्प्यात आलंय, पण त्याच्याही टप्प्यात समोरची शिकार आहेच!’’.. मनसबदारानं धीर करून राजांना सावध केलं. राजेंनी बंदूक बाजूला ठेवली. ते आसपास पाहू लागले. दुसऱ्या भिंतीवर धनुष्यबाण टांगले होते. ‘‘पण या शिकारीसाठी त्याचा आता उपयोग नाही..’’ राजे मनाशी म्हणाले आणि त्यांनी पलीकडच्या भिंतीवर टांगलेल्या तलवारीकडे पाहिले. चाणाक्ष मनसबदाराने ते तातडीने ओळखले. ‘‘राजे, तलवारीची धार बोथट होऊ शकते. शिकार साधीसुधी नाही. त्यासाठी आता काही तरी नवे हत्यार वापरले पाहिजे..’’ मनसबदार म्हणाले आणि दोघंही विचार करू लागले. काही वेळानंतर साहेबांनी घंटा वाजवली. एक चोपदार आत येऊन अदबीने समोर उभा राहिला. ‘‘एक गदा आण..’’ राजांनी चोपदारास फर्माविले आणि मनसबदाराचा चेहरा खुलला.. आपणही गदेचाच विचार करत होतो, हे त्याला आठवले. तेवढय़ात चोपदार गदा घेऊन हजर झाला. आता राजे गदा घेऊन शिकारीस जाणार, ही वार्ता तोवर सर्वत्र पसरली होती. महालाच्या आसपास भालदार, चोपदार, सरदार, मनसबदार कुजबुजू लागले. गदाधारी राजे शिकारीसाठी तयार होत असतानाचा क्षण टिपण्यासाठी दरबारी छायाचित्रकारास पाचारण करण्याचा इशारा मनसबदाराने केला आणि राजे तयार होऊ लागले. पुन्हा एकवार त्यांनी तलवारीच्या पात्यावरून हात फिरविला. धार खरेच बोथट झाली होती. साहेबांनी गदा उचलली आणि ते बाहेर पडले.. महालाबाहेर येताच तुतारीचा नाद घुमला.. राजे पुढे येताच, एका टिपेच्या सुरातील लांबलचक घोषणा सुरू झाली. राजांची पावले नेहमीच्या सवयीने थबकली. हात उंचावून त्यांनी आवाज थांबविण्याची खूण केली आणि पुढच्याच क्षणाला राजे बोलू लागले.. ‘‘जमलेल्या माझ्या तमाम बंधूंनो, माताभगिनींनो..’’ मनसबदार हळूच पुढे झाला. ‘‘राजे, आपण महालातच आहोत..’’ त्याने हलकेच राजांच्या कानात सांगितले आणि गदा सरसावत राजे महालाबाहेरच्या शिकाररथात येऊन बसले.. पुन्हा एकदा बाहेर एक सूर घुमला.. ‘आऽवाऽऽज कुणाचाऽ..’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray interview taken by sanjay raut
First published on: 24-07-2018 at 03:53 IST