विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहाचा डौलच काही न्यारा! हा लाल आणि हा हिरवा असा रंगांचा भेद – जो अनुक्रमे विधान परिषद आणि विधान सभा या वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृहांत परंपरेने पाळला जातो, तोही या मध्यवर्ती सभागृहात मिटतो.. इथले गालीचे परिषदेप्रमाणे हिरवे आणि बसण्याची बाके मात्र विधानसभेच्या गडद लाल रंगाने आच्छादलेली. विरोधी रंगांना एकत्र आणणे हा या  विधिमंडळाच्याच काय, संसदेच्याही मध्यवर्ती सभागृहाचा स्थायीभावच. अर्थात, हल्ली संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात  खासदार जातात ते स्मृतिदिन, जयंती वगैरे प्रसंगी तेथील तसबिरींना फुले वाहण्यापुरतेच. महाराष्ट्र विधिमंडळाचे मध्यवर्ती सभागृह मात्र त्यामानाने जिवंत! बुधवारी याच सभागृहात, व्यासपीठावरून  जाहीरपणे घडलेले हास्यविनोद  हे प्रत्यक्षात राजकीय कोपरखळ्यांसारखेच बोचणारे होते असे वाटेलही कुणाला;  पण ‘आमदारांचे मानसिक, आत्मिक आणि आध्यात्मिक जीवन अधिक संपन्न व्हावे, यासाठी’ या मध्यवर्ती सभागृहाचा  वापर होतो, हेही मान्य करावे लागेल!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अनेक आजी- माजी मंत्री आणि बहुतांश आमदार हे सारेजण विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्यावहिल्या पुस्तकाच्या  प्रकाशन सोहळ्यासाठी बुधवारी जमले होते ते याच मध्यवर्ती सभागृहात. उत्सवमूर्ती फडणवीस यांनी ‘पत्नीचे वेतन माझ्यापेक्षा जास्त’ असे सांगून चार दिवस आधीच महिलादिन साजरा केला, तर ‘आम्ही दोघे मित्र आहोत म्हणून’ माझ्यासाठीच हे पुस्तक लिहिले गेल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘लिहीतच राहा’ यासारखे टोले लगावले, आदी बातम्या देण्यात कुणी कसर सोडलेली नाही. त्याआधी गेल्या जुलैमध्ये याच सभागृहात, तेव्हा  काँग्रेसमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी कोपरखळ्या मारण्याची जबाबदारी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे शरद पवार यांनी पार पाडली. भाजपनेत्यांच्या भेटीगाठी पाटील घेताहेत आणि पक्ष बदलण्याची तयारी त्यांनी चालविली आहे अशी जी काही चर्चा त्या वेळी होती, तिला विनोदनिर्मितीच्या मिषाने शरद पवार यांनी खतपाणीच घातले. पुढे घडलेही तंतोतंत तसेच.. जुलै २०१९ मधील त्या कार्यक्रमानंतर तीन महिन्यांतच  हर्षवर्धन पाटील यांना भाजपतर्फे विधानसभेची उमेदवारी मिळाली. ते पराभूत झाले, ही बाब अलाहिदा. परंतु एवढय़ा दोन कार्यक्रमांच्या इतिहासातून ‘पुस्तक लिहिले-  प्रकाशन मध्यवर्ती सभागृहात- मग पराभव’ आदी अनाठायी साम्यस्थळे शोधू नयेत, हे बरे. फडणवीस यांचे ‘अर्थसंकल्प – सोप्या भाषेत!’ हे ५४ पानी पुस्तक आता हिंदी आणि इंग्रजीतही येणार आहे .  पाटील आणि फडणवीस यांच्या पुस्तक प्रकाशनांचे स्थळ एकच, एवढेच साम्य.

आमदारांचे मानसिक, आत्मिक आणि आध्यात्मिक जीवन अधिक संपन्न व्हावे, यासाठी हेच मध्यवर्ती सभागृह उपयोगी पडते, हेही सुज्ञांस माहीत असेल. प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या शिवानी बहन यांचे प्रवचन २६ फेब्रुवारी २०१९ रोजी याच सभागृहात झाले, त्यासाठी वरील कारण देण्यात आले होते. आज सत्ताधारी असलेल्या अनेकांनी या प्रवचनावर टीका करून बहिष्कारही  घातला होता  हे खरे; परंतु त्यांचेही मानसिक, आत्मिक आणि आध्यात्मिक जीवन आज अधिक संपन्न झालेले नाही काय?