भारत हा प्राचीन काळापासून मागासलेला देश आहे, येथे माणसांच्या बरोबरीने झाडाझुडुपांवर भुतेखेतेही वावरतात आणि विंचू-सापांसारखे विषारी प्राणी तर पावलोपावली आढळतात, ही शतकांपूर्वीपासून पोसली गेलेली ब्रिटिशकालीन समजूत ब्रिटिशांच्या राज्यात आणि त्यामुळे पाश्चात्त्यांच्या मनात अजूनही कायमच असावी असे दिसते. पाश्चात्त्य देशांत भारताविषयी असलेल्या अशा गैरसमजुतींचा पगडा हा अंधश्रद्धेहून तिळमात्रही कमी म्हणता येणार नाही. काशी हिंदू विश्वविद्यालयात, म्हणजे, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीत ‘भूतविद्ये’चा नवा अभ्यासक्रम सुरू होणार अशी बातमी पसरताच या देशांतील माध्यमांची झोप उडाली. भुवया उंचावल्या आणि भारताच्या भविष्याच्या चिंतेने आणि भारताविषयीच्या भूतकाळातील समजुतींनी डोके वर काढले. पाश्चिमात्य देशांतच असे काही वैचारिक वगैरे घडू लागले की त्या वाऱ्यांवर भारतात स्वार होणाऱ्यांनीही त्यांचीच री ओढायचीच असते. तसे झाले, आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयातील भूतविद्या अभ्यासक्रमाचे वाभाडे काढण्यास सुरुवात झाली. भूतबाधा उतरविण्यासाठी मंत्रतंत्र, जारणमारण, मूठकरणी विद्या शिकविणारा अभ्यासक्रम बनारस हिंदू विश्वविद्यालयात सुरू होणार आहे, अशी आवई ब्रिटिश माध्यमांनी उठविली आणि भारतातील बातम्यांवर लक्ष ठेवून असलेल्या काही विदेशी माध्यमांनी त्यावर चविष्ट चर्चाही सुरू केली. आता विदेशातच अशी चर्चा सुरू झाल्यावर भारतातील विद्यापीठांचा विश्वासच डळमळीत होऊन जावा हे परंपरेस साजेसेच असल्याने, या अभ्यासक्रमाची नेमकी भूमिका स्पष्ट करण्याऐवजी, या अभ्यासक्रमाचे नाव बदलावे अशा मागण्या विद्वानांकडून सुरू होणे साहजिकच होते. त्यानुसार ती मागणी झाली, आणि भूतविद्या म्हणजे जारणमारण तंत्रविद्या नसून मनोदैहिक अवस्थेवरील आयुर्वेदिक उपचारपद्धती आहे असे कानीकपाळी ओरडून सांगण्याची वेळ विद्यापीठावर आली. भूतविद्या या मूळ संस्कृतातील शब्दाची अशी दयनीय अवस्था झाल्याने, आपण काळाआड होत असल्याची संस्कृतची खंत कुठल्या कुठे पळाली असेल, आणि संस्कृतला सुटका झाल्यासारखेच वाटत असेल. विदेशी माध्यमांना संस्कृतशी फारसे देणेघेणे नसेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. पण भूतविद्येचा विदेशी माध्यमकृत अर्थ शिरोधार्य मानून काशी विद्यापीठाला झोडपण्याचा सामूहिक कार्यक्रम इथेही सुरू झाला आहे. संस्कृत ही देववाणी, म्हणजे देवांची भाषा आहे असे म्हटले जाते. माणसांपासून आता ती खरोखरीच दूर गेलेली असल्याने असे काही होणे साहजिकच. फार पूर्वीच संत ज्ञानदेवांनी संस्कृतचे भविष्य ओळखले, आणि ती भूतकाळात जाणार हे जाणून प्राकृतात आपल्या रचना केल्या ते बरे झाले.

तरी बरे, प्राकृतातील ज्ञानदेवांच्या पसायदानाकडे विदेशी माध्यमांचे लक्ष गेलेले दिसत नाही.. नाही तर, ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ या ज्ञानदेवांच्या सदिच्छापूर्ण प्रार्थनेचे नातेही भुताखेतांशी जोडले गेले असते. संस्कृतशी ओळख दूरच, पण ज्ञानदेवांनी सर्वसामान्यांना समजावी यासाठी रचलेल्या प्राकृतातील ‘भूतां’ना नवा अर्थ मिळून तोच आपल्या मानगुटीवर बसू नये, यासाठी काळजी घेतली पाहिजे. अन्यथा, भूतकाळात जाऊ पाहात असलेल्या संस्कृतला भविष्य उरलेले नाहीच, पण प्राकृताचीही अवस्था दिलासादायक नाही, असे वाटण्याची वेळ यायची!