नागपूरच्या प्राणिसंग्रहालयाच्या नामकरणाबाबतचा शासकीय आदेश दिवंगत साहेबांच्या तसबिरीसमोर ठेवून साहेबांनी डोळे मिटून मनोभावे नमस्कार केला. ‘चला, आज आणखी एक स्वप्न पूर्ण झाले. आधी युतीत ‘सडत’ असताना अनेक कामे करायची राहून गेली होती. आता लागतीलच एकेक मार्गी. लोक म्हणतात हा तर आयत्या बिळावर नागोबासारखा प्रकार. म्हणू देत. सत्तेचा एवढाही फायदा घ्यायचा नाही तर काय? तसेही साहेबांना प्राणी आवडायचे. अर्थात त्यांना माणसांचाही लळा होताच म्हणा! साहेबांचे नाव सर्वदूर, साऱ्या राज्यात पोहोचायला हवेच ना! म्हणून तर आधी समृद्धी महामार्गाचे नामकरण उरकून घेतले. युतीत असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेची संकल्पना साहेबांनी मांडली. तेव्हा नाव द्यायचे राहून गेले. नंतर आलेल्या आघाडीने त्याचा अचूक फायदा उचलला. तेव्हा बरीच आदळआपट केली, पण काही होऊ शकले नाही. खरे तर तेव्हाच मनाशी ठरवले. नाव देण्यात अजिबात उशीर करायचा नाही. साहेब म्हणजे प्रेरणा, ऊर्जेचा स्रोत. भविष्यात नाव दिलेल्या ठिकाणी सामान्य लोक जातील तेव्हा त्यांनाही प्रेरणा मिळेलच! काही जण आता म्हणतात हा तर दुसऱ्यांनी केलेल्या संकल्पावर हात मारण्यासारखा प्रकार. हे असे मारणेबिरणे शब्द आता आमच्या शब्दकोशातून हद्दपार झाले आहेत. आम्ही करून दाखवतो. ते गोरेवाडा हे नाव आदिम काळाशी संबंधित आहे असा नवाच शोध लावलाय या विरोधकांनी. अहो, किती काळ आदिम काळात जगणार? नाव कसे कालसुसंगत हवे. वर्तमानाची आठवण करून देणारे. अशा वेळी राज्याच्या हितासाठी झटणारे साहेबच डोळ्यासमोर येतात. नावात काय आहे? काम महत्त्वाचे, असे खवचट प्रश्न तर यांनी विचारूच नयेत. त्या एका साहेबांच्या नावावर तर सारी किमया साधली गेली आहे. आणि तुम्ही तरी दुसरे काय करताय? नाव बदलाचा सपाटाच लावलाय ना जिकडेतिकडे. ठिकठिकाणी वेगवेगळी नावे. त्यापेक्षा आमचे हे एकच नाव केव्हाही चांगलेच! तसेही सहायकाला सांगूनच ठेवले आहे, आणखी कुठे कुठे नाव देता येईल ते बघून ठेवा म्हणून! सारे राज्य साहेबमय करून टाकायचेय. विरोधक याला घोडे पुढे दामटणे म्हणो की आणखी काही. आता काही म्हणतात हे तर बाहेरच्या उत्पादनावर आपले लेबल लावण्यासारखे. अरे आम्ही तेव्हाही सत्तेत होतोच की. भले आमचे राजीनामे खिशात विरले असतील पण प्रत्येक विकासकामातला आमचा सहभाग कसा विसरता? त्यामुळे नामकरणाचा नैसर्गिक हक्क आम्हालाच आहे. आघाडीतल्या इतर दोघांनासुद्धा नाही हे लक्षात घ्या. आता त्या नामबदलाकडेही आम्ही लक्ष देऊच. धाराशिव, संभाजीनगर अशी मराठमोळी नावे ठेवायला काय हरकत आहे?  शेवटी साहेबांचे स्वप्न होते ते! आम्ही नाही तर आणखी कोण पूर्ण करणार? नाव बदलले की कामाला हुरूप येतो, विकासाला चालना मिळते. नव्याच्या नवलाईत सारेच गतिमान होतात..’

जोडलेले हात मोकळे करून डोळे उघडत साहेब तसबिरीसमोरून मागे हटले तेव्हा त्यांचे मन स्वप्नपूर्तीच्या समाधानाने भरून आले होते. ते मागे वळताच एक सहायक आणखी एका उड्डाणपुलाच्या नामकरणाची फाइल घेऊन त्यांच्यासमोर नम्रपणे उभा राहिला.