‘‘योगीजी आणि सावरकर यांचे फोटो लावायचे आहेत. सावरकरांना नमन करताना योगीजींचा फोटो वापरलात तरी चालेल. पण फोटोत योगीजी नीट दिसले पाहिजेत. आणि हो, आज लव्ह जिहाद नको, आज भाग्यनगरच चालवू या. ट्रेण्ड हाच झाला पाहिजे. हॅशटॅग दिल्लीहून येतीलच’’ – आयटी सेलच्या गटप्रमुखाने एवढा संदेश टंकित करून हाताखालच्या सर्व ‘नॉन-बॉट हॅण्डल्स’ना धाडला. अपेक्षेप्रमाणेच पहिली शंका तितली ऊर्फ वेदिकाची! वेदिका ही हाडामांसाची व्यक्ती आहे म्हणून तिची गणना ‘नॉन-बॉट हॅण्डल’मध्ये करायची इतकेच.. तिच्या शंका पाहून मात्र यांत्रिक बॉट बरे असे वाटू लागते. पण गटप्रमुख याला सरावला होता. ‘भाग्यनगर उत्तर प्रदेशात आहे का सर?’ या प्रश्नावर त्याने शांतपणे उत्तर दिले : ‘‘नाही. तेलंगणा राज्य. भाग्यनगर म्हणजे पूर्वीचे हैदराबाद. त्याला सावरकर आणि सावरकरवादी मंडळी भाग्यनगर म्हणत. पण हैदराबाद नाव बदलून भाग्यनगर करण्याची सूचना योगींचीच, म्हणून आपण आज त्यांचे फोटो सावरकरांसह लावणार आहोत. योगीजींनी सावरकरांचे स्वप्न पूर्ण केले, असे लिहिणार किंवा सुचवणार आहोत. इज दॅट ओक्के?’

‘ओके सर. योगीजीच सावरकरांचे खरे वारस असं लिहू का सर?’ – तितलीच्या या उत्तरावर गटप्रमुख स्वत:च्या कपाळावर हात मारून घेणार, तेवढय़ात टॅमी ऊर्फ तन्मयचा संदेश, त्याचा दुसराच प्रश्न- ‘सर, सिकंदराबादचं नाव काय ठेवणार आहेत? तेपण लिहू या का?’ यावरही संयमच पाळत गटप्रमुखाचे उत्तर : ‘‘नाही. सध्या प्लीज हैदराबादवर लक्ष द्या. सिकंदराबाद कोणी विचारू लागला तर हैदराबादनंतर तेही होईल आणि तुम्ही का इतके तळमळताय वगैरे उत्तरं द्यायची.’’ – टॅमी ऊर्फ तन्मयने उत्तरादाखल नमस्कार आणि अंगठय़ाची खूण पाठवली. गटप्रमुख फोन खाली न ठेवता ‘अक्की२०२० इज टायपिंग’ ही अक्षरे फोनच्या अगदी वरच्या भागात दिसू लागली होती त्यांकडे पाहात बसला. अपेक्षेने. अक्की म्हणजे ओंकार. हुशार आहे. शंकाही चांगल्या असतात. ‘सर, आपण आज लव्ह जिहाद विषय सोडून द्यायचा म्हणालात, पण दिल्लीमध्ये ते शेतकरी आंदोलन चालू आहे त्याचं काय करू? त्यांना खलिस्तानी म्हणणाऱ्या नॅशनल टीममध्ये नाव दिलंय ना तुम्ही माझं? तेपण आज करायचं का?’ – ओंकारचे प्रश्न नेहमी नेमके असतात. गटप्रमुखही विचारात पडला. उत्तरादाखल स्मायली टाकून, ‘‘तू दोन्ही करू शकशील ब्रो’’ म्हणत गटप्रमुखाने वेळ निभावून नेली. पण ओंकारच्या प्रश्नाने त्याला विचारात पाडले. शेतकरी कायदे एवढे चांगले होते तर विरोध का दिसतोय असे विचारताहेत लोक. आणि लव्ह जिहादविरोधी कायदा अलाहाबाद न्यायालयानेच गोत्यात आणला आहे. पण आपण आज नावबदलाच्या भाषणावर लक्ष द्यायचे, असा आदेश. कर्णावती आणि प्रयागराजच्या वेळी तेच. आताही तेच..

.. हे विचार येत असतानाच गटप्रमुखाने ते झटकूनही टाकले. उत्तनमधले व्यवस्थापन प्रशिक्षण आठवून, तो सकारात्मक विचार करू लागला.. तितली, अक्की, टॅमी.. आपण सर्वानी नावे बदललेलीच आहेत की नाही, समाजमाध्यमांसाठी? मग नावबदलाची तरफदारी आपण नाही करायची तर कुणी करायची? तेच आपले प्रथमकर्तव्य! बदला योगीजी, जरूर नावे बदला. देवेंद्रजी, तुम्हीही करा महाराष्ट्रातील गावाबद्दल एखादी सूचना. आम्ही आहोत ना? ‘‘नाव बदललेच पाहिजे,’’ म्हणत समाजमाध्यमे दणाणून सोडण्यासाठी!