News Flash

डिंगासम्राट!

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे महाप्रकरण काय करू शकते याची केवळ कल्पनाच केलेली बरे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

लोक हो, या विश्वाचे भवितव्य आता सुरक्षित असून, यापुढे आपणां सर्वाना बिनघोर झोपता येईल असे इंद्रधनुषी सुखदिन येणार आहेत, हे सहर्ष जाहीर करताना आम्हांला अगदी हर्षवायू झाला आहे. अगदीच खरे सांगायचे, तर जे हत्ती कालाचे ठायी डोनाल्ड ट्रम्पनामक अधिनायक अमेरिकेच्या अध्यक्षपदी अलगद आले त्या क्षणापासून आम्हास मोद विहरतो चोहीकडे अशीच गती प्राप्त झाली आहे. कारण स्पष्ट आहे. ट्रम्प यांच्या येण्यामुळे यापुढे सर्व संकटे विलयाला जाणार आहेत. एक साधे नोटाबंदीनामक प्रकरण जर एकाच फटक्यात काळे धनवाले, अमली पदार्थाचे तस्कर, चोरांचे सरदार, देशद्रोही, दहशतवादी, झालेच तर भुरटे चोर अशा सर्वाचा निकाल लावून गुलाबी भारत, स्वच्छ भारत हे स्वप्न साकार करू शकते, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे महाप्रकरण काय करू शकते याची केवळ कल्पनाच केलेली बरे. आता हेच पाहा, ते आले आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था अगदी वळणावर आली. हे कशावरून, तर ट्रम्प यांनीच हे सांगितले आहे. तेव्हा त्यावर अविश्वास दाखविण्याचा आंतर्देशद्रोह आपण करूच शकत नाही. त्यांच्याविरोधात खुद्द बराक ओबामा उभे राहिले असते, तरी त्यात काडीमात्र बदल झाला नसता. ओबामांनाही त्यांनी निवडणुकीत पाणी पाजले असते. हे कशावरून, तर खुद्द ट्रम्प यांनीच हे सांगितले आहे. तेव्हा त्यावर विश्वास न ठेवण्याची चूक तर आपण करूच शकत नाही आणि एकदा का येत्या २० जानेवारीपासून अमेरिकेच्या सिंहासनावर ते आरूढ झाले, की त्यांच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय कोणासही गत्यंतरच राहणार नाही. बरे ट्रम्प यांच्या आगमनामुळे केवळ अमेरिकी नागरिकांनाच सुख भरे दिन आयो रे भैया असे वाटणार आहे असेही नाही. ट्रम्प हे अखेर जागतिक शांततेसाठीच कर्मयज्ञ करणार आहेत. म्हणून तर त्यांनी आतापासूनच संयुक्त राष्ट्रांना हात घालण्यास सुरुवात केली आहे. ही संघटना आंतरराष्ट्रीय शांततेसाठी व सौहार्दासाठी खूप काम करते असा उगाचच लोकांचा समज आहे. परंतु ट्रम्प यांनी एका फटक्यात हा समज तर दूर केला. ही संघटना म्हणजे केवळ बडबोल्यांचा क्लब असल्याचे त्यांनी जाहीरच करून टाकले. वर पुन्हा हेही सांगितले, की जरा २० तारखेपर्यंत थांबा, मग पाहा या संयुक्त राष्ट्रांचे काय होते ते. याचा अर्थ स्पष्ट आहे. ट्रम्प आता या संघटनेवर ‘सर्जिकल’ कारवाई करणार. यामुळे वाईट वाटेल ते तेथे जाऊन उगाच जगापुढे मन की बात करणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना. परंतु ट्रम्प यांचा नाइलाज आहे. त्यांना जगातील गेल्या कित्येक वर्षांची अस्वच्छता उपसायची आहे. ते काम आता सुरू झाले आहे, असे त्यांचेच म्हणणे दिसते. आता यावरून कोणी त्यांना डिंगासम्राट किंवा जुमलेशहा म्हणत असेल तर त्याला ते तरी काय करणार?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 3:31 am

Web Title: us economy donald trump narendra modi demonetization
Next Stories
1 सोसवेना भार, भावनेचा..
2 कानावरी हात राहो द्यावे सदा..
3 दर्या खूश!
Just Now!
X