कायद्याने वागा, कायद्याने चाला, कायद्याचे बोला.. अशी शिकवण समस्तांस बालपणापासून दिली जात असली तरी प्रत्यक्ष व्यवहार करताना मात्र काही विपरीतच घडते, हादेखील समस्तांचा अनुभव. महत्त्वाचे म्हणजे कायद्याचा मार्ग तसा खर्चीक. साधे उदाहरण. घरच्या गॅसशेगडीचे चकतीबटण बिघडले आणि अधिकृत कंपनीच्या कर्मचाऱ्यास बोलावले तर केवढे तरी पैसे घेतो तो. त्यापेक्षा घरी सुतारकामास आलेला वा गवंडीकामास आलेला एखादा कुणी ते बटण काही तरी खटपट करून झटक्यात लावून मोकळा होतो. अगदी फुकटात. आपल्या भाषेत यास जुगाड असे म्हणतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या जुगाडची कल्पना नसावी बहुदा. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे अमेरिकेने अफगाणिस्तानवर केलेला बॉम्बहल्ला. मदर ऑफ ऑल बॉम्ब्स असे विशेषण ज्यासाठी लावले गेले असा बॉम्ब अमेरिकेने अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील अचिन जिल्ह्य़ात असलेल्या आयसिसच्या तळावर टाकला. जेथे हा बॉम्ब टाकला तो परिसर गुहांचा. या गुहांमध्ये आयसिसचे दहशतवादी मुक्कामास होते, असा अमेरिकेचा वहीम आहे. दहशतवाद्यांचा निपात करण्यासाठी बॉम्ब टाकला तर ते ठीक. पण हा बॉम्ब अमेरिकेला केवढय़ाला पडावा? या बॉम्बची किंमत कोटय़वधी डॉलर असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र तो तयार केला आहे अमेरिकी हवाईदलाने, त्यामुळे या सरकारी उत्पादनाची किंमत सांगणे अंमळ कठीणच असेही काहींचे सांगणे आहे. काहीही असले तरी हा बॉम्ब खूपच महाग आहे, एवढे खरे. आणि या महागडय़ा बॉम्बने किती दहशतवादी ठार झाले? तर साधारण ९०. आता दुसरी घटना हल्ल्याचीच. हा हल्ला आयसिसने सीरियात केलेला. फक्त एका आत्मघाती दहशतवाद्याने केलेल्या या हल्ल्यात एका फटक्यात किमान १०० नागरिकांना प्राण गमवावा लागला. या हल्ल्यासाठी आयसिसला किती खर्च आला असेल, याची कल्पना नाही. मात्र मदर ऑफ ऑल बॉम्ब्सच्या खर्चाच्या तुलनेत तो अतिअत्यल्प असणार. जणू नाही असाच. आता ही तुलना तशी अशोभनीय आणि काहींना उलटय़ा काळजाची वाटेल अशीच. पण अमेरिकी लष्कराचा काय किंवा आयसिसचा काय.. असा हिशेब असणारच. त्यामुळे त्या दृष्टीने बघायला गेल्यास ट्रम्प यांच्यासाठी हा हिशेब खूपच खर्चीक पडला म्हणायचा. अर्थात एवढी किंमत कशी योग्यच होती हे ट्रम्प सांगतीलच. आणि दहशतवादीसुद्धा त्यांच्या हिंसाचाराची तरफदारी करतात आणि तीही काहींना पटतेच. तेव्हा हे असले लाभ-हानीचे हिशेब न करता आपण आपले शांतताप्रेमी बनावे. अशा स्वघोषित शांतताकाळात दुहेरी सोय असते. एक तर, आपला शत्रुदेश नसलेल्या कोणत्याही देशाचे सरकार जे काही करील ते योग्यच, अशी समजूत करून घेता येते आणि दुसरी सोय म्हणजे बेकायदा मार्गाकडे दुर्लक्ष सुरूच ठेवता येते. त्याची तर आपल्याला चांगली सवय आहेच..